Home » कला भारती, ठळक बातम्या » सदाशिव अमरापूरकर यांचे निधन

सदाशिव अमरापूरकर यांचे निधन

  • फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन
  • अंत्यदर्शनासाठी चाहत्यांचा जनसागर उसळला
  • नगर जिल्ह्यातील जन्मगावी आज अंत्यसंस्कार

SADASHIV AMRAPURKARमुंबई, [३ नोव्हेंबर] – संवाद फेकण्याच्या अफलातून शैलीमुळे आणि रंगभूमीसोबतच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी व टीव्हीवरील मालिकांमध्ये आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटवणारे भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यामुळे पडद्यावरील या महान खलनायकाला वाचविण्यासाठीचे डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. अमरापूरकर यांच्या निधनामुळे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतर अमरापूरकर यांना दोन आठवड्यापूर्वी कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. परंतु, उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांची श्‍वसनक्रिया मंदावली व त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावरून सातत्याने अफवा पसरत होत्या. पण, मुलीने अमरापूर यांची प्रकृती स्थिर असल्याचे वारंवार जाहीर केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी तज्ज्ञ डॉक्टर चोवीस तास लक्ष ठेवून होते. पण, प्रयत्नांना यश आले नाही. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांची कन्या रिमा यांनी दिली.
चाहत्यांना अमरापूरकर यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण करता यावी, यासाठी त्यांचे पार्थिव विलेपार्ले येथील भाईदास ऑडिटोरियम येथे ठेवण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील जन्मगावी उद्या मंगळवारी दुपारी चार वाजता अमरापूरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हसणे व रडणेही केले सोपे, ऑटोचालक ते खलनायक आणि समाजसेवक, पाच भाषांमधील ३०० चित्रपटात अभिनय
पडद्यावरील खतरनाक खलनायकाच्या भूमिकेतून अनेकांना रडविणारे आणि विनोदी अभिनयातून पोट धरून खदाखदा हसविणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर आज सोमवारी काळाच्या पडद्याआड गेले. गणेश कुमार नारवडे असे खरे नाव असलेला हा महान अभिनेता १९५६ मध्ये नाशकात ऑटो चालक होता. कुटुंब आणि मित्रांच्या वर्तुळात ‘तात्या’ अशी ओळख असलेल्या या गणेशकुमारने १९७४ मध्ये आपले नाव सदाशिव अमरापूरकर असे ठेवले. शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड असलेले अमरापूरकर यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यांना गायनाचाही छंद होता. त्यांच्या आवाजात जादू होती. पण, संगीत क्षेत्रात फार यश मिळणार नाही, असा सल्ला देण्यात आल्यानंतर त्यांनी स्वत:साठी थिएटर आणि नाट्य क्षेत्राची निवड केली. त्यांनी सुमारे ५० नाटकांमध्ये काम केले. सोबतच, १९७९ पर्यंत मराठी चित्रपटांमध्ये लहान भूमिका पार पाडल्या.
पुढे चांगले व्यासपीठ मिळाल्यानंतर अमरापूरकर यांनी मराठी, हिंदी, बंगाली, ओरिया आणि हरयाणवी अशा पाच प्रादेशिक चित्रपट क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडली. कधी खलनायक म्हणून तर कधी विनोदी अभिनेता म्हणून काम करताना त्यांनी सामाजिक भानही अखेरच्या श्‍वासापर्यंत जपले. अन्याय दिसेल, तिथे आवाज उठवायचा, असा त्यांचा खाक्या होता. त्यामुळेच गेल्या मार्चमध्ये होळीदरम्यान ‘रेन डान्स’साठी पाण्याची उधळपट्टी करणार्‍या हुल्लडबाजांविरोधातही त्यांनी आवाज उठविला होता. पोलिस ठाण्यात तक्रार केल्यामुळे या हुल्लडबाजांची अमरापूरकर यांच्यावर हात उचलण्यापर्यंत मजल गेली होती. पण, त्याला त्यांनी भीक घातली नाही.
