Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » लालूप्रसादांचे दोन लाल वादाच्या भोवर्‍यात

लालूप्रसादांचे दोन लाल वादाच्या भोवर्‍यात

laluprasad-yadavनवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] – बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या दोन्ही मुलांना निवडणूक रिंगणात उतरवत घराणेशाहीच्या राजकारणाचे आपण पुरस्कर्ते असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली पत्नी राबडीदेवी आणि मुलगी मिसा भारती हिला उमेदवारी दिली होती. या दोघींनाही मतदारांनी नाकारले होते. त्यामुळे लालूप्रसादांच्या या दोन्ही मुलांबाबत मतदार यावेळी काय निर्णय घेतात, ते मतमोजणीनंतर समजणार आहे.
लालूप्रसाद यादव यांनी तेजप्रताप आणि तेजस्वी यादव या आपल्या दोन मुलांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरविले आहे. तेजप्रताप हा मोठा, तर तेजस्वी हा लालूप्रसादांचा लहान मुलगा आहे. तेजप्रताप यादवबहुल महुआ, तर तेजस्वी राघोपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. राघोपूर मतदारसंघ सुपौल तर महुआ वैशाली जिल्ह्यात आहे. आपल्या वडिलांप्रमाणे तेजप्रताप आणि तेजस्वी यादव हे दोघेही निवडणुकीपूर्वीच पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी चर्चेत येण्याचे कारण आहे, या दोघांचे वय. सामान्यपणे कोणत्याही घरात मोठ्या भावाचे वय हे लहान भावापेक्षा जास्त असते. पण लालूप्रसादांच्या घरातील सगळेच विचित्र आहे. निवडणुकीच्या अर्जासोबत या दोघांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले, त्यात लहान असलेल्या तेजस्वी यादवचे वय मोठ्या असलेल्या तेजप्रताप यादवपेक्षा जास्त दाखवले आहे. म्हणजे तेजस्वी हा २६ वर्षांचा, तर तेजप्रताप हा २५ वर्षाचा असल्याचे दर्शवण्यात आले आहे. हा सारा गोंधळ मतदारयादीमुळे झाल्याचे या दोन भावांचे म्हणणे आहे. म्हणजे, मतदारयादीत तेजस्वीचे वय २६, तर तेजप्रतापचे वय २५ दर्शविण्यात आले आहे. मतदारयादीतील माहितीप्रमाणेच उमेदवारी अर्ज भरावा लागत असल्यामुळे यादव कुटुंबात लहान भावाचे वय मोठ्या भावापेक्षा जास्त झाले आहे.
मात्र यात काही गोंधळ नाही, मतदारयादीत असलेली माहिती अंतिम असल्याचे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. तर ही ‘प्रिटिंग मिस्टेक’ असून, याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, आम्ही भाजपाला उत्तर देण्यास बांधील नसल्याचे तेजस्वी यादवने म्हटले आहे. मात्र मतदारयादीतील या घोळामुळे उमेदवारी अर्ज रद्द होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्राने सांगितले. त्यामुळे यादव बंधूंना दिलासा मिळाला आहे.
तेजस्वी यादव हा क्रिकेटर असून, झारखंडकडून तो रणजी सामने खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिलचे प्रतिनिधित्व केले आहे. तेजस्वी यादवच्या शैक्षणिक पात्रतेवरही भाजपाने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात तेजस्वी यादवने दहावीपर्यंत शिक्षण झाल्याचे म्हटले आहे.
लालूप्रसाद यादव तुरुंगात गेल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या राबडीदेवी यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक सारण मतदारसंघातून लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारतीनेही पाटलीपूत्र मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांनाही मतदारांनी नाकारले होते. त्यामुळे यावेळी लालूप्रसादांच्या या दोन मुलांचे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25000

Posted by on Oct 7 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1371 of 2452 articles)


=अरुण जेटली यांचे मत, जीएसटीला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य= न्यूयॉर्क, [६ ऑक्टोबर] - जगाला आर्थिक विकासासाठी चीनशिवायही आणखी काही खांद्यांची गरज ...

×