Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » राजस्थान पत्रिकेला प्रेस कौन्सिलची चपराक

राजस्थान पत्रिकेला प्रेस कौन्सिलची चपराक

=सरसंघचालकांच्या विधानाचा विपर्यास=
DR MOHAN BHAGWATनवी दिल्ली, [७ ऑगस्ट] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विधान तथ्यांचा विपर्यास करून प्रकाशित केल्याबद्दल प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने राजस्थान पत्रिका या आघाडीच्या वृत्तपत्राच्या संपादकांना फटकारले असून, अर्धसत्यावर आधारित संपादकीय प्रकाशित केल्याबद्दल ८ जुलै २०१५ रोजी दिलेल्या आदेशात राजस्थान पत्रिकेला दोषी ठरविले आहे.
जयपूर येथील डॉ. रमेशचंद्र अग्रवाल यांनी २०१३ मध्ये प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे यासंबंधी तक्रार दाखल केली होती. राजस्थान पत्रिकेच्या संपादकांना पाठविलेल्या पत्राची कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे, रमेशचंद्र अग्रवाल यांनी थेट प्रेस कौन्सिलकडेच दाद मागितली होती. सरसंघचालकांच्या इंदूर येथील भाषणाचा विपर्यास करून, त्यावर राजस्थान पत्रिकेने संपादकीयातून भाष्य केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.
राजस्थान पत्रिकेने ‘बेशर्मशीर्ष’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या संपादकीयामध्ये डॉ. मोहनजी भागवत यांच्या इंदूर येथील भाषणातील काही वाक्ये संदर्भ सोडून प्रकाशित केली होती. त्यामुळे विवाहासारख्या पवित्र संबंधांबाबत समाजात चुकीचा संदेश गेला होता. अशाप्रकारे सरसंघचालकांचे वक्तव्य संदर्भाशिवाय प्रकाशित करून, राजस्थान पत्रिकेने सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि रा. स्व. संघासारख्या संघटनेचा अपमान केला आहे, असे डॉ. रमेशचंद्र अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले होते.
डॉ. अग्रवाल यांनी राजस्थान पत्रिकेच्या संपादकांना पत्र लिहून, त्यांच्या हातून झालेली चूक दुरुस्त करण्याची व त्यांनी पाठविलेला खुलासा प्रकाशित करण्याची विनंती केली होती. परंतु, राजस्थान पत्रिकेकडून या संदर्भात कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे, डॉ. अग्रवाल यांनी २९ ऑगस्ट २०१३ रोजी राजस्थान पत्रिकेला कारणेदाखवा नोटीस बजावली होती. परंतु, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. याउलट या वृत्तपत्राने आपल्या लेखी निवेदनात अग्रवाल यांची तक्रार आधारहीन व असत्य असल्याचे सांगितले. आपण जे प्रकाशित केले ते सत्यावर आधारित आहे, तसेच इतर वृत्तपत्रांनीदेखील डॉ. भागवत यांचे वक्तव्य अशाचप्रकारे प्रकाशित केल्याचा वृत्तपत्राचा दावा होता. डॉ. अग्रवाल यांनी राजस्थान पत्रिकेचा हा दावा सपशेल फेटाळून लावत वृत्तपत्रावर कारवाई करण्याची मागणी प्रेस कौन्सिलकडे केली होती.
या प्रकरणी प्रेस कौन्सिलच्या चौकशी समितीची अखेरची बैठक ६ एप्रिल २०१५ रोजी पार पडली. त्यामध्ये तक्रारकर्ते डॉ. अग्रवाल यांच्या वतीने जी. एस. गिल, हरभजनसिंग यांनी आणि राजस्थान पत्रिकेतर्फे अंकित आर. कोठारी यांनी युक्तिवाद केला. भारतीय व पाश्‍चात्य तत्त्वज्ञान यामधील फरक स्पष्ट करताना डॉ. भागवत यांनी, आपले विचार अधिक सुस्पष्टपणे मांडण्याच्या दृष्टीने पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानात प्रचलित सामाजिक कराराच्या सिद्धांताचे उदाहरण दिले होते. तथापि, सरसंघचालक स्वतः या सामाजिक कराराच्या सिद्धांताचे समर्थक आहेत, असा अर्थ संपादकीयातून निघत होता. वस्तुस्थिती मात्र तशी नाही. या वर्तमानपत्राने त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करून प्रकाशित केले आहे, असा युक्तिवाद अग्रवाल यांच्या वकिलाने केला.
राजस्थान पत्रिकेने सरसंघचालकांच्या भाषणातील नेमका तोच संदर्भ सोडून उर्वरित वक्तव्य तेवढे प्रकाशित केले, असा निष्कर्ष सरसंघचालकांचे भाषण आणि संपादकीय भाष्य वाचल्यानंतर चौकशी समितीने काढला. राजस्थान पत्रिकेने सत्यस्थितीसह यासंबंधीचे वृत्त योग्य ठिकाणी प्रकाशित करावे, असे निर्देश चौकशी समितीने दिले असून, तसा अहवाल प्रेस कौन्सिलला सादर केला. सरसंघचालकांच्या भाषणाचा विपर्यास करून, संपादकीय प्रकाशित केल्याबद्दल प्रेस कौन्सिलने देखील राजस्थान पत्रिकेचा निषेध करताना या वृत्तपत्राच्या संपादकांना चांगलेच फटकारले.
सरसंघचालक आणि संघाच्या नेत्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास करून, समाजात संंभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न वृत्तपत्रे आणि वृत्त वाहिन्यांकडून केले जाण्याची अनेक उदाहरणे आहेत. डॉ. भागवत यांच्या इंदूर येथील भाषणाबाबतही असेच झाले. चौकशी समितीच्या निर्देशांनंतरही डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणाचे योग्य वृत्त अद्याप राजस्थान पत्रिकेने प्रकाशित केलेले नाही. त्यामुळे पुढील कारवाईबाबतही विचार सुरू आहे, असे डॉ. रमेशचंद्र अग्रवाल यांनी सांगितले. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने राजस्थान पत्रिकेबाबत दिलेल्या या सडेतोड निर्णयापासून इतर वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी धडा घेण्याची गरज आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23595

Posted by on Aug 9 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1528 of 2453 articles)


=सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्याला निर्देश= नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] - अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात येणार्‍या सर्व भाविकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध ...

×