Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » शिक्षण पद्धतीतून रोबोट तयार होऊ नयेत

शिक्षण पद्धतीतून रोबोट तयार होऊ नयेत

=२१ वे शतक ज्ञानाचे : पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन=
modi at Banaras Hindu Universityवाराणसी, [२५ डिसेंबर] – सध्या सुरू असलेले २१ वे शतक हे ज्ञानाचे शतक असून, यामध्ये भारताला फार मोठी भूमिका बजावायची आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी येथे केले.
पंतप्रधान मोदी गुरुवारी वाराणसी या आपल्या मतदारसंघाच्या एक दिवसाच्या दौर्‍यावर आले होते. आस्सी घाटावर स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेतल्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी हे प्रतिपादन केले. आपल्या शिक्षण पद्धतीतून फक्त रोबोट तयार होता कामा नये तर, प्रत्येकाचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. विज्ञान असो वा तंत्रज्ञान प्रत्येक युवा विद्यार्थ्याचे मन लवचिक असले पाहिजे. गंगेच्या या भूमीत संस्कृतीचे शिक्षण दिले जात होते. परंतु, यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाची संस्कृती इथे रुजली आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
आज जगाला उत्तम शिक्षकांची खूप गरज आहे. चांगल्या शिक्षणाचा थेट संबंध उत्तम शिक्षकांशी आहे. त्यामुळे उत्तम शिक्षक कसे तयार करता येतील याकडे आम्हाला लक्ष द्यावे लागेल. मुलांना उत्तम शिक्षक होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे पोषक वातावरण यासाठी आम्हाला निर्माण करावे लागेल. शिक्षक होण्यास उत्सुक असलेला विद्यार्थी फक्त परीक्षा देण्यासाठी अभ्यास करणार नाही तर, तो आपल्या शिक्षकांचे निरीक्षण करून त्यांच्यापासून प्रेरणा घेईल, असे पंतप्रधानांनी बनारस हिंदू विद्यापीठातील स्वतंत्रता भवनात झालेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
जीवनात यशस्वी झालेले लोक नेहमीच याचे श्रेय आई आणि शिक्षकांना देत असतात. त्यामुळे असे लोक घडविण्यात आम्हाला यश मिळाले तर आम्ही जगाची शिक्षकांची गरज भागवू शकतो. संपूर्ण जग सध्या भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे, याची जाणीव मला गेल्या सहा महिन्यांमध्ये झाली आहे. संगीत, नृत्य किंवा इतर कलांचा समावेश असलेली संस्कृती हेच आमचे बलस्थान आहे आणि तो अमूल्य ठेवा आहे, असे सांगतानाच, सुशासन हे देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19322

Posted by on Dec 26 2014. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (2300 of 2452 articles)


वर्धा, [२५ डिसेंबर] - मोगलांच्या आक्रमणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही हिंदूंनी मुस्लिम धर्म स्वीकारला. तर ख्रिश्‍चनही मुळात हिंदूच होते. याचा ...

×