Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू नैसर्गिक नव्हता

लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू नैसर्गिक नव्हता

=सरकारने फाईल्स सार्वजनिक करून, तपास समिती नेमावी, अनिल शास्त्री यांची मागणी=
anil-shastriनवी दिल्ली, [२६ सप्टेंबर] – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित काही फाईल्स पश्‍चिम बंगाल सरकारने सार्वजनिक केल्यानंतर आता माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या रहस्यमय मृत्यूचाही मुद्दा उपस्थित झाला आहे. शास्त्री यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हताच. त्यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्याशी संबंधित सर्व दस्तावेज सार्वजनिक करावे आणि त्यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी समिती गठित करावी, अशी मागणी लालबहादूर शास्त्री यांचे पुत्र व कॉंगे्रसचे नेते अनिल शास्त्री यांनी केली.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अनिल शास्त्री म्हणाले की, शास्त्रीजींचा मृत्यू नैसर्गिक होता, यावर बहुतांश लोकांचा विश्‍वास नाही. कारण, मृत्यूनंतर त्यांचा चेहरा निळा झाला होता, तसेच त्यांची डायरीही दिसत नव्हती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके सत्य बाहेर आणण्यासाठी सरकारने सर्व गोपनीय फाईल्स सार्वजनिक करायलाच हव्या.
ताश्कंदमधील शास्त्रींच्या खोलीत टेलिफोन नव्हता. त्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाल्यानंतरही त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळू शकली नव्हती. तेथील भारतीय दूतावासानेही दुर्लक्ष केले होते. माझ्या वडिलांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे माझ्या कुटुंबाला आणि देशवासीयांनाही जाणून घ्यायचे असल्याने नरेंद्र मोदी सरकारने या प्रकरणातील सत्य बाहेर आणावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
लालबहादूर शास्त्री यांच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी व्हावी, ही मागणी पहिल्यांदा झाली नाही. यापूर्वी जुलैमध्ये त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हीच मागणी केली होती. त्यावेळी एका इंग्रजी दैनिकाच्या मुलाखतीत अनिल शास्त्री म्हणाले होते की, माझ्या आईचे निधन १९९३ मध्ये झाले होते आणि माझ्या वडिलांची हत्याच झाली, असा विश्‍वास तिला आयुष्याच्या अखेरपर्यंत होता.
कॉंगे्रसमध्ये भूकंप
दरम्यान, अनिल शास्त्री यांच्या मागणीमुळे कॉंगे्रस पक्षात जणू भूकंपच आला आहे. अनिल शास्त्री यांना आतापर्यंत आपल्या वडिलांच्या मृत्यूची आठवण का झाली नाही. ४५ वर्षांनंतरच त्यांना वडिलांच्या मृत्यूची चौकशी का करावीशी वाटत आहे. हा कॉंगे्रसला ‘ब्लॅकमेल’ करण्याचाच एक प्रकार आहे, असे मत कॉंगे्रसचे नेते संदीप दीक्षित यांनी व्यक्त केले. अन्य काही वरिष्ठ नेत्यांनीही अनिल शास्त्री यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
शवविच्छेदनही झाले नव्हते : कुलदीप नायर
अनिल शास्त्री यांची मागणी योग्य अशीच आहे. नेहरू-गांधी घराणे इतर कुणालाही श्रेय देण्यास उत्सुक नव्हते, असे स्पष्ट करताना लालबहादूर शास्त्री यांचे त्यावेळचे माध्यम सल्लागार कुलदीप नायर यांनी शास्त्रींसोबतच्या शेवटच्या भेटीचा संदर्भ एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला. शास्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खोलीत प्रवेश करणारी पहिली व्यक्ती मी होतो. खोलीत प्रवेश करताच मला धक्का बसला. त्यांच्या चपला व्यवस्थित होत्या, पण थर्मास खाली पडलेला होता. मृत्यूनंतर शवविच्छेदनही झाले नव्हते. त्यांच्या मृत्यूची चौकशी झाल्यास कोणत्याही चौकशी समितीपुढे उपस्थित होण्याची आणि साक्ष देण्याची माझी तयारी आहे, असेही नायर यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24074

Posted by on Sep 27 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1401 of 2453 articles)


पाटणा, [२६ सप्टेंबर] - पाच टप्प्यांत होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकीत १२ ऑक्टोबर रोजीच्या पहिल्या टप्प्यात ४९ मतदारसंघात होणार्‍या मतदानासाठी आज ...

×