Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » शेतकर्‍यांना पाच हजार रुपये पेन्शन

शेतकर्‍यांना पाच हजार रुपये पेन्शन

=मुलांना रोजगारही मिळणार • हुसैनीवाला येथे शहीदांना नमन करताना पंतप्रधानांची घोषणा=
indian-farmer2हुसैनीवाला (पंजाब), [२३ मार्च] – हुतात्मा दिनाचे औचित्य साधून इंग्रजांच्या कचाट्यातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी प्राणाहुती देणारे शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि बटुकेश्‍वर दत्त यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशाच्या स्वातंत्र्यातच नव्हे, तर राष्ट्राला अन्नधान्याने समृद्ध करण्यातही पंजाबची फार मोठी भूमिका असल्याचे प्रतिपादन केले. देशातील गोदामे अन्नधान्याने भरणार्‍या शेतकर्‍याच्या पाठीशी आपले सरकार खंबीरपणे उभे राहील. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या आधारावर शेतकर्‍यांकरिता पेन्शन योजना राबविली जाईल आणि त्यांना मासिक पाच हजार पेन्शन दिले जाईल. इतकेच नव्हे, तर नव्या भूसंपादन कायद्यांतर्गत ज्या जमिनींवर प्रकल्प उभे राहतील, तिथे शेतकर्‍यांच्या मुलांना रोजगारही दिला जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
अलीकडेच झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशभरातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे, याची जाणीव सरकारला आहे. सरकार नुकसानीचा आढावा घेत आहे. शेतकर्‍यांना योग्य तो मोबदला दिला जाणार आहे. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी जे काही शक्य आहे, ते सर्व आपले सरकार करणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. एक दिवस आपल्यालाही पेन्शन मिळेल, हा विचारही इतक्या वर्षांच्या काळात शेतकर्‍यांनी कधी केला नसावा. पण, आपले सरकार त्यांना पेन्शन देण्याबाबत गंभीरपणे विचार करीत आहे. त्यांना दर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
संपुआ सरकारच्या काळात भूमी अधिग्रहण विधेयक तयार झाले होते. पण, ते शेतकर्‍यांच्या हिताचे नसल्याने आम्ही त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या. या विधेयकावरून शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, तुम्ही त्याला बळी पडू नका. तुमच्या सुपीक जमिनींना सरकार एकदम हात लावणार नाही आणि ज्या जमिनी उद्योगांसाठी ताब्यात घेण्यात येतील, त्याचा योग्य मोबदला दिल्यानंतरही तिथे सुरू होणार्‍या प्रकल्पांमध्ये रोजगार प्राप्त करण्याचा पहिला अधिकार तुमच्याच अर्थात शेतकर्‍यांच्या मुलांचाच राहणार आहे. केवळ शेती करून पोट भरता येणार नाही. जो काही विकास होईल, त्यात आपली जमीन देणार्‍या शेतकर्‍यांचाही वाटा राहणारच आहे. देशाच्या विकासातच शेतकर्‍यांचा आणि पर्यायाने त्यांच्या मुलांचा विकास आहे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
आज माझ्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. पंजाबची भूमी आदरणीय आहे. राष्ट्राच्या रक्षणासाठी या भूमीने अनेक वीरपुत्रांना जन्म दिला. या भूमीला आणि शहीदांच्या वीरमातांना मी नमन करतो, असे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, इंग्रजांना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि बटुकेश्‍वर दत्त यांची प्रचंड भीती वाटत होती आणि म्हणूनच त्यांनी भारतमातेच्या या वीर पुत्रांना फाशी दिली. या वीरांना जाहीरपणे फाशी देण्याची हिंमत इंग्रजांमध्ये नव्हती आणि म्हणून त्यांनी विश्‍वासघाताने त्यांना फासावर चढविले. पंजाबमधील जनता नेहमीच देशाकरिता जगली आहे. सर्वात जास्त बलिदान याच राज्याने दिले आहे. येथील अनेक वीरांनी देशाकरिता बलिदान दिले आहे. याच राज्याने देशाची गोदामेही अन्नधान्याने भरलेली आहेत. जोपर्यंत आपला भारत देश समृद्ध होणार नाही, तोपर्यंत या शहीदांना खरी श्रद्धांजली अर्पण होणार नाही. भगतसिंग यांच्या नावाने फलोत्पादन विद्यापीठ उघडले जाईल. राम मनोहर लोहिया यांचीही आज जयंती आहे, अशी आठवण करून देताना, २०२२ पर्यंत आपल्याला अशा भारतदेशाची निर्मिती करायची आहे, जिथे प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर मिळेल. या शहिदांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जितके करू तितके कमीच आहे. देशात आमूलाग्र बदल आणूनच आपण त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करू शकतो, असेही मोदी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21692

Posted by on Mar 24 2015. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1853 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२३ मार्च] - भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत हसत शहीद झालेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना आज सोमवारी ...

×