Home » उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या » संतश्री गजानन महाराजांच्यापालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

संतश्री गजानन महाराजांच्यापालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

gajnan maharaj palkhiशेगाव, [११ जून] –
टाळ मृदुंगाचा मेळा साधुनिया |
पावलांचा त्याला ठेका मिळोनिया |
विसरले जगा सारे नर नारी |
पायी चालतीया पंढरीची वारी ॥
आषाढी एकादशीची पायदळ वारीची परंपरा कायम राखत संतश्री गजानन महाराजांची पालखी गज, अश्‍व, टाळकरी, वारकर्‍यांच्या लवाजम्यासह आज सकाळी पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी रवाना झाली. श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीचे हे ४९ वे वर्ष आहे.
टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ती चालावी पंढरीची | याप्रमाणे ही आषाढी वारीची अखंड परंपरा कायम आहे.
४९ व्या वर्षी देखील तिच शिस्त, तेच सातत्य, तोच भक्तिभाव आणि पंढरीच्या विठु माऊलीच्या भेटीची ओढ मनात ठेवून वारकरी दिंडीत सहभागी झाले होते. उन, वारा, थंडी, पाऊस याची तमा न बाळगता दिवस-रात्र मजल-दरमजल दर मुक्काम मार्गक्रमण करीत जय हरी विठ्ठल, सर्व संत व श्री गजाननाचा नामघोष करीत श्रींची पालखी पंढरपूरला दर वर्षी जाते. महाराज पंढरपूरला निघाले म्हटल्यावर सर्व शेगावकर भावुक होतात. त्यांचे चित्त सतत पालखी मार्गाकडे असते. पालखी परत येईपर्यंत श्रींचे चिंतन त्यांच्या मनात सुरू असते.
आज सकाळी महाआरती होऊन संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखीला मंदिर परिसरातून निरोप देण्यात आला.
इहलोकीचा हा देह | देव ईच्छित पाहे | धन्य धन्य आम्ही जन्मा आलो | दास विठोबाचे झालो ॥ हे भजन म्हणत पालखी वारकरी, टाळकरी भजनी, ध्वजधारी, भालदार, चोपदार, तुळशी डोक्यावर घेतलेल्या सुवासिनी टाळ मृदुंगाच्या तालावर पावली खेळत पालखी पंढरीच्या दिशेने निघाली. श्रींची पालखी सर्व तयारीनिशी वारीला निघते. सोबत वैद्यकीय सेवेसाठी फिरते रुग्णालय, पावसापासून सुरक्षितता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण व महाप्रसादाचे वितरण केले जाते. आज ११ जून रोजी निघालेली ही पायदळ वारी १३ जुलैला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. १८ जुलै रोजी पालखी शेगावकडे प्रस्थान करणार आहे. १२ जून रोजी पालखीचा मुक्काम भौरद येथे तर, १३ जून रोजी अकोला येथे मुक्काम राहणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28546

Posted by on Jun 12 2016. Filed under उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या (251 of 2451 articles)


=अलाहाबाद सज्ज= नवी दिल्ली, [११ जून] - उद्या रविवारपासून सुरू होणार्‍या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या द्विदिवसीय बैठकीसाठी त्रिवेणी संगमाचे अलाहाबाद शहर ...

×