Home » ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » संघ शाखा हेच समाजपरिवर्तनाचे ऊर्जाकेंद्र: होसबळे

संघ शाखा हेच समाजपरिवर्तनाचे ऊर्जाकेंद्र: होसबळे

dattatreya-hosbaleनागपूर, [१३ मार्च] – ‘कोणत्याही प्रकारचे परिवर्तन, मग ते सामाजिक असो, सांस्कृतिक असो किंवा राजकीय असो, एका दिवसात होत नसते. त्यासाठी बराच काळ प्रचंड परिश्रम करावे लागतात. संघाच्या शाखांमधून यासाठी ऊर्जा मिळते. आज दिसणारे राजकीय परिवर्तन हे, परिवर्तनाच्या अनेक अंगांपैकी एक आहे. सध्याच्या राजकीय परिवर्तनाची दिशा समाधानकारक आहे. परंतु नवीन शासन येऊन केवळ नऊच महिने झाले आहेत. आपल्याला समाधानासाठी अजून पाच वर्षे वाट बघावी लागेल’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केले. रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला विधिवत सुरुवात झाली. सभेच्या उद्घाटनानंतर त्वरित झालेल्या पत्रपरिषदेत दत्तात्रय होसबळे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य पत्रपरिषदेस उपस्थित होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्‍नांना यावेळी दत्तात्रय होसबळे यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
जम्मू-काश्मीर मध्ये पीडीपीसोबत भाजपाने जी युती केली आहे, तेथे राज्यकारभारात भाजपाला अडचणी निर्माण होतील असे जे निर्णय घेण्यात आले, त्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना होसबळे म्हणाले की, ‘काश्मिरात जे घडले, ते अयोग्य आहे, अशी आमची भावना आहे. या घटनांशी संपूर्ण देशाच्या भावना निगडित आहेत.परंतु हे सरकार युतीचे असल्यामुळे तो एक प्रयोग समजावा. एवढ्यातच कुठलाही निष्कर्ष घाईघाईत काढणे योग्य नाही. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, काश्मिरात प्रथमतःच राष्ट्रवादी विचारांचा पक्ष सत्तेवर आला आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांचे प्रत्यत्न सुरू आहेत. या दोन्ही पक्षांचा ‘अजेंडा ऑफ अलायंस’ आहे. तो कायम ठेवावा की नाही, हा त्यांचा प्रश्‍न आहे. आपण त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा देऊ या.’
‘मागील काही काळात अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपुरात दर तीन वर्षांनी आयोजित होते. पहिल्या काळात ती दरवर्षी नागपूरला होत असे. जसजसा संघ कार्याचा विस्तार होत गेला तसतशी प्रतिनिधी सभा भारतातील अन्य शहरांमध्येही आयोजित होत असते. रेशीमबाग हे आमचे श्रद्धाकेंद्र आहे’, असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षात संघकार्यात निरंतर वाढ होत आहे. इतकेच नव्हे, तर सामान्य जनतेच्या संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत, असे सांगत ते म्हणाले की, ‘सकारात्मक विचारांना समाजाचा नेहमीच पाठिंबा असतो. संघाच्या दृष्टीने प्रत्येकच व्यक्ती देशभक्त आहे. त्यातील देशभक्ती संघ जागृत करतो. संघाची शाखा हे त्याचे ऊर्जाकेंद्र आहे. परिवर्तनाच्या प्रत्येक विषयात संघाचा सहभाग असतो.’ २००६ साली श्रीगुरुजींच्या जन्मशताब्दीच्या वेळी शाखांमध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी प्रथम प्रयत्न झाले, असे सांगत होसबळे म्हणाले की, ‘आज ३३,२२२ नित्य शाखा आहेत. मासिक शाखा, दुर्गम भागातील शाखा, साप्ताहिक शाखा असे मिळून जवळपास ५५ हजारच्या वर शाखा आहेत. संघाची कार्यवृद्धी झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात कार्यकर्ता उपलब्ध झाला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. संघाच्या साप्ताहिक शिबिरांमध्ये तसेच, संघ शिक्षा वर्गांमध्येही स्वयंसेवकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे.’
विवेकानंद सार्धशतीच्या कार्यक्रमांपासून आम्हास उत्तम प्रतिसाद प्राप्त होतो आहे. पश्‍चिम बंगालमध्ये संघ कार्य क्षीण स्वरूपात होते. परंतु पश्‍चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या संघ परिचय वर्गात १६ हजारच्या वर व्यक्तींनी सहभाग घेतला. बंगळुरू शहरात समर्थ भारत प्रकल्पालाही उत्तम प्रतिसाद मिळाला असे सांगत होसबळे पुढे म्हणाले की, ‘पंचेचाळीस प्रकारची सेवा केंद्रे चालतात. ‘युथ फॉर सर्व्हिस’ या प्रकल्पांतर्गत कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी कार्यकर्ते तयार होत आहेत.’
संघाच्या भविष्यातील योजनांविषयी बोलताना एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ‘२०१५-१६ हे वर्ष दिवंगत बाळासाहेब देवरस यांच्या जन्मशताब्दीचे आहे. या वर्षात सामाजिक समरसतेचा विचार संपूर्ण समाजात अजून प्रभावीपणे मांडण्यात येईल. जाती-पातींच्या भिंती तोडून हिंदू समाज एकरस होईल असाच आमचा प्रयत्न राहील. संघात व त्यायोगे समाजात योग आधारित जीवनशैली विकसित करण्यावर भर दिला जाईल. मातृभाषा-प्रादेशिक भाषा हेच शिक्षणाचे सर्वोत्तम भाषा माध्यम आहे, यावर आमचा विश्‍वास आहे. त्यासाठी येत्या वर्षभरात प्रयत्न होईल. तसे प्रस्तावही प्रतिनिधी सभेत येतील. ’
‘घरवापसी अभियान’ हा उपक्रम संघाचा नाही, तो ज्या संघटनेचा आहे तेच आपल्या शंकांचे समाधान करतील असे सांगत एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ‘संघाशी संबंधित किंवा संघ विचाराने प्रेरित समाजातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या संघटना व संस्था या स्वतंत्र आहेत. त्यांचे निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचे असतात.’ पुढील वर्षी अत्यंत सघन व योजनाबद्ध पद्धतीने संपर्क अभियान अंमलात आणून आमचा कार्यविस्तार आम्ही नेटाने करू व अपेक्षित परिवर्तनाच्या दिशेने अनुकूल वातावरणही तयार करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21422

Posted by on Mar 14 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (1916 of 2455 articles)


नवी दिल्ली, [१३ मार्च] - विरोधी पक्ष सभागृहात संसदीय मर्यादांचे उल्लंघन करत आहेत, असा आरोप संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी ...

×