Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची आताच घोषणा नाही

मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची आताच घोषणा नाही

ravi-shankar-prasad-2अलाहाबाद, [१३ जून] – अलाहाबाद येथे सुरू असलेल्या भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
पुढील वर्षी उत्तरप्रदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी या बैठकीत भाजपा आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावर शिक्कमोर्तब करेल, असा अंदाज होता. पण, आता भाजपाने या संदर्भातील निर्णय पुढे ढकलला आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्‍चित करण्याची भाजपात एक प्रक्रिया आहे. या संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीला नव्हे, तर पक्षाच्या संसदीय मंडळाला आहे, असे केंद्रीय दळणवळणमंत्री रविशंकरप्रसाद यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना भाजपा आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करेल, अशी चर्चा जोरात सुरू झाली होती. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली नाही तरी त्यांच्याकडे पक्षाच्या प्रचार समितीचे अध्यक्षपद दिले जाईल, असे मानले जात होते. पण उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा भाजपा घाईगर्दीने करणार नाही, पूर्ण विचाराने आणि सावकाश करेल, असे आता दिसून येत आहे.
विशेष म्हणजे पिलिभीतचे भाजपा खासदार वरुण गांधी यांचे सर्वाधिक होर्डिंग्ज शहरात लावण्यात आले आहेत. या सर्व होर्डिंग्जमधून त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचा समर्थकांचा प्रयत्न आहे. यासाठी वरुण गांधी यांचे समर्थक पद्धतशीर मोहीमही राबवत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी हॉटेल लिजेंडमध्ये अनेक ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अतिशय साधेपणाने येत असताना वरुण गांधी मात्र डझनभर गाड्यांचा ताफा घेऊन आले. तिथे त्यांच्या समर्थकांनी ‘युपी का सीएम कैसा हो, वरुण गांधी जैसा हो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने वरुण गांधी यांनी केलेले शक्तिप्रदर्शन भाजपाच्या नेतृत्वाला आवडले नसून, पक्ष नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे. या आणि अशा अनेक कारणांनी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा आता न करण्याच्या निष्कर्षाप्रत भाजपा नेतृत्व आले आहे. प्रत्येक मतदारसंघात सर्वेक्षण करून, तसेच कार्यकर्ते आणि मतदारांचा कल लक्षात घेऊन मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा येत्या काही दिवसांत केली जाईल, असा अंदाज आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28569

Posted by on Jun 13 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (246 of 2452 articles)


मुंबई, [१३ जून] - राज्यात सततची दुष्काळी परिस्थिती, हवामान बदल, गरिबी, आर्थिक बाबीतील कमतरता याचा परिणाम महिलांच्या विकासावर होत असतो. ...

×