Home » ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » संघविचारांची स्वीकारार्हता वाढली: भय्याजी जोशी

संघविचारांची स्वीकारार्हता वाढली: भय्याजी जोशी

bhaiyyaji joshiनागपूर, [१५ मार्च] – ‘‘संघाचा विचार स्वीकारण्याची मानसिकता लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. ही स्वीकारार्हता संघाच्या प्रगतीचे व वृद्धीचे लक्षण आहे. आमच्या विचारांबद्दल समाजात जी अनुकूलता निर्माण झाली आहे, तिचा उपयोग कार्यवृद्धीमध्ये कसा परिवर्तित करता येईल, या विषयीची योजना आम्ही तयार करू. येत्या वर्षभरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत संघविचार पोहोचवणे, हा आमचा उद्देश राहील. दुर्गम भागातील ग्रामीण व आदिवासी लोकांपर्यंत पोहोचणेही गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवनिर्वाचित सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले. नागपुरात सुरू असलेल्या रा. स्व. संघाच्या अ. भा. प्रतिनिधिसभेत भय्याजी जोशी यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, त्या वेळी एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते बोलत होते.
संघातील जबाबदारी ही सामूहिक स्वरूपाची असते. पद हे केवळ व्यवस्थेसाठी असते, असे सांगत ते म्हणाले की, पूर्वीच्या तुलनेत मागील वर्षी दहा हजार नवीन शाखा निर्माण झाल्या असून, जवळपास साडेपाच हजार गावांपर्यंत संघ पोहोचलेला आहे. आजपर्यंत जवळपास ५४ हजार गावे संघाने जोडलेली आहेत. नवीन संवाद माध्यमांमुळे व सोशल नेटवर्किंगमुळे युवकवर्ग फार मोठ्या प्रमाणात संघाशी जुळलेला आहे. साधारणपणे दर महिन्यात तीन हजार युवकांवर संघविचारांचा प्रभाव पडतो. बुद्धिजीवी व ग्रामीण श्रमजीवी अशा दोन्ही क्षेत्रांतील लोक संघात येण्यास उत्सुक आहेत. या सर्वांनी समाजातील नवीन आव्हानांना सामोरे जावे यासाठी संघ प्रयत्नशील राहील. आपल्या समाजातील जातिपातीच्या भिंती तोडून अस्पृश्यता व विषमता यांना कायमचे नष्ट केले पाहिजे व समाज समरस झाला पाहिजे, यासाठीही पुढील काळात संघ भरघोस प्रयत्न करेल, असे सांगत भय्याजी म्हणाले की, वनवासी क्षेत्रातही आम्ही कार्यरत राहू.
घरवापसी अभियान, काश्मीरमधील युतीचे सरकार याविषयी बोलताना ते म्हणाले की, वैचारिक व व्यावहारिक पातळीवर याचा विचार झाला पाहिजे. भूमी अधिग्रहण कायद्याविषयीसुद्धा असा विचार व्हावा. सरकारला, संघ कोणताही आदेश देत नाही, केवळ सूचना मात्र करतो. राष्ट्रवादी विचारांचा लोकसभेतील विजय, हा सामाजिक परिवर्तनाची आस असलेल्या मनोवृत्तीचा विजय आहे, असे सांगत ते म्हणाले की, सरकारचे काम समाधानकारक रीतीने सुरू आहे, अशी आमची भावना आहे. लहान-मोठ्या चुका होत असतातच, त्या सावरताही येतात. भूमी अधिग्रहण कायदा आता नव्या दुरुस्त्यांसह पुनश्‍च मांडला जाईल, ही समाधानकारक बाब आहे. राममंदिराचा मुद्दा आम्ही विसरलो नाही, असे सांगत एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले की, हिंदू धर्म ही जीवनशैली आहे. या शैलीची काही सांस्कृतिक व मूल्यात्मक परंपरा आहे. त्या परंपरेशी तडजोड करू नये, असे आम्हाला वाटते. भारताबाहेरील हिंदू समाज जर अन्यायाने पीडित असेल, तर त्याला संरक्षण देणे हे आपले काम आहे. अशा पीडित हिंदूंना आश्रयासाठी भारत हा एकच देश आहे, याचा सरकारनेही विचार केला पाहिजे. संघाच्या कार्यकर्त्यांच्या नवीन चमूत तरुणांना जास्तीत जास्त स्थान दिले जाईल, असे सांगत एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले की, शेवटी वय हे शरीरावर अवलंबून न राहता मनावर अवलंबून असते, हे लक्षात घेतले पाहिजे. तरीही नव्यांना वाव देऊन जुन्या पिढीने मार्गदर्शन करावे, अशी आमची भावना आहे. बंगालमध्ये स्त्रियांवर झालेल्या अत्याचारासंबंधी बोलताना ते म्हणाले की, या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. जगातील कोणताही सभ्य समाज अशा घटनांचा निषेधच करेल. फक्त या घटनांकडे धार्मिक दृष्टिकोनातून बघता कामा नये.
प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्यासंबंधीचा प्रस्ताव अ. भा. प्रतिनिधिसभेत पारित करण्यात आल्याची माहितीही पत्रपरिषदेत देण्यात आली. विदेशी भाषा शिकण्याविषयी कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, शिक्षण व सांस्कृतिक जडणघडण योग्य रीतीने होण्यासाठी, विशेषतः प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून अथवा घटनेने स्वीकृत केलेल्या प्रादेशिक भाषेतून दिले पाहिजे, असा आग्रह या प्रस्तावात करण्यात आलेला आहे. याचे उत्तम परिणाम दिसून येतील, अशी आशा बाळगत, यासोबतच प्रशासन व न्याय व्यवस्था यांचाही व्यवहार शासनाने भारतीय भाषांमधून करावा, असे आवाहनही या प्रस्तावात करण्यात आले आहे. मातृभाषेतून दिलेले शिक्षण वैज्ञानिक दृष्टीने व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून न देता जर विदेशी भाषेतून दिले, तर विद्यार्थी आपल्या परंपरा, संस्कृती व जीवनमूल्ये यापासून दुरावतो, अशी भावनाही या प्रस्तावात व्यक्त करण्यात आली असून, पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21484

Posted by on Mar 16 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (1903 of 2455 articles)


पुणे, [१५ मार्च] - कोमल आहे, नाजुक आहे, आहे जरा बावरी, तिला जगुद्या, जन्म घेऊ द्या, खुशाल आपल्या घरी... या ...

×