Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राज्यसभा निवडणूक: २७ जागांसाठी ११ला मतदान

राज्यसभा निवडणूक: २७ जागांसाठी ११ला मतदान

sansad4नवी दिल्ली, [७ जून] – राज्यसभेच्या ५७ पैकी ३० जागांवरील उमेदवार अविरोध विजयी झ्राले असून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, उत्तराखंड, कर्नाटक, राजस्थान आणि हरयाणा या सात राज्यांतील २७ जागांसाठी ११ जूनला निवडणूक होत आहे. यामुळे घोडेबाजाराला वेग आला आहे.
विशेष म्हणजे, या सात राज्यांत एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणुकीची वेळ आली आहे. त्यामुळे घोडाबाजार तेजीत आला आहे. कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात आहे. २२४ सदस्यीय विधानसभेत विजयासाठी ४५ मतांची आवश्यकता आहे. सभागृहात कॉंग्रेसचे १२३ तर जनता दल सेक्युलरचे ४० आमदार आहेत. भाजपाचेही ४० आमदार आहेत. केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमन यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. ऑस्कर फर्नांडिस आणि जयराम रमेश हे कॉंग्रेसचे दोन उमेदवार आहेत. संख्याबळाचा विचार करता हे तीन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. चौथ्या जागेसाठी कॉंग्रेसने राममूर्ती, तर जदएसने बी. एम. फारुक यांना उमेदवारी दिली आहे. आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसला १२ मतांची, तर जदएसला ५ मतांची गरज आहे. त्यामुळे राज्यात घोडाबाजाराला वेग आला आहे. २२ अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसने आपल्या ११ अपक्ष आमदारांना मुंबईला हलविले आहे.
मध्यप्रदेशातील तीन जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहे. २३० सदस्यांच्या विधानसभेत राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ५८ मतांची गरज आहे. विधानसभेत भाजपाचे १६५ आमदार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर आणि अनिल माधव दवे यांचा विजय निश्‍चित मानला जातो. कॉंग्रेसने विवेक तन्खा यांना उमेदवारी दिली आहे.
विधानसभेत कॉंग्रेसचे ५७ आमदार आहेत, त्यामुळे कॉंग्रेसला फक्त एका मताची आवश्यकता आहे. अपक्ष विनोद गोटियाही रिंगणात आहे. भाजपाजवळ अतिरिक्त ४९ मते आहेत. त्यामुळे गोटिया यांना जिंकण्यासाठी फक्त ९ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील निवडणूक फारशी कठीण नाही.
राजस्थानमधील चार जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. राज्य विधानसभेच्या २०० जागा असून, राज्यसभेच्या एका जागेसाठी ४१ मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. भाजपाचे राज्यात १६१ आमदार आहेत, त्यामुळे संख्याबळाचा विचार करता भाजपाचे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, ओमप्रकाश माथूर आणि हर्षवर्धनसिंह हे पहिले तीन उमेदवार सहज विजयी होतात. चौथ्या जागेसाठी भाजपाचे रामकुमार वर्मा यांना फक्त तीन मतांची आवश्यकता आहे. कॉंग्रेसने माजी मंत्री आणि उद्योगपती कमल मोरारका यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात कॉंग्रेसचे २३ आमदार आहेत. राज्यात अपक्ष आणि अन्य आमदारांची संख्या १६ आहे. या सर्व आमदारांनी कमल मोरारका यांना मते दिली तरी मोरारका विजयी होऊ शकत नाही. विजयासाठी त्यांना दोन मते कमी पडतात, त्यामुळे याठिकाणी चारही जागा भाजपाला मिळण्यात काही अडचण दिसत नाही.
हरयाणातील दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहे. राज्य विधानसभेत ९० आमदार असून, विजयासाठी ३१ आमदारांचा कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. राज्यात भाजपाचे ५१ आमदार आहेत. भाजपाने केंद्रीय मंत्री चौधरी वीरेंद्रसिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. भाजपाजवळ २० अतिरिक्त मते आहेत. भाजपाने दुसर्‍या जागेसाठी माध्यमसम्राट सुभाषचंद्रा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. विजयासाठी सुभाषचंद्रा यांना ११ मतांची आवश्यकता आहे. कॉंग्रेसने माजी खासदार आणि ज्येष्ठ वकील आर. के. आनंद यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात कॉंग्रेसचे १५ व लोकदलाचे १९ आमदार आहेत. याशिवाय छोट्या पक्षांचे ४ आमदार आहेत. त्यामुळे सुभाषचंद्रा आणि आर. के. आनंद यांच्यात कोण बाजी मारतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
झारखंडमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. राज्य विधानसभेत ८१ आमदार असून, विजयासाठी २८ मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. राज्यात भाजपाचे ४३ आणि मित्रपक्षांचे ४ असे ४७ आमदार आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा विजय निश्‍चित मानला जातो. भाजपाजवळ १९ मते अतिरिक्त आहेत, त्यामुळे भाजपाने महेश पोद्दार यांना उमेदवारी दिली आहे. पोद्दार यांना विजयासाठी ९ मतांची आवश्यकता आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने वसंत सोरेने यांना उमेदवारी दिली आहे. वसंत सोरेन शिबू सोरेन यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. झामुमोजवळही १९ आमदार आहेत. त्यामुळे सोरेन यांनाही विजयासाठी ९ मतांची आवश्यकता आहे. राज्यात कॉंग्रेसजवळ ७ तर बाबुलाल मरांडी यांच्या पक्षाजवळ २ मते आहेत. ही मते कोणाकडे जातात, त्यावर राज्यातील निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
उत्तराखंडमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. ७० सदस्यीय विधानसभेतील कॉंग्रेसचे ९ आमदार निष्कासित झाल्यामुळे सभागृहाचे संख्याबळ ६१ झाले आहे. त्यामुळे विजयासाठी ३१ मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला. कॉंग्रेसने प्रदीप टम्टा यांना उमेदवारी दिली आहे. गीता ठाकूर आणि अनिल गोयल हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहे. विशेष म्हणजे, भाजपाने आपला उमेदवार दिला नाही. कॉंग्रेसजवळ २७ मते असून टम्टा यांच्या विजयासाठी कॉंग्रेसला चार मतांची आवश्यकता आहे. भाजपाजवळ २८ मते असून भाजपा आपली ही मते अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी उभी करू शकतो. आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपाला ३ मतांची आवश्यकता आहे. कॉंग्रेसची मदार अपक्ष आणि बसपाच्या आमदारांवर आहे. त्यामुळे याठिकाणी कॉंग्रेसचे प्रदीप टम्टा विजयी होतात की भाजपा समर्थित अपक्ष उमेदवार विजयी होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री हरीश रावत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28536

Posted by on Jun 8 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (256 of 2453 articles)


राजनयिक, रेल्वेतील सुधारणांना विशेष पसंती ऑनलाईन सर्वेक्षणातील निष्कर्ष नवी दिल्ली, [७ जून] - केंद्रातील सत्तेची दोन वर्षे पूर्ण करणार्‍या ...

×