Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » ‘रेनकोट’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

‘रेनकोट’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

=नरेंद्र मोदी यांच्या माफीची कॉंग्रेसची मागणी,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याबाबत केलेल्या रेनकोट विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या विधानाबद्दल मोदी यांनी माफी मागावी, अशी कॉंग्रेसची मागणी होती. माफी मागितली नाही तर मोदी यांच्यावर बहिष्कार घालण्याची घोषणाही कॉंग्रेसने केली आहे. या मुद्यावरून लोकसभेत कॉंग्रेसने सभात्याग केला, तर राज्यसभेचे कामकाज दोनदा स्थगित करण्यात आले.
आज राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच माकपाचे सीताराम येचुरी यांनी मोदी यांच्या विधानाचा मुद्दा उपस्थित केला. मोदी यांचे विधान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अवमान करणारे आहे, असा आरोप करत येचुरी यांनी मुद्यावर चर्चेची मागणी केली. कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनीही या मुद्यावर मोदी यांच्यावर हल्ला चढवला. एका पुस्तकाचा संदर्भ देत मोदी यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल लोकांच्या भावनांना ठेस पोहोचवली, ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे, असे ते म्हणाले. मोदी यांनी ते पुस्तक पटलावर ठेवले नाही, असे शर्मा यांचा दावा होता.
आपल्यावर होणार्‍या आरोपांना उत्तर देण्याचा पंतप्रधान मोदी यांना पूर्ण अधिकार आहे, याकडे सभागृहाचे नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लक्ष वेधले. या मुद्यावरून कॉंग्रेस सदस्य अतिशय आक्रमक भूमिकेत होते. त्यांनी वेलमध्ये धाव घेत मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. संतप्त सदस्यांना शांत होण्याचे, आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन उपाध्यक्ष कुरियन करत होते. मात्र कॉंग्रेस सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कॉंग्रेस सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे सभागृहाचे कामकाज आधी दुपारी १२ पर्यत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. या मुद्यावरून सरकारला घेरण्याची व्यूहरचना कॉंग्रेसने आखली आहे. आज सकाळी राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या दालनात सभागृहातील व्यूहरचना ठरवण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली होती.
लोकसभेतही गदारोळ
पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याबाबत केलेल्या विधानावरून आज लोकसभेतही गदारोळ झाला. कॉंग्रेसने या मुद्यावरून मोदी यांच्या माफीची मागणी करत सभात्याग केला. पंतप्रधानांनी माजी पंतप्रधानांबाबत केलेल्या विधानाची माहिती आम्हाला वृत्तपत्रातून मिळाली, अशी विधाने करून त्यांनी माजी पंतप्रधानांचा अवमान केला. संसदीय लोकशाहीत हे योग्य नाही, असे कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी शून्य तासात हा मुद्दा उपस्थित करतांना म्हटले.
पंतप्रधानांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही, मोदी यांची अशी वागणूक योग्य नाही. माजी पंतप्रधानांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, असे सांगत खडगे यांनी मोदी यांच्या माफीची मागणी केली. कॉंग्रेसचे सदस्य या मुद्यावरून वेलमध्ये येत घोषणा देऊ लागले. दुसर्‍या सभागृहात झालेला मुद्दा या सभागृहात उपस्थित करण्याची अनुमती देता येत नाही, असे सभापती सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी महाजन यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. दोन दिवसांपासून सभागृहात शून्य तास होऊ शकला नाही, आजही तुम्ही गोंधळ घालून अन्य सदस्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला. विशेष म्हणजे सोनिया गांधी यावेळी सभागृहात उपस्थित होत्या. खडगे यांना काही सूचना देतांना त्या दिसत होत्या. सभापतींच्या भूमिकेच्या विरोधात कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=34701

Posted by on Feb 10 2017. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (58 of 2453 articles)


►अनेक पंतप्रधानांचा अपमान केला, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अपमान करण्यात आला, असा ...

×