Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » विकासासाठी महिलांचा सहभाग आवश्यक : मुख्यमंत्री

विकासासाठी महिलांचा सहभाग आवश्यक : मुख्यमंत्री

=मुंबईत नववर्ष संकल्प सभा=
devendra-fadnavis7मुंबई, [८ एप्रिल] – भारताला २१ व्या शतकात प्रगत राष्ट्र म्हणून जगाला मार्गदर्शन करायचे असेल तर महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. जोपर्यंत देशाच्या विकासात महिलांचा सहभाग वाढवत नाही तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
मराठी नववर्ष व चैत्रपाडव्यानिमित्त गिरगावात स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने नववर्ष संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर प्रतिष्ठानचे वसंत बेडेकर, ऍड. शशीकांत पवार, डॉ. अनुराधा पोद्दार, योगेश प्रभू उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गिरगावात १४ वर्षांपासून राष्ट्रभक्त युवा एकत्रित येऊन आपल्या संस्कृतीचे, धर्माचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने नववर्ष स्वागताचा सोहळा साजरा करीत आहेत. त्याचे विराट स्वरूप आज आपणा सर्वांना पहावयास मिळत आहे. ही संस्कृती नित्यनूतन आहे. जे वाईट आहे त्याचा आपल्या संस्कृतीने त्याग केला असून, आपल्या संस्कृतीत कोणत्याही जाती-धर्म आणि लिंग भेदभाव मान्य नाही. देशाचा विकास करायचा असेल तर प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे व तसा संकल्प आपण केला याचा मला आनंद आहे. महिलांच्या सहभागाशिवाय कोणताही विकास अपूर्ण आहे.
ज्यांना संस्कृतीचा अभिमान नसतो त्यांना भूतकाळ तर असतो मात्र भविष्यकाळ नसतो असेही त्यांनी नवयुवकांचे अभिनंदन करताना सांगितले. देशावर एवढी आक्रमणे झाली तरीही हा देश टिकला कारण या देशाच्या संस्कृतीत सहिष्णुता आहे. सर्व प्रकारच्या विचारांना आपल्यात सामावून घेण्याची ताकद आहे. म्हणूनच संस्कृती जिवंत असेल तरच देश जिवंत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, संपूर्ण जगाशी आपले नाते आहे, जगाचे सृष्टीशी नाते आहे, असे एकात्म विचार ज्या संस्कृतीने मांडले आणि स्वामी विवेकानंदानी त्या संस्कृतीचे वर्णन एका महासागरासारखे केल त्या महासागरात अनेक विचारांच्या नद्या येऊन मिळतात. त्याच संस्कृतीचे जतन आणि संवर्धन गिरगावात आपण करता याचा आपल्याला आनंद आहे.
महाराष्ट्रात संतपरंपरेचे दर्शन घडविणार्‍या शोभायात्रेने आज मुंबईकरांची मने जिंकली. मराठी संस्कृती, सामाजिक एकतेचा संदेश देणारे चित्ररथ शोभायात्रेत सहभागी होते. तसेच, संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश देणारा चित्ररथाचाही समावेश होता. यावेळी कलावंतांनी तालवादद्यांसह महाराष्ट्रीय संगीताचा अनोखा अविष्कार सादर केला.
यावेळी ध्वजसंचलन करण्यात आले. शोभायात्रेत पाणी प्रश्न, ऊर्जा प्रश्न, व्यसनमुक्ती, संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानासंदर्भात माहिती देणारे चित्ररथ होते. पारंपरिक क्रीडा प्रकार कबड्डी, मल्लखांब यांचे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राला लाभलेली संतांची परंपरा, शिवाजी महाराज यांचा शूर बाणा, पारंपारिक गायन, तालवाद्य यांचेही सादरीकरण करण्यात आले होते. चैत्र पाडवा साजरा करण्यासाठी तसेच हिंदू नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी या शोभायात्रेत उपस्थिती दर्शविली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27766

Posted by on Apr 9 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (505 of 2451 articles)


मुंबई, [९ एप्रिल] - मुंबईकरांना गेल्या ९१ वर्षांपासून सेवा देणारी आणि त्यांच्या मनात घर करून बसणारी डीसी विद्युतप्रवाहावर धावणारी लोकल ...

×