Home » ठळक बातम्या, विदर्भ » वर्तमानातील संतांचीही ओळख व्हावी : भय्याजी

वर्तमानातील संतांचीही ओळख व्हावी : भय्याजी

=‘ओळख विदर्भातील संतांची’ स्पर्धेचा देखणा पारितोषिक वितरण समारंभ=
bhaiyyaji at santsabhaनागपूर, [२४ ऑगस्ट] – ‘आज आपल्या हिंदू समाजाचे अस्तित्व कायम टिकून राहिले याचे कारण या देशात निर्माण झालेल्या संत सज्जनांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन. आपल्या देशावर अनेक आक्रमणे झाली. अनेक वेळा संस्कृतीवर घाला पडला. पण अशा वेळेस आपले अस्तित्व टिकवून धरण्याचे कार्य संत आणि संन्याश्यांनीच केले आणि हे कार्य सातत्याने होत राहिले. ‘तरुण भारत’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून जुन्या संतांच्या ओळखीबरोबरच वर्तमानातील संतांचीही ओळख नव्या पिढीला होईल अशी आशा आहे’, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी काढले. दै. तरुण भारततर्फे आयोजित ‘ओळख विदर्भातील संतांची’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अंजनगावसुर्जी येथील देवनाथ पीठाचे अध्वर्यू जितेंद्रनाथ महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तरुण भारतचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे, प्रबंध संचालक विश्‍वास पाठक व कार्यकारी संपादक गजानन निमदेव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. श्रोत्यांच्या भरगच्च उपस्थितीत हा कार्यक्रम अंध विद्यालय परिसरातील प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात रविवारी उत्साहाने पार पडला.
आपल्या भाषणात भय्याजी जोशी म्हणाले की, ‘तरुण भारत हे एक पूर्वापार विचारपीठ आहे. समाजाला सातत्याने नवीन विचार देण्याची त्यांची कायम परंपरा आहे. संतांनी व्यक्त केलेले श्रेष्ठ विचार वृत्तपत्राच्या माध्यमातून देण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. आपल्या व्यक्तिगत आयुष्यापासून राष्ट्रीय आयुष्यापर्यंत शुद्धता टिकायची असेल तर संतांविषयी श्रद्धा असावी लागते. कुठलाही योग्य विचार ही फार मोठी शक्ती असते. अयोग्य विचार सहजतेने देता येतात पण, योग्य विचार देण्यासाठी परिश्रम करावे लागतात. काय उचित आहे, सत्य आहे व योग्य आहे याचा सारासार विवेक ठेवावा लागतो. तो तरुण भारतने प्रथमपासूनच केला. यामुळे राष्ट्राच्या उत्थानासाठी बलप्रदानाचे कार्य झालेले आहे. देशाच्या हितातच आपले हित आहे हा विचार तरुण भारतने दीपस्तंभासारखा सातत्याने दिलेला आहे.’ स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दल कौतुक करीत त्यांनी सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तरुण भारताची वाटचाल चित्रफितीच्या रुपात उपस्थितांना दाखविण्यात आली. प. पू. जितेंद्रनाथ महाराज यांचे स्वागत डॉ. विलास डांगरे यांनी केले तर मा. भय्याजी जोशी यांचे स्वागत विश्‍वास पाठक यांनी केले. अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केल्यानंतर स्पर्धेच्या स्वरुपाविषयीचे प्रास्ताविक गजानन निमदेव यांनी केले.रेवतीअनिल जिंतूरकर (प्रथम ःअंजनगावसूर्जी), ज्योती सचिन नार्लावार (द्वितीय ः आर्णी) व किशोर उरकुंडवार (तृतीय ः बेंबाळ, ता. मूल) या विदर्भातून प्रथम तीन क्रमाकांच्या विजेत्यांना सन्मानीयांच्या हस्ते याप्रसंगी पारितोषिके प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह नत्थुजी फरांदे, भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी सुरेश नंदनवार, वाघमारे मसाले प्रतिष्ठानाचे संचालक उमेश वाघमारे, विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीर दफ्तरी, संत गजानन महाराज सहकारी सोसायटीचे श्री. पौनीकर, हीट ट्रीट वेलचे संचालक श्री जामदार व बापट शॉपचे संचालक नागेश बापट या प्रायोजकांचाही सन्मानचिन्ह देवून याप्रसंगी सत्कार करण्यात आला. डॉ. विलास डांगरे यांनी समारोपीय भाषणात संत वचनांचे महत्त्व सांगून सर्वांप्रती आभार व्यक्त केले. प्रकाश एदलाबादकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अमृता सोनी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
त्याग व तपश्‍चर्या हेच संत कार्याचे अधिष्ठान : प.पू. जितेंद्रनाथ महाराज
‘समाजातील शेवटच्या माणसापर्यंत संतांची आठवण नेणे हे कार्य देवकार्य आहे. देव, देश व धर्म यांचे बिल्वपत्र तरुण भारताने या निमित्ताने संत सज्जनांना अर्पण केलेले आहे. हे कार्य ईस्वरी योजना आहे. या निमित्ताने विदर्भातल्या ४० संतांच्या पायाशी नतमस्तक होण्याची संधी तरुण भारताने समाजाला दिली. संतांचे कार्य त्याग आणि तपश्‍चर्या या दोन गुणांवर आधारले आहे याची शिकवण या निमित्ताने समाजाला प्राप्त झाली आहे.’ असे उद्गार देवनाथ पीठाचे पीठाधीश प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभांचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
आपल्या भाषणात प.पू. महाराज पुढे म्हणाले की, ‘संत हे चालते-बोलते विद्यापीठ होते. दुसर्‍याच्या कल्याणासाठी ज्याला उसंत नाही तोच खरा संत. यादृष्टीने जे देशासाठी व समाजासाठी ‘इदं न मम्’ या वृत्तीने कार्यरत असतात तेच संत असतात. त्यांच्यामुळेच देशाच्या संस्कृतीची धारणा होते. संत केवळ परर्माथी नसतात तर ते समाजसेवक, विचारवंत आणि प्रेरकही असतात. आपल्या देशात देशकाल परिस्थितीनुसार त्या त्या काळात संत झाले. जो निःस्पृह, निरपेक्ष, मौनी, शांत व निर्वैर असतो तोच खरा संत. परमेश्‍वरही स्वतःच्या शुद्धीसाठी अशाच व्यक्तींच्या पायाची माती कपाळाला लावतो.’ तरुण भारताच्या उपक्रमांविषयी बोलताना महाराज म्हणाले की, ‘आजच्या भेसूर वातावरणात तरुण भारतने पवित्र आदर्शांची स्थापना केली आहे. विचारांमध्ये स्पष्टता ठेवून जनतेचे भले करण्याची तळमळ बाळगली आहे. त्यामुळेच हे वृत्तपत्र जगन्मित्र झाले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व संतांना श्रद्धापुष्प वाहण्यासाठी समाजाला प्रेरणा मिळाली आहे. वृत्तपत्राची भूमिका समाजाच्या विकासाची असावी. कारण हीच भूमिका माणूस घडविते व जीवनात क्रांती करते. असे करणारे तरुण भारत हे एकमेव वृत्तपत्र आहे.’ पूजनीय महाराजांनी अत्यंत रसाळपणे स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करीत विजेत्यांचे अभिनंदनही केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=15954

Posted by on Aug 25 2014. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (2377 of 2455 articles)


=आखाडा परिषदेची घोषणा= अयोध्या, [२२ ऑगस्ट] - महाराष्ट्रातील नाशिक येथे आयोजित कुंभमेळ्याला पुढील वर्षीच्या १९ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल, अशी ...

×