Home » क्रीडा, ठळक बातम्या » राष्ट्रकुल स्पर्धेचा शानदार समारोप

राष्ट्रकुल स्पर्धेचा शानदार समारोप

ग्लास्गो, [३ ऑगस्ट] – गेल्या ११ दिवसांपासून स्कॉटलंडच्या ग्लास्गो शहरात सुरू असलेल्या २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज रात्री उशिरा झालेल्या एका रंगीबेरंगी आणि दिमाखदार सोहोळ्यानंतर समारोप झाला. या क्रीडा महाकुंभात सहभागी झालेल्या खेळाडूंनी चार वर्षानंतर म्हणजे २०१८ साली पुन्हा भेटण्याचे आश्‍वासन देत एकमेकांचा भावपूर्ण वातावरणात निरोप घेतला. २०१८ साली ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅण्ड प्रांतातील गोल्ड कोस्ट या शहरात राष्ट्रकुल स्पर्धा होणार असून, आज झालेल्या समारंभात स्पर्धेची मशाल शहराच्या महापौरांकडे सोपविण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
ग्लास्गोच्या हॅम्पडेन पार्क येथे झालेल्या शानदार समारोप समारंभात पुन्हा एकदा स्कॉटलंडच्या कला आणि संस्कृतीची झलक बघायला मिळाली. त्यानंतर स्कॉटलंडच्या काही कलाकारांनी आपली कला सादर केली. कायली मिनॉग आणि लुलू या दोघींनी आपल्या आकर्षक नृत्याविष्काराने उपस्थित प्रेक्षकांना रिझविले.
थाळीफेफ प्रकारात रौप्य पदक जिंकणारी सीमा पूनिया ही समारोप समारंभात भारतीय पथकाची ध्वजवाहक होती. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी शेकडो पदकांसाठी एकमेकांना झुंज दिली. परंतु, ती खेळभावनेनेच.
इंग्लंडने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर असलेले ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडून काढले आणि २० व्या राष्ट्रकुल स्पर्धेत १७३ पदकांसह अव्वल स्थान पटकावले. १९८६ नंतर म्हणजेच तब्बल २८ वर्षानंतर इंग्लंडने पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. आता २०१८ साली मायदेशात होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पुन्हा अव्वल स्थान प्राप्त करण्याची संधी मिळेल.
वेल्सची रिदमिक जिम्नॅस्ट फ्रँकी जोन्सचा डेव्हिड निक्सन पुरस्काराने यावेळी गौरव करण्यात आला. ग्लास्गो शहराने आजपर्यंतचे सर्वात उत्तम आणि यशस्वी आयोजन केले, असे कॉमनवेल्थचे अध्यक्ष आणि मलेशियाचे राजे इम्रान यांनी यावेळी सांगितले. ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी युनिसेफ आणि इतर संघटनांसाठी एकूण ५ दशलक्ष पाऊंड्‌सची देणगी गोळा करण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14664

Posted by on Aug 4 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2387 of 2455 articles)


=आठ लाख युझर्सना फटका= नवी दिल्ली, [३० जुलै] - तंत्रज्ञान जसजसे व्यापक होत जाते, सर्वदूर पोहोचते तसतसे त्याच्यात अडथळे येण्याचे ...

×