Home » क्रीडा, ठळक बातम्या » लुईझने मागितली देशवासीयांची माफी

लुईझने मागितली देशवासीयांची माफी

  • ब्राझीलला दारून पराभव जिव्हारी लागला
  • अध्यक्षांनाही दु:ख, चाहत्यांना भावना अनावर
  • सोशल मीडियावर टीकेचा भडीमार

साओ पाओलो, [९ जुलै] – २०१४ च्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या यजमान ब्राझीलला स्टार खेळाडू नेमार आणि कर्णधार सिल्वा यांच्या अनुपस्थितीत मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात जर्मनीकडून जो मानहानीकारक पराभव पत्करावा लागला त्याबद्दल हंगामी कर्णधार डेव्हिड लुईझने देशवासीयांची साश्रूनयनांनी माफी मागितली आहे.
जर्मनीकडून झालेल्या दारुण पराभवाबद्दल मी देशवासीयांची माफी मागतो. देशवासीयांच्या चेहर्‍यावर हास्य बघण्याची माझी इच्छा होती. फुटबॉल सामना जिंकून देशवासीयांना खुश करण्यात किती मोठा आनंद आहे याची मला कल्पना आहे. परंतु, आम्ही असे करू शकलो नाही. जर्मन संघ आमच्यापेक्षा चांगला खेळला, त्यांची तयारी चांगली होती. हा खूपच दुखद दिवस आहे आणि आम्ही यापासून धडा घेतला आहे, असे लुईझने सामन्यानंतर सांगितले.
जर्मनीकडून झालेल्या पराभवामुळे पुन्हा विश्‍वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग पावल्याने निराश झालेल्या ब्राझीलच्या चाहत्यांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि एकप्रकारे संपूर्ण देश निराशेच्या गर्तेत लोटला गेला. पराभवामुळे निराश चाहत्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि सामन्याला गैरहजर असलेल्या अध्यक्षांविरोधात जबरदस्त घोषणाबाजी केली. बलाढ्य अशी ओळख असलेला ब्राझील संघ जर्मनी संघासमोर एखाद्या दुय्यम दर्जाच्या क्लब संघासारखा वाटत होता आणि अवघ्या सहा मिनिटांमध्ये जर्मनीने चार गोल केले. मध्यांतराला ब्राझील संघ ०-५ असा माघारला होता आणि त्यामुळे नाराज शेकडो समर्थक स्टेडियममधून उठून गेले. यापैकी अनेक चाहत्यांनी खेळाडू आणि या स्पर्धेवर तब्बल ११ अब्ज डॉलर्स खर्च करून जनतेची नाराजी ओढवून घेणार्‍या अध्यक्ष डिल्मा राउसेफ यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यजमान देशाचा मानहानीकारक पराभव होत असल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता मैदानाच्या आजूबाजूला अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली. परंतु, सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.
जर्मनीकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर ब्राझीलमधील लाखो फुटबॉलप्रेमींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संघावर व्यंग्य, दु:ख आणि रागाच्या माध्यमातून टीकेची झोड उठविली. ‘ब्राझीलकडे नेमार आहे, अर्जेंटिनाकडे मेस्सी, पोर्तुगालकडे रोनाल्डो. मात्र, जर्मनीकडे संघ आहे’, असे एका चाहत्याने व्यक्त केलेल्या बोलक्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. आणखी एका पोस्टमध्ये रियो येथील प्रख्यात क्राईस्ट द रीडिमर पुतळा शरमेने खाली झुकल्याचे दाखविण्यात आले आहे. एका पोस्टमध्ये जीससच्या जागी जर्मनीच्या चान्सलर ऍन्जेला मर्केल यांचा चेहरा लावण्यात आला आहे. नेमारच्या पाठीला झालेल्या दुखापतीमुळे ब्राझीलच्या इतर ११ खेळाडूंना पक्षाघाताचा झटका आला आहे का? हे मला सांगा, अशी तिखट प्रतिक्रिया एका चाहत्याने व्यक्त केली आहे. काही चाहत्यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांबद्दल सहानुभूती दाखवली. सामना सुरू होण्यापूर्वी सर्वजण सहावे जेतेपद पटकावण्याविषयी बोलत होते. परंतु, फक्त विजयाच्यावेळी ब्राझीलसोबत असणारे हे सर्वजण संधीसाधू आहेत, असे एका चाहत्याने म्हटले. जर तुम्ही पराभूत होणार असाल तर असे पराभूत व्हा ज्यामुळे तुमचे नाव गिनीज बुकात नोंदले जाईल, अशी तिखट प्रतिक्रिया एका चाहत्याने व्यक्त केली.
