Home » ठळक बातम्या, वाणिज्य » संगणक निर्मिती क्षेत्राला उतरती कळा

संगणक निर्मिती क्षेत्राला उतरती कळा

नवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी) – भारतीय बाजारपेठेतील संगणक निर्मिती क्षेत्राला उतरती कळा लागली असून, अनेक बड्या कंपन्या या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतातील संगणकाच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १९.९ टक्क्यांची घट झाली आहे. गार्टनर या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करत असलेल्या कंपनीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, मागील तिमाहीत भारतात १.९६ लाख संगणकाची विक्री झाली असून, भारतीय संगणक बाजार निराशाजनक कामगिरी करत आहे.
स्मार्टफोन आणि टॅबलेट यांनी संगणक क्षेत्राला कडवे आव्हान निर्माण केले आहे. भारतात मागील वर्षी किती टॅबलेट विकले गेले, याची निश्‍चित आकडेवारी अजून समजू शकली नसली, तरी ही विक्री जवळपास सहा लाखांपर्यंत असू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. २०१२ साली भारतात २.६६ लाख टॅबलेट्‌सची विक्री झाली होती. त्याचबरोबरीने २०१३ सालच्या तिसर्‍या तिमाहीत जवळपास १२.८ लाख स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. ही वाढ जवळपास २२९ टक्के इतकी आहे. या तुलनेत याच कालावधीत संगणक क्षेत्रातील नोटबुकची विक्री २७ टक्क्यांनी, तर डेस्कटॉप संगणकाची विक्री ४४ टक्क्यांनी घसरली आहे. या कालावधीत सरकारी खात्यांकडून कोणत्याही प्रकारची मागणी नोंदविण्यात न आल्याने भारतीय संगणक क्षेत्राने निराशाजनक कामगिरी केली आहे. सध्याची आर्थिक स्थिती आणि राजकीय परिस्थिती पाहता कंपन्यांनी देखील मागणी स्थगित केली आहे, असे गार्टनरचे संशोधनकर्ता विशाल त्रिपाठी यांनी सांगितले. बहुतेक ग्राहकांची प्राथमिक स्वरुपातील गरज टॅबलेटकडून पूर्ण होत असल्याने सध्या लॅपटॉपपेक्षा टॅबलेटकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे या विभागात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली. असे असले तरी, उत्तर प्रदेश सरकारकडून राबविण्यात आलेल्या ‘मोफत लॅपटॉप‘ योजनेमुळे मोठ्या प्रमाणात लॅपटॉपची खरेदी करण्यात आल्याने या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला असल्याचे देखील त्यांनी पुढे सांगितले.
जपानमधील सोनी कंपनीने नुकतीच त्यांच्या संगणक विभागाची एका स्थानिक कंपनीला विक्री केल्याची घोषणा केली. त्यामुळे फेबु्रवारी महिन्यानंतर सोनीकडून भारतीय बाजारपेठेत लॅपटॉपची निर्यात केली जाणार नाही. भारतीय संगणक बाजारपेठेतील १० प्रमुख उत्पादकांपैकी चार ते पाच उत्पादकांनी या क्षेत्राकडे पाठ फिरविण्याचा निर्णय घेतला आहे. तर डेल, एचपी आणि लिनोव्हो यांसारख्या कंपन्यांनी संगणक क्षेत्रातील कंपनीचा तोटा भरून काढण्यासाठी टॅबलेट निर्मितीवर भर दिला असल्याची माहिती आयडीसीचे संशोधन व्यवस्थापक किरण कुमार यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=11025

Posted by on Feb 13 2014. Filed under ठळक बातम्या, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, वाणिज्य (2442 of 2455 articles)


मुंबई, (११ फेब्रुवारी) - ‘सिंध महोत्सवासाठी कराचीत आल्यामुळे मला खूप छान वाटत आहे. चांगली पटकथा मिळाल्यास पाकिस्तानी चित्रपटात काम करण्याची ...

×