Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » मुंबईसह सर्व महानगरांना सतर्कतेचा इशारा

मुंबईसह सर्व महानगरांना सतर्कतेचा इशारा

=गुजरातमध्ये एनएसजीचे ४०० कमांडो तैनात, पोलिसांच्या सुट्या रद्द, कच्छमध्ये धाडसत्र=
mumbai police high alartनवी दिल्ली/अहमदाबाद, [६ मार्च] – लष्कर-ए-तोयबाचे १० अतिरेकी गुजरातमध्ये घुसले असल्याचा इशारा आयबी आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी जारी केल्यानंतर गुजरातसोबतच देशभरातील सर्वच महानगरांमध्ये अतिसतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला असून, एनएसजीच्या चार तुकड्या अर्थात ४०० कमांडोज अहमदाबादेत तैनात करण्यात आले आहेत. कच्छ आणि आसपासच्या परिसरात पोलिसांनी व्यापक धाडसत्र राबविण्यास सुरुवात केली आहे.
संपूर्ण गुजरातमध्ये शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. पोलिसांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या असून, महत्त्वाच्या इमारती, संवेदनशील ठिकाणे आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. अहमदाबादेतील अक्षरधाम मंदिराला १०० जवानांची सुरक्षा देण्यात आल्याने, या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, अशी माहिती तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
समुद्रमार्गे हे अतिरेकी नौकेने गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. उद्या सोमवारी महाशिवरात्री असल्याने गुजरातमधील सोमनाथ व अक्षरधाम मंदिरात लाखोच्या संख्येत भाविकांची गर्दी होत असते. ही मंदिरेच अतिरेक्यांचे लक्ष्य असण्याची शक्यता आहे. याशिवाय, मुंबई, राजधानी दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू यासारख्या महानगरांची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे.
पंजाबच्या पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर गेल्या २ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर कुठलीही जोखीम स्वीकारण्याची सुरक्षा संस्थांची तयारी नाही. गुजरातमधील बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि विमानतळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक शहरांच्या प्रवेश मार्गांवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय, व्यापक शोध मोहीमही हाती घेण्यात आली आहे, असे गुजरातचे पोलिस महासंचालक पी. सी. ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्य सचिव पी. के. तनेजा यांनीही आज सकाळी पोलिस व प्रशासकीय अधिकार्‍यांची उच्चस्तरीय बैठक बोलावून स्थितीचा आढावा घेतला.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कच्छ जिल्ह्यातील भुजच्या काही मुस्लिमबहुल भागांमध्ये आज सकाळपासूनच धाडी घालण्यात आल्या. काही हॉटेल्सचीही झडती घेण्यात आली, असे ठाकूर यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27057

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (755 of 2453 articles)


नवी दिल्ली, [६ मार्च] - स्वच्छ भारत योजना आणि प्रधानमंत्री जनधन योजना यासारख्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार्‍या ...

×