Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » वैद्यकीय प्रवेशांसाठी देशभरात एकच परीक्षा

वैद्यकीय प्रवेशांसाठी देशभरात एकच परीक्षा

=सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, दोन टप्प्यांत होणार नीट=
supreme_court_1नवी दिल्ली, [२८ एप्रिल] – शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमातील प्रवेशांसाठी देशभरात एकच नॅशनल एलिजिबीलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) घेण्याला सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी हिरवा कंदील दाखवला. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी दोन टप्प्यांत ही नीटची परीक्षा होणार असून, सुमारे ६.५० लाख उमेदवार ही परीक्षा देण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार, सीबीएसई आणि भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) यासंबंधी दाखल केलेल्या आराखड्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. यानुसार १ मे रोजी अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येणारी एआयपीएमटी ही परीक्षा आता नीट-१ म्हणून ओळखली जाणार आहे. ज्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही त्यांना २४ जुलै रोजी होणार्‍या नीट-२ या परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येईल. या दोन्ही परीक्षांचा संयुक्त निकाल १७ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल, जेणेकरून ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल.
सर्वोच्च न्यायालयाचा गुरुवारचा आदेश सर्व सरकारी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना लागू होणार असून, ज्यांनी आधीच परीक्षा घेतली आहे किंवा घेण्याची योजना आहे ती रद्द समजण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे याबाबतीत निर्माण झालेला संभ्रम आता पूर्णपणे दूर झाला आहे.
तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि असोसिएशन ऑफ कर्नाटक मेडिकल कॉलेजेस यासह काही अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थांनी नीटला जोरदार विरोध केला होता. आमच्यावर नीट लादता येणार नाही, असा विरोध करणार्‍यांचा दावा होता.
नीटच्या माध्यमातून एकच प्रवेश परीक्षा घेण्यासाठी केंद्र शासनाने २१ डिसेंबर २०१० रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतही सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा केली असून, या निर्णयाला आव्हान देणारी कोणतीही याचिका थेट आमच्यासमोर येईल आणि यामध्ये कोणतेही उच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ एप्रिल रोजी दिलेला निर्णय आधीच मागे घेतला असल्याने आता एकच प्रवेश परीक्षा घेण्यात काहीही अडचण नसल्याचेही न्या. ए. आर. दवे, न्या. शिवाकीर्ती सिंग आणि न्या. ए. के. गोयल यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28071

Posted by on Apr 29 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (411 of 2453 articles)


=ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरण= नवी दिल्ली, [२८ एप्रिल] - ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीत लाच घेतल्याप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी ...

×