Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्यातही डाळींचे साठे जप्त

राज्यातही डाळींचे साठे जप्त

toor-dal-poteनवी दिल्ली/मुंबई, [२१ ऑक्टोबर] – पाच राज्यांमधील धाडसत्रात डाळीचा ५८०० टन साठा जप्त करण्यात आल्यानंतर काळाबाजारी आणि साठेबाजांविरुद्ध महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये मंगळवारी टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये २३,३४० टन इतका डाळींचा साठा ताब्यात घेण्यात आला. यामुळे एका दिवसातच डाळीच्या किमतीत घसरण झाली असून, आगामी आठ दिवसांतच किमतीत आणखी मोठी कपात होण्याचे चित्र दिसू लागले आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने राज्य सरकारच्या माहितीचा हवाला देताना वृत्तसंस्थेला सांगितले की, मंगळवारी दिवसभर १६ जिल्ह्यांमधील २७६ ठिकाणी धाडसत्र राबविण्यात आले. सणासुदीच्या दिवसांत नफा कमावण्यासाठी डाळींची साठेबाजी करणार्‍या व्यापार्‍यांच्या अनेक ठिकाणांची कसून झाडाझडती घेण्यात आली आणि २३,३४० टन साठा बाहेर काढण्यात आला.
यातील बहुतांश डाळीवर गिरण्यांमध्ये प्रक्रिया झालेली नाही. मुंबई, ठाणे आणि पनवेल येथून डाळींचा सर्वाधिक साठा ताब्यात घेण्यात आला. आज बुधवारीही अन्य काही जिल्ह्यांमध्ये धाडसत्र सुरूच असून, या धाडींची माहिती नंतर जाहीर करण्यात येईल, असे या अधिकार्‍याने सांगितले.
साठेबाज आणि काळाबाजार करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आल्यामुळे पुरवठा तर वाढलाच, शिवाय किमती कमी होण्यासही यामुळे मदत मिळत आहे, असे अधिकारी म्हणाला. साठेबाजीमुळे मागणीच्या तुलनेत डाळीचा पुरवठा कमी झाल्याने देशभरात डाळीची प्रति किलो किंमत २०० रुपयांच्या वर गेली होती. मंगळवारी मुंबईत डाळीचा भाव १७५ रुपये होता. तो आज बुधवारी १६६ रुपयांपर्यंत खाली आला.
भाव लवकरच घसरतील : जेटली
साठेबाजांवर तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या धाडसत्रात आतापर्यंत ३६ हजार टन डाळ जप्त करण्यात आली असून, आयातित डाळ बाजारात आल्यावर येत्या काही दिवसांत डाळीचे भाव कमी होतील, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी सांगितले.
डाळींची उपलब्धता आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंतप्रधानांतर्फे गठित समूहाची पहिली बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्राच्या देखरेखीखाली राज्यांमध्ये ३२९० ठिकाणी छापे मारण्यात आले असून, ३६ हजार टन डाळ जप्त करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले. साठेबाजीला आळा घालणे ही राज्य सरकारांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25254

Posted by on Oct 22 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1300 of 2451 articles)


नवी दिल्ली, [२१ ऑक्टोबर] - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे भवितव्य अवलंबून आहे. संसदेच्या ...

×