Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शेतकर्‍यांना कर्जमुक्तच करणार

शेतकर्‍यांना कर्जमुक्तच करणार

  • मुख्यमंत्र्यांचा निर्धार
  • कर्जमाफी रामबाण उपाय नाही
  • कृषी विकासाला नवसंजीवनी
  • २०१९ पर्यंत महाप्रकल्प पूर्ण करणार
  • शिवस्मारक ४० महिन्यांत साकारेल

FADNAVIS_DEVENDRA1मुंबई, [१७ मार्च] – राज्यातील दुष्काळावर तात्पुरती मलमपट्टी करण्याचा सरकारचा मानस नसून, कायमस्वरूपी उपाययोजना करून शेतकर्‍यांना स्वत:च्या पायावर उभे करू आणि त्यानंतर कर्जमुक्त करू, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
केवळ कर्जमाफी हा रामबाण उपाय नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र नैसर्गिक संकटात सापडलेला असला तरी त्यावर मात करून नव्याने विकासाची गरुडझेप घेत आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत व्यक्त केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करणार असल्याचा ‘रोडमॅप’च जाहीर केला. मुख्यमंत्र्यांच्या प्रभावी उत्तराने विरोधकांना चांगलाच धोबीपछाड दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, उद्योगक्षेत्रात ४ टक्क्यांवरून ६.२ टक्के इतकी वाढ झाल्याचे आर्थिक पाहणीत समोर आले आहे. १५ वर्षांत सतत शेती व शेतकर्‍यांवर प्रतिकूल परिणाम करणारी संकटे आलीत. त्यामुळे शेतीमधे नवीन बदलांची गरज आहे. शेतकर्‍यांना पायाभूत सुविधा दिल्याशिवाय तो सक्षम होणार नाही. शेतकरी सक्षम करणे यालाच सर्वाधिक प्राधान्य हे सरकार देत आहे. त्यासाठी कृषिपंपाच्या १ लाख प्रलंबित जोडण्या पूर्ण करणार आहे. १ लाख कृषिपंपाना सौरवीज देतानाच, तीन वर्षात १ लाख सिंचन विहिरी पूर्ण करणारच, असा निर्धार व्यक्त केला.
राज्याच्या इतिहासात यंदा केंद्राची मदत सर्वाधिक असल्याचे स्पष्ट करताना, संपुआने ७० हजार कोटींची कर्जमाफी देशात दिली. पण, महाराष्ट्रात केवळ ६९१० कोटीची कर्जमाफी झाली. त्यातून ६ लाख शेतकर्‍यांना लाभ झाला. मात्र, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत फक्त ९४४ कोटी कर्जमाफी झाली. आजही ३४ हजार कोटींचे कर्ज शेतकर्‍यांच्या डोक्यावर असून, कर्जमाफीने आत्महत्या थांबणार नसल्याचे ते म्हणाले.
मेक इन इंडिया वरील विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकर्‍यांशिवाय मेक इन महाराष्ट्र पूर्ण होऊच शकत नाही. कोकाकोला सोबत संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. वस्त्रोद्योगांसाठी रेमंड्‌स कंपनीसोबत सामंजस्य करार केला. पालघरच्या आदिवासींसाठी वारली हाट देखील उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी आत्महत्यांचे आकडे चुकीचे
शेतकरी आत्महत्या आकडेवारीत केंद्राला पाठवलेल्या माहितीमध्ये महाराष्ट्राचीच चूक झाल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली. मात्र, नॅशनल क्राईम ब्युरोची आकडेवारी अधिकृत माहिती असते, असे स्पष्ट करत २००९- ३१४१, २०११- ३३३७, २०१२ -३६८७ आणि २०१५ वर्षी ३२८८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी दिली.
विदर्भ, मराठवाड्यातील गावांना एक हजार कोटी
राज्यात १५ हजार ७४७ गावांमधे टंचाई जाहीर केली आहे. पण, अंतिम पैसेवारी कमी येऊनही विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील गावांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे समावेश नसलेल्या या गावांसाठी १ हजार कोटींचे पॅकेज देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार योजना लोकांनी डोक्यावर घेतल्याचे सांगत, या योजनेत गावांचा समावेश करण्यासाठी लोकांचा दबाव आहे. या योजनेतून ६ लाख हेक्टर सिंचन तयार झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वर्षाअखेर ४० हजार सिंचन विहिरी तयार होतील, असा विश्‍वास आहे. तीन वर्षात १ लाख सिंचन विहिरी निश्‍चितपणे पूर्ण होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळ
नवी मुंबई विमानतळाचे काम मागील अनेक वर्षे रखडलेले आहे. पण या प्रकल्पाच्या प्रलंबित ८ परवानग्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच दिवसात दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. एका महिन्यात या विमानतळाच्या पूर्व विकास कामांचे कार्यादेश दिले जाणार असून, प्रवासी वाहतुकीचा पहिला टप्पा डिसेंबर २०१९ मधे सुरू होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
 ट्रान्स हार्बर लिंक
अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाच्या सर्व परवानग्या एका वर्षातच आणल्या असून, ऑक्टोबर २०१६ मधे या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. चार वर्षात हा मुंबईकरांना वाहतुकीच्या जाचातून मुक्त करणारा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबईकरांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा कोस्टल रोड २००३ ला घोषित झाला. पण केंद्राची एकही परवानगी या प्रकल्पाला मिळाली नसल्याचा दाखला देत, केवळ अकरा महिन्यांत या प्रकल्पाच्या सर्व परवानग्या मिळवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ३१ एप्रिलला या प्रकल्पाच्या निविदा जाहीर होतील, तर १६ ऑक्टोबरला कामाचा कार्यादेश दिला जाणार आहे. १५ जुलै २०१९ ला कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27418

Posted by on Mar 18 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (624 of 2451 articles)


मुंबई, [१७ मार्च] - राजधानी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील घोटाळा आणि अवैध सावकारी प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ ...

×