Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » शेतकर्‍यांची दिशाभूल करू नका: मोदी

शेतकर्‍यांची दिशाभूल करू नका: मोदी

=पंतप्रधानांची विरोधकांवर टीका=
NARENDRA MODI 16खंडवा, [५ मार्च] – भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या भूसंपादन विधेयकाच्या मुद्यावरून विरोधक शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी येेथे केला.
रालोआ सरकारच्या भूसंपादन विधेयकात एकही शेतकरीविरोधी तरतूद असेल तर ती निदर्शनास आणून द्या, असे आवाहन मी राज्यसभेत सदस्यांना केले होते. शेतकरीविरोधी तरतूद असेल तर त्यामध्ये बदल करण्याची माझी तयारी आहे. परंतु, विरोधकांनी अशाप्रकारचा कोणताही मुद्दा निदर्शनास आणून दिला नाही. त्यांना फक्त सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्यातच रस आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी येथील सिंगाजी औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना सांगितले. राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्यामुळे आम्ही काही कायदे पारित करू शकत नाही हे सत्यच आहे. राज्यसभेत तुमचे बहुमत असल्यामुळे विरोधकांनीच मदत करावी अशी विनंती आहे. परंतु, बहुमताच्या जोरावर तुम्ही देशाच्या विकासाआड येऊ नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना केले.
भाजपा सरकार गावांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु, विकासाच्या कोणत्याही योजना राबविण्यासाठी जमीन ही आवश्यकच असते. मात्र, आधीच्या संपुआ सरकारने असा कायदा पारित केला होता की त्यामध्ये जमीनच मिळण्याची शक्यता नव्हती. तत्कालीन सरकारने लोकसभा निवडणुकीत याच कायद्याचे तुणतुणे वाजविले. परंतु, देशातील जनतेने त्यांना प्रतिसाद दिला नाही. गरीब शेतकर्‍यांसाठी घर उभारणी, त्यांनी पिकविलेले अन्नधान्य बाजारात नेण्यासाठी पक्का रस्ता आवश्यक आहे. शिवाय नुसती वीज असून काम भागणार नाही. शेतीच्या सिंचनाला पाणी देण्यासाठी कालवे लागणार व त्यासाठीदेखील जमीन लागणार आहे. शेतकर्‍यांकडे तिसरा नेत्र असतो आणि कशामुळे आपले भले होणार हे त्यांना चांगले कळते. परंतु, काही लोक शेतकर्‍यांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही शेतकर्‍यांच्या हिताकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. म्हणूनच आम्ही शेतकर्‍यांनाही निवृत्तीवेतन देण्याची योजना अर्थसंकल्पात सादर केली आहे. यासाठी तुम्ही दररोज एक रुपयाची बचत करा. निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
ऊर्जेविना जीवनात बदल नाही
वीज उपलब्ध झाल्याशिवाय देशाचा विकास आणि पर्यायाने जीवनात बदल घडणे शक्य नाही. त्यामुळेच आम्ही शक्य त्या सर्व स्रोतांमधून विजेचे उत्पादन वाढविण्यावर भर देत आहोत. विकासात ऊर्जेचे महत्त्वाचे योगदान आहे. आज आम्ही वीज वाचविली तर ती येणार्‍या पिढीच्या कामी येणार आहे. गेल्या ९-१० महिन्यात देशात विजेचे उत्पादन ११ टक्क्यांनी वाढले आहे. याशिवाय आहे ती वीज वाचविण्यासाठी आम्ही एलईडी बल्ब लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. वीज वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. विजेमुळे केवळ घरातच प्रकाश पडतो असे नसून जीवनही प्रकाशमान होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
कोळसाच नव्हे कारभारच काळा
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आधीच्या संपुआ सरकारवर जोरदार आसूड ओढले. केवळ कोळसाच नव्हे तर त्यांचा संपूर्ण कारभारच काळा होता. म्हणूनच एका कुटुंबाकडून चिठ्ठ्या पाठवून कोळसा खाणींचे वाटप करण्यात आले. यामुळे सरकारच्या तिजोरीत एकही पैसा जमा झाला नाही. याउलट सर्वोच्च न्यायालयाने खाणवाटप रद्द केल्यानंतर आम्ही अतिशय पारदर्शी पद्धतीने कोळसा खाणींचे वापट केले आहे. आतापर्यंत २०३ पैकी फक्त १९ खाणींचा लिलाव झाला असून, त्यामधून सरकारच्या तिजोरीत सुमारे एक लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. कोळसा खाणींच्या लिलावातून मध्यप्रदेशच्या तिजोरीतही तब्बल ४० हजार कोटी रुपये जमा होणार आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
मी चौकीदारच
संधी मिळाली तर मी पंतप्रधान नव्हे तर प्रधान सेवक आणि चौकीदार म्हणून काम करीन आणि कुणालाही सरकारी तिजोरीवर डल्ला मारू देणार नाही, असे आश्‍वासन दिले होते आणि या आश्‍वासनाचे तंतोतंत पालन करून मी अत्यंत पारदर्शी पद्धतीने कारभार करत आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21143

Posted by on Mar 6 2015. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1965 of 2453 articles)


२५ वर्षात पहिला द्विपक्षीय दौरा संसदेला संबोधित करणार नवी दिल्ली, [५ मार्च] - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ मार्चपासून ...

×