Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » युती सरकारला कोणताही धोका नाही : फडणवीस

युती सरकारला कोणताही धोका नाही : फडणवीस

Devendra-Fadnavis3नवी दिल्ली, [१६ ऑक्टोबर] – राज्यातील भाजपा-सेना युती सरकारला कोणताही धोका नसून, सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ निश्‍चितपणे पूर्ण करेल, असा ठाम विश्‍वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
युती सरकारला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राजधानी दिल्लीत हॉटेल ली मेरिडियनमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्यातील भाजपा-सेना युतीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या स्थैर्याबद्दल पत्रकारांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे सरकार वाचविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
सामना या दैनिकातून सरकारवर सातत्याने टीका केली जाते, याकडे लक्ष वेधले असता वृत्तपत्रातून केल्या जाणार्‍या टीकेवर आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, ज्यावेळी शिवसेनेचा एखादा मोठा पदाधिकारी टीका करेल, त्यावेळी आम्ही त्याची दखल घेऊ, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांवर शिवसेना करत असलेल्या टीकेला योग्यवेळी उत्तर मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाही कोणताही तणाव नसून, राज्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. शिवसेनेच्या एका राज्यमंत्र्याने आपल्याकडे अधिकार नसल्याची तक्रार केली होती. पण, शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे असलेल्या भाजपाच्या राज्यमंत्र्यांना जेवढे अधिकार आहेत, तेवढेच अधिकार भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या हाताखाली असलेल्या शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
२०१९ पर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा आपला निर्धार असून, त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पाणीटंचाईची समस्याही बिकट झाली होती. त्यामुळे लातूरला रेल्वेने पिण्याचे पाणी पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतु, त्याआधीच मराठवाड्यात सलग चार दिवस झालेल्या पावसाने पाणीटंचाईची समस्या सुटली, असे स्पष्ट करत फडणवीस म्हणाले की, दुष्काळी भागात जुलै महिन्यातच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. राज्यातील एकाही सरकारने आतापर्यंत जुलै महिन्यात चारा छावण्या उघडण्याचा निर्णय घेतला नव्हता. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सामान्यपणे चारा छावण्या उघडल्या जात होत्या.
जलयुक्त शिवार योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत ६ लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे, असे स्पष्ट करत फडणवीस म्हणाले की, एका शेतकर्‍याने तर या योजनेसाठी स्वत:हून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे करत असलेल्या मदतीबद्दल त्यांचे अभिनंदन करत, शेतकरी आत्महत्या हा आता सामाजिक प्रश्‍न झाला आहे, राज्य सरकार तर आपल्या परीने आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करतच असून, समाजातील सर्वांनीच यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25171

Posted by on Oct 17 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1322 of 2451 articles)


=भाजपाचा पाकला इशारा= श्रीनगर, [१६ ऑक्टोबर] - जम्मू-काश्मीर हे भारताचेच अविभाज्य अंग होते आणि राहील. तेव्हा, काश्मीर बळकावण्याचे स्वप्न पाहणे ...

×