Home » क्रीडा, ठळक बातम्या » श्रीनिवासन्, मयप्पनसह चौघांवर ठपका

श्रीनिवासन्, मयप्पनसह चौघांवर ठपका

  • आयपीएल स्पॉट फिक्सिंग
  • तीन खेळाडूंचाही समावेश
  • नावे उघड करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

srinivasan-mayapanनवी दिल्ली, [१४ नोव्हेंबर] – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या सहाव्या सत्रातील स्पॉट आणि मॅच फिक्सिंगचा तपास करणार्‍या न्या. मुकुल मुदगल समितीने सादर केलेल्या अहवालात ठपका ठेवलेली चार नावे सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी जाहीर केली असून, यामध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष एन. श्रीनिवासन्, त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पन, राजस्थान रॉयल्स संघाचे मालक राज कुंद्रा आणि आयपीएलचे प्रशासक सुंदररमन यांचा समावेश असल्याने क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. न्या. मुदगल समितीमध्ये तीन खेळाडूंच्या भूमिकेवरही ठपका ठेवला असला तरी सध्याच्या घडीला त्यांची नावे जाहीर करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान खुल्या न्यायालयात सातही जणांची नावे जाहीर करण्यात आली. परंतु, यामध्ये तीन खेळाडू असल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने त्यांची नावे उघड न करण्याचे निर्देश दिले.
न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान समितीचा अहवाल वाचून दाखविला. न्या. मुदगल समितीच्या अहवालाचा काही विशिष्ट भाग नावे उघड करण्यात आलेल्या चौघांनाही उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून तो प्राप्त झाल्यानंतर चार दिवसात त्यांना यावर आपला आक्षेप नोंदविता येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्या. मुदगल समितीच्या अहवालात एकूण १३ नावांचा समावेश आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयामुळे २० नोव्हेंबरला होणारी बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून, या प्रकरणी अंतिम सुनावणी २४ नोव्हेंबरला होणार आहे.
न्या. मुदगल समितीने काही दिवसांपूर्वीच आपला अहवाल सादर केला होता. त्यावर गेल्या सोमवारी सुनावणी होणार होती. पण, हा संपूर्ण अहवाल वाचला नसल्याचे सांगून न्यायालयाने सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली होती. त्याचसोबत लिफाफ्यात नमूद खेळाडूंची नावे जाहीर केली जाऊ नये, यावर दोन्ही बाजूच्या वकिलांचे एकमत झाले. २० नोव्हेंबरला बीसीसीआयची निवडणूक होत आहे. जर अहवालात श्रीनिवासन् यांचे नावे नसेल, तर त्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी बीसीसीआयने केली होती. तथापि, न्यायालयाने याप्रकरणी थेट निरीक्षण देण्याचे टाळले होते. शुक्रवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने अहवालातील चार जणांची नावे वाचून दाखविली. न्या. मुदगल समितीच्या अहवालातील काही नावे जाहीर झाल्यामुळे क्रिकेट वर्तुळाला हादरा बसला असून, यासोबतच श्रीनिवासन् यांचा अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा मार्ग आता जवळपास बंद झाला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18258

Posted by on Nov 15 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2344 of 2455 articles)


कोलकाता, [१३ नोव्हेंबर] - सराव सामन्यात झकास फलंदाजी करूनही निवड समितीच्या डोळ्यात न भरलेला शैलीदार फलंदाज रोहित शर्मा याला कोलकाता ...

×