Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधी यांनी प्रकल्प रखडून ठेवले!

राहुल गांधी यांनी प्रकल्प रखडून ठेवले!

=राहुल गांधींची लुडबुड होतीच! : जयंती नटराजन यांचा गौप्यस्फोट • कॉंग्रेसला रामराम=
Jayanti Natarajanनवी दिल्ली, [३० जानेवारी] – गांधी घराण्याशी एकनिष्ठ मानल्या जाणार्‍या माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी शुक्रवारी थेट सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर हल्ला केला असून, संपुआ-२ सरकारच्या कार्यकाळात राहुल गांधी यांनी पर्यावरणाचे कारण देत मोठमोठे प्रकल्प रखडून ठेवायला भाग पाडले, असा गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली येथे शुक्रवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत आपल्या कार्यकाळातील काही खळबळजनक खुलासे करतानाच जयंती नटराजन यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत असल्याचाही निर्णय जाहीर केला. कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनच माझे कुटुंब पक्षासोबत राहिले आहे. त्यामुळे आजचा क्षण माझ्यासाठी खूपच दु:खद आहे. मी ज्या कॉंग्रेसमध्ये होते ती कॉंग्रेस आज उरली नसून, पक्षातील लोकशाहीच संपुष्टात आली आहे, असा आरोप नटराजन यांनी केला. मी माझ्या पूर्ण क्षमतेने देश आणि पक्षाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. मंत्री या नात्याने पर्यावरणाचे रक्षण करणे माझे कर्तव्य होते आणि तेच मी केले, असेही नटराजन म्हणाल्या.
पर्यावरण मंत्री असताना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वैयक्तिकरीत्या आणि त्यांच्या कार्यालयाने मोठ्या प्रकल्पांना विरोध करणारी अनेक स्वयंसेवी संस्थांची निवेदने माझ्याकडे पाठविली आणि पर्यावरणाचे रक्षण होईल, हे सुनिश्‍चित करण्यास सांगितले. मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनी आक्षेप घेतल्यानंतरही पक्ष आणि सरकारची भूमिका म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले. यामुळेच ओडिशाच्या नियामगिरी येथील वेदांता ग्रुपच्या ३० हजार कोटींच्या प्रकल्पाला मी मंजुरी दिली नाही, असेही नटराजन यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीला शंभर दिवस उरले असताना पक्ष संघटनेत काम करण्याच्या नावाखाली मंत्रिमंडळातून मला वगळण्यात आले आणि दुसर्‍याच दिवशी राहुल गांधी यांनी फिक्कीच्या कार्यक्रमात यानंतर कोणतेही प्रकल्प पर्यावरणामुळे रखडणार नाहीत, असे सांगितले. मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर मला पक्षात कोणतेही काम न देता खड्यासारखे बाजूला सारण्यात आले. याबाबत मी सोनिया व राहुल गांधी यांच्याकडे सातत्याने विचारणा केल्यानंतरही मला कोणतेही उत्तर मिळाले नाही आणि त्यामुळेच आज हा दु:खद निर्णय घ्यावा लागला. आर्थिक विकासाला खीळ बसल्याचा ठपका माझ्यावर ठेवण्यात आल्यामुळे हे स्पष्टीकरण दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इच्छा नसताना मोदींवर टीका
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर कथित स्नूपगेटप्रकरणी इच्छा नसतानाही पक्षाची भूमिका म्हणून हल्ला केला. केंद्रीय मंत्री असल्याने मोदींवर टीका करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवू नये आणि वैयक्तिक टीका करण्यापेक्षा त्यांच्या ध्येयधोरणावर टीका करावी, अशी भूमिका मी घेतली होती. परंतु, हायकमांडचा आदेश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आल्यामुळे मी मोदींवर टीका केली. आपल्या कार्यकाळातील कामकाजाची सीबीआय किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून चौकशी झाल्यास आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच नटराजन यांनी टाकलेल्या या जबरदस्त बॉम्बगोळ्यामुळे पक्षाची मोठीच अडचण झाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20187

Posted by on Jan 31 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2142 of 2453 articles)


=केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन= नवी दिल्ली, [३० जानेवारी] - महत्त्वाच्या व संवेदनशील प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी आपल्यावर ‘बाह्य ...

×