Home » ठळक बातम्या, मराठवाडा » मुंडेंविरुद्ध सुरेश धस राष्ट्रवादीचे उमेदवार

मुंडेंविरुद्ध सुरेश धस राष्ट्रवादीचे उमेदवार

=धस बळीचा बकरा- मुंडे=
मुंबई, (३ मार्च) – भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघात आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महसूल, मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांना मैदानात उतरविले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक आज येथे झाली. या बैठकीत बीडच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत गोपीनाथ मुंडे यांचे नाव बीड लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रवादीने मागील आठवड्यात जाहीर केलेल्या १८ उमेदवारांच्या पहिल्या यादीत बीड, हिंगोली, मावळ आणि हातकणंगलेचे उमेदवार घोषित केले नव्हते. गेले काही दिवस राष्ट्रवादी बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंना टक्कर देणार्‍या उमेदवाराच्या शोधात होती. अखेर राष्ट्रवादीचा शोध सुरेश धस यांच्या नावावर येऊन संपला. आज पक्षाच्या केंद्रीय समितीने राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या बैठकीनंतर त्यांची उमेदवारी जाहीर केली. सुरेश धस हे बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा, शिरुर(कासार) या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सध्या ते मंत्रिमंडळात महसूल, मदतकार्य, भूकंप व पुनर्वसन, सहकार व पणन, वस्त्रोद्योग, जलसंधारण, रोजगार हमी खात्याचे राज्यमंत्री आहेत.
येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी मंत्र्यांना उतरविणार आणि जे नकार देतील त्यांचा वेगळा विचार करावा लागेल, असे वेळोवेळी शरद पवार आणि पक्षातील काही वरिष्ठ नेते बोलत होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळातील प्रचंड वादग्रस्त असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना आणि धस यांच्यासारख्या नवख्या मंत्र्यालाच केवळ उमेदवारी देण्यात आली आहे. एकूणच लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार देणार्‍या वरिष्ठ मंत्र्यांसमोर अखेर शरद पवारांना झुकावेच लागल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होते.
धस बळीचा बकरा- मुंडे
आपल्याविरुद्ध तगडा उमेदवार देण्यासाठी इतका वेळ लागला असे नसून, प्रत्यक्षात बीड मतदारसंघात आपल्याविरुद्ध लढायला कोणीच तयार नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीने सुरेश धस यांना बळीचा बकरा बनवल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी व्यक्त केली. उमेदवार कोणीही दिला तरी मला काहीही फरक पडत नसल्याचेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=11596

Posted by on Mar 4 2014. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (2438 of 2454 articles)


पुणे, (१ मार्च) - खुनाचा आरोप असलेले उस्मानाबादचे खासदार पद्मसिंह पाटील यांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ...

×