सोशल मीडियानेही विक्रम मोडला
जर्मनीकडून ब्राझीलच्या पराभवामुळे फेसबुक आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरील क्रीडाविषयक सर्व विक्रम मोडीत निघाले. या सामन्यादरम्यान एकूण तीन कोटी ५५ लाख ट्विट करण्यात आले. ब्राझीलच्या फुटबॉलच्या १०० वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात वाईट पराभव आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सुपर बाउल सामन्यादरम्यान सर्वाधिक दोन कोटी ५० लाख ट्विट करण्यात आले होते. फेसबुकवर सामन्यादरम्यान २० कोटी पोस्ट, शेयर, कॉमेंट आणि लाईक्स मिळाले. यावेळी सहा कोटी ६० लाख लोक फेसबुकवर होते आणि हादेखील एक विक्रम आहे. सामन्याच्या २९ व्या मिनिटाला सॅमी खेदिराने जर्मनीकडून केलेल्या पाचव्या गोलवर सर्वाधिक प्रतिक्रिया आल्या. या गोलदरम्यान एका मिनिटात पाच लाख ८० हजार ट्विट्‌स करण्यात आले.
ब्राझीलच्या या पराभवामुळे अनेक जुने विक्रम मोडीत निघाले असून, फुटबॉलला धर्म मानणारा हा देश कधीही आठवणीची इच्छा करणार नाही असे काही विक्रम या देशाच्या नावावर नोंदले गेले आहेत.
जर्मनीकडून झालेल्या पराभवामुळे ब्राझीलने फुटबॉल इतिहासातील आपल्या सर्वात लाजिरवाण्या पराभवाची बरोबरी केली आहे. यापूर्वी उरुग्वेने सप्टेंबर १९२० मध्ये चिलीत खेळल्या गेलेल्या दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राझीलचा ६-० असा पराभव केला होता. जर्मनीकडून झालेला पराभव हा ब्राझीलचा मायभूमीतील सर्वात मोठा पराभव आहे. याआधी जानेवारी १९३९ मध्ये रियो दी जानेरियो येथे अर्जेंटिनाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मैत्री सामन्यात यजमान देशाला १-५ असा पराभव पत्करावा लागला होता. विश्‍वचषक स्पर्धेतील ब्राझीलचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. यापूर्वी १९९८ सालच्या विश्‍वचषक स्पर्धेत ब्राझीलला पॅरिस येथे फ्रान्सकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला होता.
जीवनातील सर्वात वाईट दिवस : स्कोलारी
जर्मनीकडून झालेल्या दारुण पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असून, हा आपल्या जीवनातील सर्वात वाईट दिवस आहे, असे ब्राझीलचे प्रशिक्षक स्कोलारी यांनी म्हटले आहे. विश्‍वचषक स्पर्धेतील हा सर्वात मोठा उलटफेर एखाद्या प्रलयासारखा आहे. १-७ असा पराभव पत्करावा लागणार्‍या संघाचे प्रशिक्षक म्हणून माझी आठवण केली जाईल. परंतु, जीवन इथे थांबणार नाही, असे स्कोलारी यांनी म्हटले आहे.
अध्यक्षांनाही दु:ख
ब्राझीलच्या मानहानीकारक पराभवामुळे अध्यक्ष डिल्मा राउसेफ यादेखील खूप दु:खी आणि निराश झाल्या आहेत. देशाच्या प्रत्येक नागरिकाप्रमाणेच मीदेखील खूप दु:खी आहे, असे राउसेफ यांनी ट्विटरवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
२०१८ मध्ये जेतेपट पटकावू : पेले
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी जर्मनीकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर खेळाडूंचे सांत्वन केले असून, २०१८ च्या स्पर्धेत संघ जोरदार पुनरागमन करेल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. आम्ही २०१८ साली रशियात सहाव्यांदा जेतेपद पटकावू. जर्मनीचे हार्दिक अभिनंदन, असे तीनवेळा विश्‍वविजेत्या ब्राझील संघाचे सदस्य राहिलेल्या पेले यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14119

Posted by on Jul 9 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2402 of 2455 articles)


=राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कक्षाच्या आकडेवारीवरून स्पष्ट= नाशिक, [२ जुलै] - महाराष्ट्र हे स्त्रियांसाठी सुरक्षित राज्य असल्याची बिरुदावली मिरवणार्‍या नेत्यांना राष्ट्रीय ...

×