Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » मोदींना गोवण्याचा कट

मोदींना गोवण्याचा कट

  • इशरत प्रकरण
  • राजनाथसिंह यांची रोखठोक भूमिका
  • दहशतवादाच्या मुद्यावर तडजोड नाही
  • सखोल चौकशीनंतरच कारवाई

Rajnath-Singh_1नवी दिल्ली, [१० मार्च] – इशरत जहॉं प्रकरण म्हणजे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फसवण्याच्या एका मोठ्या षडयंत्राचा भाग होता, असे रोखठोक प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी लोकसभेत केले. यासाठी या प्रकरणात हस्तक्षेत करून वारंवार भूमिका बदलली गेली. त्यामुळे प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व पैलूंची सरकार चौकशी करेल आणि त्यानंतरच कारवाईबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाच्या मुद्यावर रालोआ सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, तर कठोरपणे त्याचा मुकाबला केला जाईल, असा निर्वाळाही देतानाच, या मुद्यावर कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
इशरत जहॉंच्या मुद्यावर उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर झालेल्या वादळी चर्चेला उत्तर देताना राजनाथसिंह म्हणाले की, दहशतवादावर जाती, धर्म आणि पंथाचे राजकारण करणे योग्य नाही. इशरत जहॉं प्रकरण असो की, दहशतवादाचा अन्य कोणताही मुद्दा असो, यावर सरकारला घेरण्याचा, अपयशी करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टीनेच याकडे पाहायला हवे.
इशरत जहॉंला आधी एका प्रतिज्ञापत्रातून दहशतवादी म्हटले होते, त्यानंतर दुसर्‍या प्रतिज्ञापत्रात ती दहशतवादी नसल्याचा दावा करण्यात आला होता, प्रतिज्ञापत्रातील हा बदल कोणत्या परिस्थितीत करण्यात आला, याची सरकार चौकशी करेल, असे स्पष्ट करत राजनाथसिंह म्हणाले की, या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे गहाळ झाली आहे, त्याची मंत्रालय स्तरावर चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच सरकार कोणत्यातरी निष्कर्षापर्यंत पोचेल आणि कारवाईबाबतचा निर्णय घेईल.
इशरत जहॉं लष्कर-ए-तोयबाची अतिरेकी होती, या वस्तुस्थितीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारने केला होता, असा आरोप करत राजनाथसिंह म्हणाले की, आपल्या पहिल्या प्रतिज्ञापत्रातून सरकारने ही बाब मान्य केली होती, नंतर दुसर्‍या प्रतिज्ञापत्रातून मात्र याबाबत घूमजाव केले. मात्र, मुंबईवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली याच्या साक्षीतून इशरत जहॉंचे लष्कर- ए-तोयबाशी संबंध असल्याला दुजोरा मिळाला होता.
माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांचे नाव न घेता राजनाथसिंह म्हणाले की, संपुआ सरकारच्या माजी गृहमंत्र्याने भगव्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, एका धर्माचा संबंध दहशतवादाशी जोडला. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या संपुआ सरकारने दहशतवादाला सांप्रदायिक रंग दिला. दहशतवादाचा संबंध कोणत्याही जातिधर्माशी जोडणे योग्य नाही. अशी सोयीची धर्मनिरपेक्षता योग्य नाही.
तत्कालीन गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी तत्कालीन महान्यायवादी वहानवटी यांना पाठवलेल्या दोन पत्रांच्या, तसेच प्रतिज्ञापत्राच्या प्रति आणि अन्य काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे अजूनही सापडली नाहीत. याची चौकशी सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गठ्ठा मतांच्या राजकारणामुळे इशरत जहॉंला दहशतवादी ठरवण्याचा आपला निर्णय संपुआ सरकारने फिरवला, असा आरोप चर्चेला सुरुवात करताना भाजपाचे निशिकांत दुबे यांनी केला. नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी इशरत जहॉं आणि तिचे सहकारी गुजरातमध्ये आले होते, असा आरोप दुबे यांनी केला. मोदी यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठी, तसेच तुरुंगात डांबण्यासाठी इशरत प्रकरणाच्या प्रतिज्ञापत्रात बदल करण्यात आल्याचा आरोप दुबे यांनी केला.
