Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » यापुढे केवळ पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्यावर चर्चा

यापुढे केवळ पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्यावर चर्चा

=राज्यसभेत राजनाथसिंह कडाडले, पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्या सर्वपक्षीय बैठक=
Rajnath-Singh_1नवी दिल्ली, [१० ऑगस्ट] – जगातील कोणतीही ताकद काश्मीरला भारतापासून वेगळे करू शकणार नाही, काश्मीर भारताचे आहे आणि भारताचेच राहील, असा खणखणीत निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज दिला. संपूर्ण देश काश्मीरवासीयांच्या पाठिशी असल्याबाबतचा एक प्रस्तावही आज एकमताने राज्यसभेत पारित करण्यात आला.
जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर आज राज्यसभेत जवळपास ७ तास चाललेल्या चर्चेला उत्तर देतांना राजनाथसिंह म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी १२ ऑगस्टला सर्वपक्षीय बैठक बोलवली जाणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. जम्मू काश्मीरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याच्या मुद्यावर तेथील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
जम्मू काश्मीरमधील हिंसाचाराच्या घटनांत स्थानिक लोकांचा कोणताही सहभाग नाही, याचा निर्वाळा देत तेथील हिंसाचाराच्या घटना या पाकिस्तानपुरस्कृत असल्याचा आरोपही राजनाथसिंह यांनी केला. पाकिस्तानशी यापुढे जम्मू काश्मीरच्या मुद्यावर नाही तर पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्यावर चर्चा करण्याची घोषणाही त्यांनी केली. भारताच्या भूमीत पाकिस्तान जिंदाबादचे नारे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही राजनाथसिंह यांनी दिला.
जम्मू काश्मीरच्या मुद्यावर एवढी प्रदीर्घ चर्चा झाल्याचे माझ्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनात मी कधी पाहिले नाही, असे स्पष्ट करत राजनाथसिंह म्हणाले की, विशेष म्हणजे ही चर्चा अतिशय निकोप अशा वातावरणात झाली. सर्वपक्षीय सदस्यांनी अतिशय तळमळीने विविध सूचना यावेळी केल्या. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची राजनाथसिंह यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
राज्यातील सर्वच भागात गेल्या महिनाभरापासून संचारबंदी असल्याचा उल्लेख करण्यात आला, पण राज्यांच्या सर्वच भागात महिनाभरापासून संचारबंदी नाही, अनेक भागात संचारबंदी नसतांनाही दुकानदार भीतीमुळे दुकाने उघडायला तयार नाही, असे ते म्हणाले.
बळाचा कमीत कमी वापर करण्याच्या, संयमाने परिस्थिती हाताळण्याच्या तसेच पॅलेट गनचा वापर न करण्याच्या सूचना सुरक्षा दलांना देण्यात आल्या, त्यामुळे जखमींमध्ये नागरी लोकांपेक्षा सुरक्षा दलाच्या जवानांची संख्या जास्त असल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.
देशाच्या अन्य राज्यांबाबत आम्हाला जेवढी चिंता वाटते, तेवढीच चिंता जम्मू काश्मीरबाबतही वाटत आहे, ज्या मुलांच्या हातात खेळण्याच्या वस्तू हव्या, त्यांच्या हातात दगड पाडून आमच्या मनाला वेदना होतात, असे स्पष्ट करत राजनाथसिंह म्हणाले की, काश्मीर प्रश्‍न सोडवण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी जो मार्ग दाखवला होत, त्या मार्गानेच आमची वाटचाल सुरू आहे. काश्मीरला पुन्हा भारताचे स्वर्ग बनवण्याचा आमचा निर्धार आहे.
बेरोजगारीमुळे काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती हाताबाहेर गेली, हा आरोप आपल्याला मान्य नाही, देशाच्या अन्य भागातही बेरोजगारीची समस्या आहे, याकडे राजनाथसिंह यांनी लक्ष वेधले. काश्मीर खोरे लष्कराच्या ताब्यात देण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही, असे ते म्हणाले.
काश्मीर खोर्‍यात कधीकधी इसिसचे झेंडे फडकतात, ते पाहून मनाला अतिशय वेदना होतात, इसिसने निरपराध मुस्लिमांच्या हत्या केल्या आहेत, याकडे लक्ष वेधत इस्लाम कधीच निरपराध लोकांच्या हत्येची परवानगी देत नाही, काश्मिरी विद्यार्थ्यांनी इस्लामबाबतची पुस्तके वाचावी, आणि इस्लामाच्या नावावर दिशाभूल करणार्‍यापासून स्वत:चे संरक्षण करावे, असे राजनाथसिंह म्हणाले.
गुलाम नबी आझाद
पंतप्रधान मोदी आफ्रिकेच्या आणि पाकिस्तानच्या मुद्यावर ट्विट करतात, पण देशाचा मुकुटमणी असलेल्या काश्मीरच्या मुद्यावर ट्विट करायला त्यांना वेळ नाही, या शब्दात विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर आज राज्यसभेत हल्ला चढवला.
दलितांवरील अत्याचार आणि काश्मीरप्रकरणी पंतप्रधानांची भूमिका आम्हाला संसदेतून नाही तर मध्यप्रदेश आणि तेलंगणातील कार्यक्रमातून समजली, असा टोला मारत आझाद म्हणाले की, संसदेत उपस्थित राहूनही पंतप्रधान लोकसभा तसेच राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होत नाहीत. पंतप्रधानांच्या लेखी संसदेचे महत्त्व नसेल तर संसद बंद करून टाका, असे आझाद म्हणाले.
ज्या ठिकाणी भाजपाचे पाय पडले, त्या ठिकाणी आगी लागल्या, अशा शब्दात भाजपावर टीका करतांना आझाद म्हणाले की, पॅलेट गनमुळे ज्यांना आपले डोळे गमवावे लागले अशा काश्मिरातील तरुणांवर, तरुणींवर प्रेम करा. भाजपा आगी लावते या आझाद यांच्या विधानावर भाजपा सदस्यांनी तीव्र हरकत घेतली. यावेळी उभे होत काश्मीर मुद्यावर एका स्वरात एका आवाजात बोला, असे अर्थमंत्री आणि सभागृहाचे नेते अरुण जेटली म्हणाले.
इन्सानियत, जम्हुरियत आणि काश्मिरियत हे शब्द अटलबिहारी वाजपेयी यांच्या तोंडीच शोभून दिसतात, अन्य कोणाच्या नाही, असे आझाद म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29186

Posted by on Aug 12 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (128 of 2453 articles)


लखनौ, [११ ऑगस्ट] - देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आतापासूनच सुरू झाली असून, ...

×