Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » राजकारण बाजूला ठेवून जीएसटीसाठी सहकार्य करा: मोदी

राजकारण बाजूला ठेवून जीएसटीसाठी सहकार्य करा: मोदी

=कामकाज चालू देण्यासाठी विरोधकांना आवाहन=
narendra modi33नवी दिल्ली, [१७ जुलै] – जीएसटी विधेयक राष्ट्रीय महत्त्वाचे आहे, त्यामुळे राजकारणाच्या वर उठून हे विधेयक पारित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर आज दुपारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते. या बैठकीला राज्यसभेतील कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा, लोकसभेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
संसदेत कामकाज झाले पाहिजे. कामकाज होण्यासाठी विरोधकांनी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन करत मोदी म्हणाले की, सरकारला लोककल्याणकारी निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सभागृहात कामकाज सुरळीत होत असेल तर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचीही सरकारची तयारी आहे.
विरोधकांचे विविध मुद्यांवर जे आक्षेप आहे, त्या सर्व मुद्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्याऐवजी चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन मोदी यांनी केले.
काश्मीरप्रकरणी विविध राजकीय पक्षांची विधाने एका सुरात असल्याबद्दल मोदी यांनी विरोधी पक्षांचे अभिनंदन केले. ही विधाने करतांना विरोधी पक्षांनी राष्ट्रहिताची बाजू घेतल्याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रीय महत्त्वाच्या सर्व मुद्यांवर विरोधक अशीच भूमिका घेतील, असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त केला.
या बैठकीत काश्मिरातील हिंसाचार, महागाई, अरुणाचल आणि उत्तराखंडप्रकरणी न्यायालयाचे निर्णय आणि केंद्र राज्य संबंध या मुद्यांवरून सरकारला घेरण्याचे संकेत कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी दिले.
पंतप्रधान एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील परस्पर सहकार्य वाढवण्याची गरज प्रतिपादित करतात, दुसरीकडे उत्तराखंड आणि अरुणाचलसारख्या राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचे प्रयत्न करतात, अशाने केंद्र राज्य संबंध मजबूत कसे होतील, अशी विचारणा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केली.
जीएसटीच्या मुद्यावर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी आम्ही दोन वर्षांपासून करीत आहोत. हा काही कॉंग्रेस आणि सरकार यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा नाही, असे माकपचे सीताराम येचुरी यांनी म्हटले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक पारित होईल, अशी अपेक्षा शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली. देशातील बहुतांश राज्ये जीएसटीच्या बाजूने पाठिंबा आहेत. कोणत्याही पक्षाने जीएसटीला विरोध करण्याची स्पष्ट भूमिका घेतली नाही, याकडे लक्ष वेधत नायडू म्हणाले की, त्यामुळे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जीएसटी विधेयक बहुमताने नाही तर एकमताने पारित व्हावे, अशी सरकारची भूमिका आहे.
आजची बैठक अतिशय समाधानकारक राहिली, सर्व विरोधी पक्षांनी सरकारला सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले, असे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितले.
विरोधकांनी सर्व मुद्दे सभागृहात उपस्थित करावे, सरकारची चर्चेची तयारी आहे, सरकार चर्चेला घाबरत नाही, असे अनंतकुमार यांनी स्पष्ट केले.
गुलाम नबी आझाद
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद म्हणाले की, गुणवत्तेच्या आधारावर विधेयक पारित करण्यासाठी सरकारला सहकार्य करायला कॉंग्रेस तयार आहे. विधेयक विनाकारण अडवण्याची आमची भूमिका नाही.
राष्ट्रीय हितासाठी कोणत्याही विधेयकाला पाठिंबा देण्याची कॉंग्रेस पक्षाची तयारी असल्याचे आझाद यांनी सांगितले.
जम्मू काश्मिरातील हिंसाचाराच्या मुद्यावर सरकारला घेरण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे, असे स्पष्ट करत आझाद म्हणाले की, काश्मिरातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या मुद्यावर सभागृहात चर्चा घडवली जाईल आणि सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले जाईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29150

Posted by on Jul 18 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (138 of 2453 articles)


मुंबई, [१७ जुलै] - नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर झालेल्या अमानुष हत्येनंतर गृहमंत्री किंवा राज्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट ...

×