Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मिसाईल मॅन डॉ. कलाम यांचे निधन

मिसाईल मॅन डॉ. कलाम यांचे निधन

=सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा=
APJ-KALAMशिलॉंग, [२७ जुलै] – ‘मिसाईल मॅन’ म्हणून सुपरिचित असलेले माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आज सोमवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
डॉ. कलाम शिलॉंग येथील आयआयएममध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होण्यासाठी आले होते. तेथे व्याख्यान देताना ते अचानक कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी शिलॉंगच्या बेथानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. डॉक्टरांच्या मते डॉ. कलाम यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला व त्यातच त्यांचे निधन झाले. डॉ. कलाम यांच्या अकाली निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून, देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम २००२ ते २००७ या कालावधीत देशाचे ११ वे राष्ट्रपती होते. विशेष करून लहान मुलांसह युवक-युवतींमध्येही ते खूप लोकप्रिय होते. बोटीतून लोकांना वाहून नेण्याचा व्यवसाय करणार्‍या एका गरीब कुटुंबात १५ ऑक्टोबर १९३१ रोजी डॉ. कलाम यांचा जन्म झाला होता. १९७४ च्या पहिल्या चाचणीनंतर १९९८ साली भारताने पोखरण येथे घेतलेल्या दुसर्‍या अणुचाचणीत त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. अंतराळ संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे ते मिसाईल मॅन या नावाने लोकप्रिय झाले होते. देशाची प्रगती आणि भरभराटीसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. कलाम यांना पद्मभूषण आणि नंतर भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
राजकीय जीवन
डॉ. एपीजे अब्दुल कलाम देशाचे ११ वे राष्ट्रपती होते. भाजपाच्या नेतृत्वातील रालोआने त्यांना आपले राष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनविले होते. डाव्या पक्षांसह सर्वच पक्षांनी कलाम यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. १८ जुलै २००२ रोजी प्रचंड बहुमतासह डॉ. कलाम यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. २५ जुलै २००२ रोजी संसदभवनाच्या अशोका हॉलमध्ये त्यांना राष्ट्रपतिपदाची शपथ देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ २५ जुलै २००७ रोजी संपुष्टात आला. डॉ. कलाम आपल्या खाजगी जीवनात खूपच शिस्तप्रिय होते. त्यांनी ‘विंग्ज ऑफ फायर’ हे आपले आत्मचरित्र भारतीय युवकांना मार्गदर्शन मिळेल, अशा स्वरूपात लिहिले होते. त्यांनी तामिळ भाषेत कविताही रचल्या आहेत.
डॉ. कलाम हे राजकीय व्यक्ती कधीच नव्हते. परंतु, त्यांचा राष्ट्रवादी दृष्टिकोन व राष्ट्रपती झाल्यानंतर भारताच्या कल्याणाविषयी त्यांच्या धोरणामुळे राजकीयदृष्ट्या त्यांना संपन्न मानले गेले आणि त्यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. भारत २०२० पर्यंत विकसित राष्ट्र व्हावे, असे स्वप्न त्यांनी बघितले होते आणि आपल्या ‘इंडिया २०२०’ या पुस्तकात त्यांनी यासंबंधीचा आपला दृष्टिकोन स्पष्ट केला होता. भारताला अंतराळ विज्ञान क्षेत्रातील महासत्ता बनविण्याचेही स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते.
प्रतिक्रिया
डॉ. कलाम जीवनभर जनतेचेच राष्ट्रपती होते आणि राहतील. देशाच्या उद्धारासाठी त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत परिश्रम घेतले. भारतीयांमध्ये त्यांनी प्रबळ आत्मविश्‍वासाची भावना निर्माण केली. एका विज्ञानवादी अभ्यासकाला देश मुकला आहे.
प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती
डॉ. कलाम माझे उत्तम मार्गदर्शक होते. जगभर भारताची प्रतिष्ठा वाढण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्यासमवेत कार्य करण्याची मला संधी मिळाली. भारताची सेवा करणार्‍या सुपुत्राला आज आम्ही गमावले आहे. त्यांनी भारताला सशक्त आणि सामर्थ्यशाली बनविले. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
‘‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या अकाली निधनामुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे. या संपूर्ण पिढीसाठी डॉ. कलाम प्रेरणास्रोत होते’’.
राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम हे उत्कृष्ट शास्त्रज्ञ, सच्चे राष्ट्रवादी तर होतेच, पण त्यांच्यात एक संवेदनशील व्यक्तीही दडली होती. त्यांच्या निधनामुळे आपण विज्ञान जगतातील एका द्रष्टा पुढारी आणि मिसाईल क्षेत्रातील तज्ज्ञाला मुकलो आहोत.
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
देशाने साधू मनाचा संशोधक गमावला आहे. राष्ट्रपती म्हणून देशाच्या विकासात डॉ. कलाम यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. मिसाईल मॅन म्हणून असलेली त्यांची ओळख त्यांच्या श्रेष्ठत्त्वाची साक्ष देणारी आहे.
सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, महाराष्ट्र
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे आकस्मिक निधन दु:खद आणि वेदनादायी आहे. भारत महासत्ता व्हावी, यासाठी सातत्याने चिंतन करणार्‍या एका सच्च्या राष्ट्रभक्ताला, कर्मयोग्याला आपण मुकलो आहोत. ही देशाची कधीही भरून न निघणारी फार मोठी हानी आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23533

Posted by on Jul 28 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1542 of 2453 articles)


तीन नागरिकांचा मृत्यू, १५ जखमी तिन्ही अतिरेक्यांचा खात्मा ११ तास चालली चकमक पाकमधूनच झाली घुसखोरी चिनी बनावटीच्या एके रायफल्स ...

×