Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नवे धोरण

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नवे धोरण

=मुख्य सचिवांनी घेतला आढावा=
farmer suicidesमुंबई, [६ जून] – राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता नवीन धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू असून त्याअंतर्गत यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यांचे प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या दोन जिल्ह्यांच्या ११ उपविभागांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सचिव स्तरावरील अधिकार्‍यांनी क्षेत्रभेट दिल्यानंतर त्याबाबत आढावा घेणारी बैठक मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज मंत्रालयात घेतली.
सचिवांकडून प्राप्त झालेली माहिती आणि सूचनांचा समावेश नवीन धोरणात करण्यात यावा, जे शेतकरी बँकिंग नेटवर्कच्या बाहेर आहेत त्यांना राष्ट्रीयीकृत अथवा सहकारी बँकेचे खातेदार करून पतपुरवठा उपलब्ध होईल यासाठी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले.
राज्यातील शेतकरी आत्महत्यामागील कारणांच्या मुळाशी जाऊन त्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांनी नवीन धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी यवतमाळ व उस्मानाबाद या जिल्ह्यांची सर्वेक्षण करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली. या दोन जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त व आत्महत्याप्रवण क्षेत्रातील प्रत्येक उपविभागाकरिता सचिव दर्जाच्या ११ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालयीन स्तरावरील सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांनी आपल्या उपविभागातील गावांना भेटी दिल्या. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांशी या अधिकार्‍यांनी संवाद साधला. आत्महत्येची कारणे जाणून घेतली. तालुकास्तरावरील विविध विभागांच्या अधिकार्‍यांशी देखील त्यांनी चर्चा करून बैठका घेतल्या. दोन्ही जिल्ह्यांच्या क्षेत्रभेटी आटोपल्यानंतर त्यातबाबतचे निष्कर्ष आणि सूचनांवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
काही तालुक्यांमध्ये ३० ते ४० टक्के शेतकरी कुठल्याही बँकेचे खातेदार नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांना खाजगी सावकारांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे अशा शेतकर्‍यांचे तातडीने जनधन योजनेच्या माध्यमातून खाते उघडण्याची मोहीम हाती घ्यावी, जलसंधारणाची तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती देऊन जलसाठ्याच्या विकेंद्रीकरणाचे काम वाढवावे जेणे करून शेतीला पाणी मिळेल, गावातील सरपंच, पोलिस पाटीलांच्या माध्यमातून वैफल्यग्रस्त शेतकरी किंवा अडचणीतील शेतकरी कुटुंबाबाबतची माहिती योग्य वेळी प्रशासनाकडे पोहोचल्यास अशा कुटुंबाला तातडीने मदत उपलब्ध करून देणे शक्य होईल. त्यामुळे सरपंच, पोलिस पाटील यासह अन्य पदाधिकार्‍यांनी वेळोवेळी अशा स्वरूपाची माहिती दिल्यास उपाययोजना करणे सोपे होईल, सामूहिक विवाह सोहळ्यांची संख्या वाढवावी, समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमावर भर द्यावा, कृषी पतपुरवठा सक्षम करावा, शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नवीन पिढीतील शेतकर्‍यांना करून द्यावी व शेती उत्पादकतेवर भर द्यावा, इत्यादी सूचना यावेळी करण्यात आल्या.
सचिवांनी केलेल्या सूचनांचा समावेश नवीन धोरणात करावा, अशा सूचना देऊन मुख्य सचिव म्हणाले की, केंद्र शासनाने ज्या नवीन विमा योजना सुरू केल्या आहेत त्यांची यशस्वी अंमलबजावणी या दोन्ही जिल्ह्यात झाली पाहिजे. दुसर्‍यांदा आपण या जिल्ह्यांमध्ये क्षेत्रभेटी कराल त्यावेळी बँकांच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन शेतकर्‍यांना पत पुरवठा सुलभ पद्धतीने कसा होईल यासाठी प्रयत्न करावा, असेही मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22711

Posted by on Jun 7 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1657 of 2451 articles)


=योगेंद्र यादव यांनी डागली तोफ= वाराणसी, [६ जून] - राजधानी दिल्लीत नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात ...

×