Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » वैश्‍विक मंदीतही वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारत

वैश्‍विक मंदीतही वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारत

►अर्थसंकल्पावरील चर्चेला जेटलींचे उत्तर,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी –
जागतिक पातळीवर मंदीची परिस्थिती असतांनाही त्या परिस्थितीचा भारतावर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने केलेल्या संरक्षणात्मक उपाययोजनांमुळे जगात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत स्पष्ट केले.
अर्थसंकल्पावर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देतांना जेटली म्हणाले की, सध्या जागतिक पातळीवर मंदीची परिस्थिती आहे. याचा जगातील सर्व देशांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. जागतिक मंदीमुळे देशाच्या विकासावर आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होत असतो. कारण लोकांच्या खिशात पैसे नसल्यामुळे बाजारावर परिणाम होतो, मागणी कमी होते, त्यामुळे निर्यातीतही घट होते.
विकसित देशाच्या संरक्षणवादामुळे तसेच कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकला असता, मात्र आमच्या सरकारने या वैश्‍विक परिस्थितीचा भारतावर परिणाम होऊ नये, म्हणून अनेक संरक्षणात्मक उपाययोजना केल्या, याकडे लक्ष वेधत जेटली म्हणाले की, त्यामुळे जागतिक मंदीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नाही, उलट जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची अर्थव्यवस्था ओळखली जात आहे.
कच्च्या तेलाचे मुख्य खरेदीदार आपण आहोत. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची स्थिती होती. अशा परिस्थितीत आपली अर्थव्यवस्था खालावण्याची शक्यता होती. त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आणि त्याला यशही मिळाले, असे जेटली यांनी सांगितले.
जीएसटी देशात लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक क्रांती होईल, असे स्पष्ट करत जेटली म्हणाले की, जीएसटीमुळे देश ‘एक बाजार’ होईल. या बाजारात करावर कर आकारला जाणार नाही. आज आपल्या देशात ३० पेक्षा जास्त  बाजार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे कर आहेत, यातून सर्वांची सुटका होईल. व्यापारी आणि उद्योजकांसोबतच सर्वसामान्य माणसालाही याचा फायदा होईल. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षांनी जीएसटीचे स्वागत केले आहे.
कोणतीही अर्थव्यवस्था समांतर अर्थव्यवस्था आणि समांतर चलनव्यवस्था घेऊन चालू शकत नाही. त्यामुळे नोटबंदीचा निर्णय सरकारला घ्यावा लागला, असे स्पष्ट करत जेटली म्हणाले की, नोटबंदीच्या निर्णयानंतर बँकांत किती पैसा जमा झाला, यातील काळा पैसा किती होता, याची मोजणी सुरू आहे, याबाबत घाईगर्दीने काही सांगता येणार नाही. नोटबंदीच्या निर्णयाची सांगड आम्ही जीएसटीच्या निर्णयाशी घातली तर आमच्या लक्षात येईल, या निर्णयाचे अर्थव्यवस्थेवर किती सकारात्मक परिणाम होणार आहेत, असे जेटली म्हणाले.
आपल्या जवळपास एक तासाच्या भाषणात जेटली यांनी अर्थव्यवस्थेवर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपांचे मुद्देसूद निराकरण केले. सरकारी खर्चाने निवडणूक लढवण्याची तृणमूल कॉंग्रेसची सूचना स्वागतार्ह आहे, त्यावर चर्चा झाली पाहिजे, असे जेटली म्हणाले.
राजकीय पक्षांना यापुढे दोन हजारपेक्षा जास्त रकमेची देणगी रोख स्वरूपात घेता येणार नाही, हा निर्णय आमचा नाही तर निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून घेण्यात आला, यात कोणाला काही सुधारणा सुचवायची असेल तर वित्त विधेयकावरील चर्चेत त्याचा समावेश करता येईल, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=34697

Posted by on Feb 10 2017. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (60 of 2453 articles)


=ऍम्बी व्हॅलीवर जप्ती =लिलाव करून थकित कर्ज वसूल करा! =३९ हजार कोटींचा नागरी वसाहत प्रकल्प, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी ...

×