Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » लष्कराची गरज ओळखून केंद्राची धडक कारवाई

लष्कराची गरज ओळखून केंद्राची धडक कारवाई

=संरक्षण तज्ज्ञांची प्रतिक्रिया=
dgmo-bakshiनवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] – भारताने बुधवारी गुलाम काश्मिरात केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी पूर्णपणे समर्थन केले आहे. भारताच्या सहनशीलतेच्या व संयमाच्या सर्व सीमा ओलांडल्यानंतर अशा प्रकारची ठोस कारवाई अतिशय आवश्यकच होती, असे मतही या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतीय लष्कराला नेमके काय हवे आहे हे लक्षात घेऊन व सैन्याची गरज लक्षात घेऊन सरकारने ही कारवाई केली आहे याचा मला अतिशय आनंद आहे, असे रोखठोक मत पायदळाचे माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल एस. प्रसाद यांनी व्यक्त केले. लष्कराला अतिशय अचूक माहिती पुरविणार्‍या गुप्तचर सूत्रांचे मी विशेष अभिनंदन करतो, असेही प्रसाद यांनी पुढे नमूद केले.
भारताची कारवाई अपेक्षित नव्हे तर अटळ होती, अशी प्रतिक्रिया ‘रॉ’ चे माजी प्रमुख सी. डी. सहाय यांनी व्यक्त केली. केवळ उरी व पठाणकोटच्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने ही कारवाई केलेली नाही. सीमेपलीकडील घुसखोरीचा प्रदीर्घ इतिहास आहे. हे सारे लक्षात घेऊन भारताने ही कारवाई केल्याचे सहाय यांनी स्पष्ट केले. लष्करी मोहिमेचे माजी महासंचालक (डीजीएमओ) मेजर जनरल बक्षी यांनीही या कारवाईचे जोरदार समर्थन केले होते. भारतावर बर्‍याच दिवसांपासून ऋण होते, ते आज फेडले गेले आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कारवाईला पाठिंबा दर्शविला. मेजर जनरल बक्षी यांनी यापूर्वी जम्मू-काश्मिरातील अनेक दहशतवादविरोधी मोहिमांचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्यांचे मत महत्त्वाचे मानले जाते.
भारताने आधी मुत्सद्देगिरी करून पाकिस्तानची राजनयिक कोंडी केली. त्यानंतर आर्थिक कोंडीच्या दृष्टीने पावले उचलली आणि आता तिसर्‍या टप्प्यात प्रत्यक्ष लष्करी कारवाई करून आमच्याजवळ सर्वच प्रकारची आयुधे असल्याचे दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया माजी एअर मार्शल पी. एस. अहलुवालीया यांनी व्यक्त केली.
विविध क्षेत्रातील दिग्गजांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाची स्तुती केली आहे. संरक्षण विश्‍लेषक मनमोहन सिंग यांनी ही कारवाई अतिशय विचारपूर्वक करण्यात आली असल्याचे सांगितले. भारताने केलेली ही धडक कारवाई पाहता आम्ही देखील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरास पात्र आहोत हे सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.
माजी राजदूत विवेक काटजू यांनीही भारतीय सैन्याच्या पाकिस्तानातील कारवाईवर त्यांचे मत मांडले आहे. स्वत:च्या देशात चालणार्‍या दहशतवादी कारवायांना आटोक्यात ठेवण्यास जर पाकिस्तान असमर्थ असेल आणि त्यामुळे जर शेजारी देशाला त्रास होणार असेल तर भारताने केलेली ही कारवाई योग्यच आहे, असे म्हणत त्यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’चे समर्थन केले आहे.
भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख फाली मेजर यांनीही भारताच्या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे. पण, यासोबतच त्यांनी सतर्कतेचा इशाराही दिला आहे. भारताने गुलाम काश्मीरमध्ये जाऊन केलेली कारवाई पाहता सीमारेषेवर सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळेच पाक संतप्त व अस्वस्थ आहे.
पाकिस्तान या हल्ल्यानंतर शांत न बसता सीमा भागात काही लहानमोठ्या सशस्त्र चकमकी घडवून आणू शकतो. त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे, असा इशाराही फली मेजर यांनी दिला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29322

Posted by on Sep 30 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (88 of 2453 articles)


मुंबई, [२८ सप्टेबर] - गानकोकिळा म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज बुधवारी वाढदिवस आहे. लता मंगेशकर ...

×