Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » शांततापूर्ण निवडणुकीचे श्रेय जनता, आयोग, लष्कराला : राजनाथ

शांततापूर्ण निवडणुकीचे श्रेय जनता, आयोग, लष्कराला : राजनाथ

=मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या विधानाशी असहमत, लोकसभेत विरोधकांचा सभात्याग=
RAJNATH_SINGH_19नवी दिल्ली, [२ मार्च] – जम्मू-काश्मिरात शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण श्रेय राज्यातील जनता, निवडणूक आयोग आणि लष्कर-निमलष्कर दलाच्या जवानांना जाते, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले असून, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी याबाबत केलेल्या वक्तव्याशी सरकार आणि पक्ष मुळीच सहमत नसल्याचे ठामपणे सांगितले. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे सोमवारी संसदेत तीव्र पडसाद उमटले. या मुद्यावरून गदारोळ झाल्यानंतर कॉंग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षाने सभात्याग केला. जम्मू-काश्मिरातील निवडणुका पाकिस्तान, अतिरेकी आणि हुर्रियतच्या सहकार्यामुळे शांततेत पार पडल्याचे विधान सईद यांनी केले होते. कॉंग्रेस गटनेते मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य सदस्यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. या मुद्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी संतप्त विरोधकांची मागणी होती. सईद यांच्या विधानाशी केंद्र सरकार आणि भाजपा सहमत नसल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही. या मुद्यावर आपण पंतप्रधानांशी बोललो, असे सईद यांनी म्हटले होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, ती सभागृहाला सांगावी, अशी मागणी खरगे यांनी केली. पंतप्रधांनाशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या अनुमतीने मी लोकसभेत निवेदन करत आहे, त्यामुळे कोणताही गैरसमज वा वाद करण्याचे कारण नाही, असे राजनाथसिंह म्हणाले. जम्मू-काश्मिरातील निवडणुका शांततेत पार पडल्याचे श्रेय निवडणूक आयोग, लष्कर, निमलष्करी दलाला तसेच तेथील पोलिस खात्याला असल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनतेचेही मी यसाठी मनापासून अभिनंदन करतो, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
मोदी आणि सईद यांच्यात कोणतीही गोपनीय चर्चा झाली नाही, याकडे लक्ष वेधत राजनाथसिंह म्हणाले की, लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदानाची टक्केवारी जास्त होती. राजनाथसिंह यांच्या निवेदनावर विरोधकांना आणखी चर्चेची अपेक्षा होती. मात्र, त्याला सभापती सुमित्रा महाजन यांनी अनुमती नाकारली. त्यामुळे सभागृहात थोडा गोंधळ झाला. खरगे यांना बोलू द्यावे, अशी मागणी मुलायमसिंह यादव यांनी केली. त्यावर सभापतींनी खडगे यांना बोलण्याची परवानगी दिली. हा गंभीर विषय आहे, त्यामुळे या मुद्यावर पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. किमान सभागृहाच्या तीव्र भावना सईद यांना समजाव्या म्हणून ठराव पारित करा, अशी खरगे यांची मागणी होती. मात्र, सभापतींनी अनुमती नाकारली. त्यामुळे आम्ही सभात्याग करतो, अशी घोषणा खरगे यांनी केली आणि सर्व विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21026

Posted by on Mar 3 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1990 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२ मार्च] - तरुण पिढीत मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने आणखी एक ...

×