Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शेतकरी योद्धा हरपला

शेतकरी योद्धा हरपला

=लक्षावधी कार्यकर्ते हळहळले, मंगळवारी अंत्यसंस्कार=
Sharad Joshi1पुणे, [१२ डिसेंबर] – शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणारे, त्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि कृषी मालाला योग्य हमी भाव मिळावा, यासाठी देशव्यापी आंदोलन छेडणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार शरद जोशी यांचे आज शनिवारी सकाळी नऊ वाजता वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
वृद्धापकाळ आणि अनेक आजारांनी ग्रासले असतानाही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शरद जोशी शेतकर्‍यांच्या हितासाठी सक्रिय होते. शनिवारी सकाळी नऊ वाजता पुण्यातील निवासस्थानीच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली.
२००४ ते २०१० या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. भाजपा आणि शिवसेनेच्या पाठिंब्याने ते संसदेच्या या वरिष्ठ सभागृहावर निवडून गेले होते. खासदार म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात १६ संसदीय समित्यांवर काम केले होते. शरद जोशी यांच्या मुली विदेशात असल्याने, त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तथापि, अंत्यविधी कुठे आणि कधी करायचा याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
शेतकरी चळवळीत शरद जोशी यांचं फार मोठं योगदान होतं. नाशिकच्या कांदा आंदोलनाने शरद जोशी प्रसिद्धीच्या झोतात आले आणि शेतकर्‍यांमध्ये त्यांनी स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. १९७७ मध्ये ते स्वित्झर्लंडमधील आंतरराष्ट्रीय ब्युरो ऑफ युनिव्हर्सल पोस्टल युनियनमध्ये अतिशय मोठ्या जबाबदारीवर कार्यरत होते. ही जबाबदारी सोडून ते भारतात आले आणि त्यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी व्यापक चळवळ उभारली.
१९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतकर्‍यांविषयीची कळकळ, सहज आणि सोप्या भाषेत संवाद साधण्याची शैली, या गुणांमुळे शरद जोशींनी आपला वेगळाच ठसा उमटवला होता. १९८० मध्ये नाशकात कांदा आणि ऊस दराच्या मुद्यावर शरद जोशी शेतकरी संघटनेला घेऊन रस्त्यावर उतरले आणि शरद जोशी हे नाव घराघरात पोहोचले. आपले गृहराज्य अर्थात महाराष्ट्रात शेतकर्‍यांसाठी अनेक आंदोलने यशस्वी केल्यानंतर शरद जोशी यांनी पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात यासारख्या राज्यांमध्ये शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक आंदोलने केली. याशिवाय, केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्येही त्यांनी शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी यशस्वी आंदोलने केलीत. १९८६ मध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील त्यांच्या महिला शेतकरी आणि कृषी कामगार मेळाव्यात दोन लाखांवर लोक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, ते राज्यसभा सदस्य असताना या सभागृहात महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे ते एकमेव सदस्य होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आरक्षण पुरेसे नाही, असे त्यांचे ठाम मत होते.
आयुष्यात प्रथमच राजकीय क्षेत्रात प्रवेश करताना त्यांनी १९९४ मध्ये स्वतंत्र भारत या नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. देशाची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्था बदलविण्याचा आणि सरकारी हस्तक्षेप अतिशय कमी करण्याचा निर्धार त्यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यातून व्यक्त केला होता.
शोकसंवेदना
शरद जोशी यांच्या निधनाचे वृत्त वार्‍यासारखे महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यात पसरताच, समाजाच्या सर्वच स्तरांवरील अनेक मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर जणू दु:खाचा आघातच झाला. आपल्या लाडक्या नेत्याचे दर्शन घेण्यासाठी अनेकांची पावले पुण्याकडे वळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य, भाजपाचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंगे्रस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
शेतकर्‍यांचे प्रश्‍न हिरीरीने मांडणारा चळवळीतील कार्यकर्ता, शेती अर्थव्यवस्थेला जागतिक व्यासपीठावर मार्गदर्शन करणारा आणि चळवळीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारा नेता आज आपण गमावला. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्ध व्हावी, यासाठी त्यांचे समर्पित जीवन आणि संघर्ष कायम स्मरणात राहील.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
शरद जोशी यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले. शेतकर्‍यांच्या व्यथा आणि शेतीविषयक परिपूर्ण माहितीची जाण असलेला नेता म्हणून माझ्याकरीता ते कायम आदरणीय होते, राहतील. विदेशातील मोठ्या पदाची नोकरी सोडून केवळ शेतकर्‍यांच्या कल्याणाकरिता त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले.
– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
शेतकर्‍यांचा सर्वेसर्वा, विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आमच्यातून निघून गेला. शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेत कार्यकर्ते नाही, तर कौटुंबिक फळी निर्माण केली होती. आमचा कुटुंब प्रमुख आम्हाला पोरका करून गेला.
– सरोज काशीकर, माजी आमदार
रग्गड वेतन आणि मानाची नोकरी सोडून शेतकर्‍यांसाठी शरद जोशी आयुष्यभर लढले. त्यांचे निधन वेदनादायी असून, शेतकर्‍यांसाठी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. भीक नको, हवे घामाचे दाम, म्हणून ते आयुष्यभर शेतकर्‍यांसाठी लढत राहिले.
– विजय जावंधिया, शेतकरी नेते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26174

Posted by on Dec 13 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1020 of 2451 articles)


[gallery ids="26170,26169,26168,26167,26166,26165"] बीड, [१२ डिसेंबर] - परळीतील १८ एकर परिसरात उभारण्यात आलेल्या ‘गोपीनाथगड’ या स्मारकाचे आज शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ...

×