Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » मुलायमसिंहांच्या अखिलेश सरकारला कानपिचक्या

मुलायमसिंहांच्या अखिलेश सरकारला कानपिचक्या

  • उत्तरप्रदेशात कामाची गती संथ
  • केवळ पायाभरणी होते, नंतर सर्व ठप्प

Mulayam-Singh-Yadav_1लखनौ, [२३ नोव्हेंबर] – आपला ७५ वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणारे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आज रविवारी अखिलेश सरकारला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. उत्तरप्रदेशात कामांची गती फारच संथ आहे. एखाद्या योजनेची पायाभरणी झाली असल्याची माहिती कानावर येते. पण, ती योजना पूर्ण होऊन उद्‌घाटन झाल्याची बातमी कधीच कानावर येत नाही, अशा शब्दात नेताजींनी आपल्याच पुत्राच्या सरकारला घरचा अहेर दिला आहे.
या सरकारने विकासाच्या अनेक योजना हाती घेतल्या आहेत. मात्र, कामाची गती इतकी संथ आहे की, यातील एकाही योजनेचे उद्‌घाटन करण्याचे भाग्य माझ्या नशिबी आले नाही. सरकारने वेगाने काम करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. लखनौ-आग्रा दरम्यानच्या ३०२ किलोमीटरच्या एक्सप्रेस-वेच्या पायाभरणीनिमित्त मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या शासकीय निवासस्थानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नेताजी बोलत होते.
माझ्या कार्यकाळात योजना सुरू करतानाच ती पूर्ण होऊन उद्‌घाटनाची तारीख जाहीर केली जात असे आणि ठरल्याप्रमाणे योजना वेळेत पूर्ण होत असत. मात्र, आता सरकारने अमूक योजनेची पायाभरणी केली, हेच मी आतापर्यंत ऐकले. पायाभरणी केलेली योजना पूर्ण झाली किंवा त्या योजनेवर गतीने काम सुरू आहे आणि आता त्याचे उद्‌घाटन होणार आहे, असे मी आजवर कधीच ऐकले नाही, असे मुलायमसिंह यांनी यावेळी सांगितले.
झटपट कामे करा, अशा सूचना सपाच्या मंत्र्यांना देत नेताजी म्हणाले की, तुम्हा सर्वांनाच ठावूक आहे की, पक्ष संघटना ही सरकारपेक्षाही महत्त्वाची आहे. पक्षाची इच्छा आहे, तोपर्यंतच तुम्ही मंत्रिपदी कायम राहू शकता. त्यामुळे हाती घेतलेली कामे अद्यापही पूर्ण का झाली नाही, याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागणार आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने मला पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या पदावरून माझी हकालपट्टी करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुम्हाला पुन्हा कार्यकारिणीची बैठक बोलवावी लागेल. पण, जोपर्यंत मी या पदावर आहे, तुम्हाला कामगिरी दाखवावीच लागणार आहे. मंत्र्यांनी प्रत्येक गावात जावे. इच्छेनुसार एक गाव दत्तक घ्यावे आणि तिथे शौचालयासह अन्य सुविधा उपलब्ध कराव्या. लोक आता मूर्ख राहिले नाहीत. सरकारने आपल्यासाठी काय केले, याचा आढावा ते घेत असतात. सरकारने आपल्यासाठी कोणती योजना तयार केली आहे, ही बाब त्यांच्यासाठी महत्त्वाची नसते, असे त्यांनी सांगितले.
मोदी माझीच नक्कल करताहेत
गाव दत्तक घेणे, तिथे शौचालयांसह अन्य सुविधा देणे यासारख्या योजना राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी माझीच नक्कल करीत आहेत, असा तर्कटही त्यांनी काढला. मी १९९० मध्ये गाव दत्तक घेतले होते. आता तेच काम मोदी करीत आहेत. मी हे सर्व फार आधीच करून चुकलो आहे. मी आता घाण दूर करण्यावर भर देत आहेत. पण, त्यांनी आधी देशातून दारिद्र्य दूर करावे. त्यानंतर घाणही आपोआपच दूर जाईल, असे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18511

Posted by on Nov 24 2014. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (2336 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] - सरकारी बँकांचे कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी येत्या दोन ते पाच डिसेंबर दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये संपावर ...

×