Home » क्रीडा, ठळक बातम्या » मेरी कोम निवृत्त होणार?

मेरी कोम निवृत्त होणार?

Mary_Komगुवाहाटी, [१३ जानेवारी] – भारताची महिला मुष्टियोद्धा आणि ऑलिम्पिक पदक विजेती एमसी मेरी कोम २०१६ साली ब्राझिलच्या रिओ दी जनेरोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, तिच्याकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
‘रिओ ऑलिम्पिकसाठी मी कसून सराव करीत आहे. देशाला आणखी गौरव मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नरत आहे. या वर्षी कुठल्याही महत्त्वपूर्ण स्पर्धा नसल्याने काही आंतरराष्ट्रीय सामन्यांचे निमंत्रण मिळाले असल्याने त्यात मी सहभागी होणार आहे. मात्र, रिओ ऑलिम्पिकनंतर खेळणे माझ्यासाठी अवघड राहील. त्यामुळे कदाचित मी निवृत्ती घेऊ शकेल,’ असे मेरीने म्हटले आहे.
‘स्पर्धा कुठलीही असो, रिंगमध्ये उतरायला शारीरिक फिटनेस महत्त्वाचे असते. त्यामुळे कामगिरीत सुधार होऊन आत्मविश्‍वास वाढतो. परंतु, अत्यधिक स्पर्धांमध्ये सहभागी होणेही योग्य नाही. त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता अधिक बळावते,’ असे स्पष्टीकरणही मेरीने दिले. मेरी कोमने महिला जागतिक अव्यावसायिक मुष्टियुद्ध स्पर्धेचे अजिंक्यपद पाच वेळा प्राप्त केले असून २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला मुष्टियोद्धा ठरली होती. या स्पर्धेतील फ्लायवेट प्रकारात तिने कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर २०१४ च्या इंचिओन आशियाई स्पर्धेत मेरीने सुवर्णपदक पटकावले होते. २०१३ साली तिने ‘अनब्रेकेबल’ नावाचे आत्मचरित्र लिहिले.
सातव्या ईस्ट इंडिया महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत मेरीने सुवर्णपदक पटकावलं आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोलाची कामगिरी बजावली. हिस्सार येथे झालेल्या दुसर्‍या आशियाई महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर मेरी कोमने आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिने विजयाची पुनरावृत्ती केली. मात्र, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८ साली तिने चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद पटकावले होते. २००३ साली अर्जुन पुरस्कार, २००९ साली राजीव गांधी खेलरत्न, २०१० साली पद्मश्री आणि २०१३ साली पद्मभूषण पुरस्काराने तिला गौरविण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19675

Posted by on Jan 14 2015. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2243 of 2455 articles)


चार वेळच्या विजेत्या मेस्सीला पछाडले लागोपाठ दुसर्‍यांदा मिळाला सन्मान झुरिच, [१३ जानेवारी] - पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा महान फुटबॉलपटू ...

×