Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद

श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद

=दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब=
shrihari aneyमुंबई, [२१ मार्च] – राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी लातूर येथील एका कार्यक्रमात विदर्भ आणि मराठवाडा वेगळा होण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य केले हेाते. त्याचे पडसाद आज सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने सभागृहात प्रचंड गदारोळ केला आणि अणे यांच्या हकालपट्टीची मागणी केली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज चा वेळा तहकूब करावे लागले. दरम्यान, राज्य सरकार महाधीवाक्त्यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहात स्पष्ट केले. मात्र, विरोधी पक्षांसह सत्ताधारी सदस्यांनीही श्रीहरी अणे यांच्या निलंबनाची मागणी रेटून धरल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
सोमवारी विधासभेचे कामकाज सुरू होताच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्‍नोत्तराचा तास बाजूला सारवत नियम ९७ ची सूचना देऊन अणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांच्या निलंबनाची मागणी केली. याआधी वेगळ्या विदर्भाची, तर आता वेगळ्या मराठवाड्यासंदर्भातील वक्तव्य केल्याने याला सरकारचा पाठिंबा आहे का? असा सवाल उपस्थित केला. सोबतच महाधिवक्ता पदावरून अणे यांना तत्काळ हटवा, अशी मागणी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राला तोडण्याची ही भाषा असून, त्यांना कुणाचा पाठिंबा आहे, असा सवाल केला. यामुळे जनक्षोभ वाढण्याची शक्यता असल्यामुळे अणे यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणीही पाटील यांनी केली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील अणेंच्या निलंबणाची जोरकस मागणी केली.
माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, महाधिवक्ता यांची नेमणूक राज्य घटनेच्या १६५ नियमानुसार केली जात असून, त्यांनी काय करावे आणि काय करू नये हे लिखित असतानाही त्यांनी या नियमांचे उलंघन केले आहे. त्यांनी स्वत: पदाचा राजीनामा द्यावा अथवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली. यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे तालिका सभापतींनी सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केलेल्या वक्तव्याशी राज्य सरकार सहमत नसून, त्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री योग्य निर्णय घेऊन उद्या मंगळवारी सकाळी कामकाज सुरू होताच जाहीर करतील, अशी ग्वाही देत पुढील कामकाज सुरू करा, अशी विनंती केली. पण, विरोधक गोंधळ घालत असल्याने सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. सभागृहातील गोंधळ पाहता अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
परिषद दिवसभरासाठी तहकूब
सोमवारी बारा वाजता प्रश्‍नोत्तराचा तास सुरू झाला आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कॉंग्रेसचे संजय दत्त यांनी अणे यांच्या वक्तव्यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना केली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्थगन सूचना फेटाळली, मात्र सदस्यांना दोन दोन मिनिटे बोलण्याची परवानगी दिली.
अणे यांनी हिवाळी अधिवेशनात वेगळ्या विदर्भासंदर्भात वक्तव्य केले होते. रविवारी त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यासंदर्भात वक्तव्य केले. हा संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या १०५ हुतात्म्यांचा अपमान असल्याने त्यांना पदावरून पायउतार करावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
बेळगाव सीमाप्रश्‍नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच राज्य तोडण्याची भाषा महाधिवक्त्यांनी केली आहे. अणे यांनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग असून, त्यांची हकालपट्टी होईपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा पावित्रा शेकापचे भाई जयंत पाटील घेतला. अणे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केली.
दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट बोलण्यासाठी उभे राहिले. पण, विरोधी सदस्यांच्या घोषणामुळे ते मुद्दा मांडू शकले नाही. घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज ३५ मिनिटे तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज एक वाजता सुरू होताच तालिका सभापती मुझफ्फर हुसेन यांनी प्रश्‍नोत्तराचा तास संपल्याचे जाहीर करीत कामकाज पुकारले. मात्र, विरोधी सदस्यांनी कामकाज रोखून धरत अणे यांच्या हकालपट्टी करण्याची लावून धरली.
सभागृहाचे नेते व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अणे यांच्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले. तरीही विरोधी सदस्य शांत झाले नाहीत. दुष्काळावरील लक्षवेधीवर विरोधक चर्चा टाळत असल्याचा आरोप खडसे यांनी केला. वाढता गोंधळ पाहून तालिका सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
शिवसेना गैरहजर
सभागृहात महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वेगळ्या मराठवाड्याच्या भूमिकेवरून प्रचंड गदारोळ सुरू असताना सत्ताधारी आघाडीतील शिवसेना या मित्रपक्षाचा एकही सदस्य वा मंत्री वरिष्ठ सभागृहात उपस्थित नव्हता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27513

Posted by on Mar 22 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (593 of 2451 articles)


=दिल्ली पोलिसांची माहिती= नवी दिल्ली, [२१ मार्च] - देशात कायद्याने बंदी असलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेच्या चार सदस्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक ...

×