बिजू जनता दलाचे कलिकेश नारायण सिंहदेव यांनी इशरत जहॉंच्या मुद्यावर कॉंग्रेस आणि भाजपा दोघेही राजकारण करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे सीबीआय आणि आयबीच्या चौकशीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले, असे ते म्हणाले. इशरत जहॉं आणि तिच्या तीन सहकार्‍यांचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा दावा जमात उद दावा आणि अन्य संघटनांच्या वेबसाईटद्वारे करण्यात आला होता, याकडे लक्ष वेधत, उद्या मी आणि अन्य कोणाला अशा वेबसाईटने दहशतवादी म्हटले तर आम्ही दहशतवादी होऊ का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.
२०१४ ची निवडणूक आपण जिंकू शकत नाही, असे लक्षात आल्यावर भाजपा नेत्यांवर आरोप करण्यात आले, असा दावा भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी केला. आपल्या राजकीय विरोधकांना संपविण्याचा कॉंग्रेसचा हा प्रयत्न होता, असे ते म्हणाले. इशरत जहॉं मुंबईची रहिवासी होती, मग ती अहमदाबादमध्ये काय करायला गेली होती, असे भाजपाचे किरीट सोमय्या म्हणाले. गृहमंत्र्यांनी जावेद शेख आणि अन्य ज्या लोकांचा उल्लेख केला ते कोण होते, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. कॉंग्रेस, सपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी इशरत जहॉंला नायिका आणि शहीद बनवले, असा आरोप सोमय्या यांनी केला. त्यांनी असे केले नसते तर २६/११ झाले नसते आणि हजारो मुंबईकराचे जीवन उद्‌ध्वस्त होण्यापासून वाचले असते, असेही सोमय्या म्हणाले. भाजपा सदस्यांनी आपल्या भाषणात वारंवार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा उल्लेख केला, त्यांच्यावर आरोप केले. यावर कॉंग्रेसच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. कॉंग्रेसच्या सदस्यांनी वेलमध्ये येत घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काही वेळासाठी सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी या मुद्यावर बोलण्याचा प्रयत्न केला, भाजपा नेते वारंवार कॉंग्रेस नेत्यांची नावे का घेत आहे, असे ते म्हणाले. चर्चेत सहभागी होत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न खडगे यांनी केला, मात्र, लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत, ज्यांची नावे आहेत, त्यांनाच बोलता येईल, असे सभापती सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले.
मोदींना गोवण्यासाठी दबाव : सत्यपालसिंह
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि भाजपाचे विद्यमान खासदार डॉ. सत्यपालसिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीत आपल्यावर राजकीय दबाव आणण्यात आल्याचा आरोप चर्चेत सहभागी होताना केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख राहिलेले सत्यपालसिंह म्हणाले की, इशरत जहॉंच्या चकमकीला आपल्याला खोटे ठरवायचे आहे आणि या प्रकरणाचा संबंध गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी जोडायचा आहे, असे मला कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दूरध्वनी करून सांगितले होते, यासाठीच गृहमंत्र्यांनी तुमची विशेष करून या पथकावर नियुक्ती केली, असे हा नेता म्हणाला होता, असेही त्यांनी सांगितले. मात्र, मी यासाठी नकार दिला, असे ते म्हणाले.
माझ्यासोबत एसआयटीमध्ये असलेला अन्य एक अधिकारी या प्रकरणाच्या चौकशीत पक्षपात करत होता, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू होण्यापूर्वीच त्याने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही चकमक बनावट असल्याचे सांगितले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. माझ्यावर कोणत्याच पक्षाचे लोक दबाव आणू शकत नाही, मग ते भाजपाचे असो की कॉंग्रेसचे, असे महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात मी म्हटले होते, असे स्पष्ट करत सत्यपालसिंह म्हणाले की, प्रामााणिकपणे काम करूनही या प्रकरणात माझ्यावर आरोप लावण्यात आले. आपण प्रामाणिकपणे काम करू शकत नाही, असे लक्षात आल्यावर एसआयटीतून राजीनामा देण्याचा निर्णय मी घेतला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27220

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (698 of 2453 articles)


=महाराष्ट्र सदन घोटाळा= मुंबई, [८ मार्च] - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने आज मंगळवारी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते आणि ...

×