Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » संसद, विधिमंडळात होणार प्रश्‍नोत्तराचा तास नियमित

संसद, विधिमंडळात होणार प्रश्‍नोत्तराचा तास नियमित

=राजधानीत विधानमंडळ पदाधिकार्‍यांची बैठक=
parliament porchनवी दिल्ली, [१३ एप्रिल] – संसद आणि विधिमंडळात प्रश्‍नोत्तराचा तास नियमित व्हावा, त्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजनांबाबत आज राजधानीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली संसदभवनात झालेल्या या बैठकीला काही राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि विधानमंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधानसभेचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी केले. अधिवेशन संसदेचे असो की विधिमंडळाचे, बाहेर एखादी मोठी घटना घडली की विरोधी पक्ष तो मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यासाठी आणि त्यावर तातडीने चर्चा घेण्यासाठी प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी करतात. अनेकदा विरोधकांच्या या मागणीपुढे झुकत वा घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित केला जातो.
एखाद्यावेळी पीठासीन अध्यक्षांनी या मागणीकडे लक्ष दिले नाही तर विरोधक सभागृहात एवढा गोंधळ घालतात की नाईलाजाने प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करावाच लागतो. त्यामुळे अनेकदा जनतेच्या प्रश्‍नावर सभागृहात चर्चा होत नाही.
अधिवेशन संसदेचे असो की विधिमंडळाचे प्रश्‍नोत्तराच्या तासाला अनन्यसाधारण महत्त्व असते. खासदार किंवा आमदार प्रश्‍नोत्तराच्या तासाच्या माध्यमातून आपल्या भागातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधतात आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारला भाग पाडतात. सरकारकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही तर पूरक प्रश्‍नांच्या माध्यमातून संबंधित खात्यांच्या मंत्र्याला धारेवर धरतात. एखाद्या आमदाराने वा खासदाराने असा एखादा प्रश्‍न उपस्थित केला की अन्य आमदार, खासदारही त्याला पाठिंबा देतात. मात्र अनेकवेळा सभागृहात गोंधळ झाल्यामुळे वा प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करण्यात आल्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर चर्चा होत नाही. अनेक आमदार आणि खासदार आज आपला प्रश्‍न चर्चेला येणार म्हणून तयारी करून येतात, अशावेळी त्यांची निराशा होते. आमदाराने प्रश्‍न सादर केल्यावर संबंधित खात्याकडून त्याचे उत्तर मिळविण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाला तसेच संबंधित खात्यालाही भरपूर मेहनत करावी लागते. मात्र, प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित झाला तर त्यावर पाणी फेरले जाते. प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे यावर विचार करून तोडगा काढण्यासाठी १९९२ मध्ये एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या आतापर्यंत अनेक बैठकी झाल्या. आज सोमवारी झालेली बैठक त्या मालिकेतीलच होती. विशेष म्हणजे कोणत्याही स्थितीत प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित होऊ नये, यावर समितीतील सर्वांचे एकमत आहे. त्याचप्रमाणे सत्ताधारी, विरोधक आणि पीठासीन अध्यक्षांचेही या मुद्यावर एकमत आहे. मात्र, त्यावर कायमस्वरूपी तोडगा कसा काढावा, याबाबत चर्चा सुरू आहे. विरोधकांनी कितीही महत्त्वाचा मुद्दा असला तरी तो प्रश्‍नोत्तराच्या तासानंतरच मांडावा, प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी करू नये, असा एक प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला सर्वांची तत्त्वत: मान्यताही आहे, हे विशेष.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबत काही सूचनाही केल्या. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतच कोणत्याही स्थितीत प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करू नये, याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, ही यातील एक महत्त्वाची सूचना आहे. ज्याप्रमाणे आमदारकीची शपथ दिली जाते, तशीच शपथ मी प्रश्‍नोत्तराच्या तासात कधीच अडथळा आणणार नाही, प्रश्‍नोत्तराचा तास सुरळीत होऊ देईल, अशी शपथ सर्वांना देण्यात यावी, असाही एक मतप्रवाह आहे. प्रश्‍नोत्तराच्या तासात अडथळा आणणार्‍या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचासुद्धा प्रस्ताव आहे. या विविध प्रस्तावांवर सध्या चर्चा सुरू आहे. कारण याबाबत कोणताही निर्णय घेताना आमदार, खासदारांवर अन्याय होणार नाही, त्यांचा हक्क डावलल्या जाणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, असे सभापती हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22027

Posted by on Apr 13 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1794 of 2453 articles)


=इस्लामाबाद हायकोर्टाचे आदेश= इस्लामाबाद, [१३ एप्रिल] - २६/११ रोजीच्या मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार झकिऊर रहमान लखवीला मुक्त केल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या ...

×