अमरापूरकर यांचे वडील दत्तात्रय हे अहमदनगमधील एक मोठी हस्ती होते. सदाशिव अमरापूरकर यांना कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईक ‘तात्या’ या टोपण नावाने हाक मारायचे. काहीतरी करीत रहायचे, असा मुळातच स्वभाव असलेल्या अमरापूरकर यांचा शालेय जीवनापासूनच मोठा मित्रपरिवार होता. नगरमध्येच त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून इतिहासात ‘एमए’ची पदवी घेतल्यानंतर ते रंगभूमीकडे वळले. १९७३ मध्ये त्यांनी आपली शाळेपासूनची मैत्रीण सुनंदा करमकरशी विवाह केला.
१९८० व १९९० या दशकाचा उल्लेख सदाशिव अमरापूरकर यांच्या कारकीर्दीचा ‘सुवर्णकाळ’ असाच करता येईल. १९८१-८२ मध्ये अमरापूरकर यांनी ‘हॅन्ड्स अप’ हे मराठी नाटक केले होते. अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे-इनामदार यांनीही या नाटकात भूमिका साकारल्या होत्या. हे नाटक प्रचंड गाजले आणि अमरापूरकर खर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आले. तेव्हाचे आघाडीचे दिग्दर्शक गोविंद निहलानी अमरापूरकर यांच्या या नाटकातील अभिनयाने प्रभावित झाले आणि त्यांनी ‘अर्ध सत्य’ या चित्रपटात अमरापूरकर यांना खलनायक म्हणून हिंदीतील पहिला ‘ब्रेक’ दिला. अर्थात हा चित्रपट हिट झालाच. पण, या चित्रपटातील अमरापूरकर यांचा ‘खलनायक’ रसिकांना फारच जास्तच भावला. या भूमिकेसाठी अमरापूरकर यांना फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर अमरापूरकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अमरिश पुरी, प्रेम चोप्रा या खलनायक साकारणार्‍या कलावंतांसोबतच त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले.
१९९१ मध्ये सडक या चित्रपटात अमरापूरकर यांनी साकारलेली ‘महाराणी’ची भूमिका चाहत्यांच्या अजूनही स्मरणात आहे. या भूमिकेसाठीही अमरापूरकर यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९९३ मध्येही त्यांनी उत्कृष्ट खलनायकाचा मान पटकावत पुन्हा फिल्म फेअर पुरस्कारावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे ‘उत्कृष्ट खलनायक’ या वर्गवारीतील तो पहिलावहिला पुरस्कार होता.
‘अर्ध सत्य’नंतर पुराना मंदिर, नासूर, मुद्दत, वीरू दादा, जवानी आणि फरिश्ते या चित्रपटांमध्ये अमरापूरकर यांनी छोट्या भूमिका केल्या. १९८७ मध्ये धर्मेंद्रच्या ‘हुकूमत’ चित्रपटात खलनायकाची मुख्य भूमिका अमरापूरकर यांना मिळाली. या संधीचे खर्‍या अर्थाने त्यांनी सोने केले. हा चित्रपट ‘ब्लॉक बस्टर’ ठरला. ‘मिस्टर इंडिया’ त्यावेळीच झळकला होता. या चित्रपटलाही ‘हुकूमत’ने मागे टाकले. धर्मेंद्र खर्‍या अर्थाने अमरापूरकर यांच्यासाठी ‘लकी’ ठरला होता. त्यानंतर ही जोडी चांगलीच जमली. अनेक चित्रपटात धर्मेंद्र नायक आणि अमरापूरकर खलनायक अशी जोडी दिसली. पुढे अमिताभ बच्चन असो की गोविंदा किंवा आमीर खान या सार्‍याच नामवंतांबरोबर त्यांनी काम केले. १९९० च्या दशकात सुरुवातीच्या काही वर्षांनंतर अमरापूरकर यांनी विनोदी भूमिकांकडेही आपला मोर्चा वळवला. आँखे, इश्क, कुली नं.१ , गुप्त, आंटी नं. १, जय हिंद या चित्रपटांमध्ये विनोदी आणि सहकलाकाराच्या भूमिकेत ते दिसले. १९९६ मध्ये ‘छोटे सरकार’ चित्रपटात त्यांनी डॉ. खन्नांची भूमिका साकारली. पुढे २००० नंतर अमरापूरकर हे हिंदी चित्रपटांमध्ये फारसे दिसले नाहीत.
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक भूमिका साकारणार्‍या सदाशिव अमरापूरकर यांना पहिले यश मिळाले ते राज्य नाट्य स्पर्धेत! ‘काही स्वप्न विकायचीत’ या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले, त्यात शिक्षकाची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यावर्षी सर्वाधिक पारितोषिके याच नाटकाला मिळाली होती. अमरापूरकर यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. त्यांनी साकारलेली शिक्षकाची भूमिका सर्वांनाच आवडली. अमरापूरकर यांचे ते लखलखते यश ही फक्त सुरुवात होती, असे संकेत होते. त्यानंतर त्यांना व्यावसायिक रंगभूमीकडून बोलावणे येऊ लागले. द गोवा हिंदू असोसिएशन आणि इंडियन नॅशनल थिएटरच्या मराठी विभागाकडून अमरापूरकरांवर या विभागाची पूर्ण जबाबदारीच टाकण्यात आली. याच काळात त्यांनी ‘छिन्न’ आणि ‘यांत्रिक’ हे नाटक सादर केले. ‘छिन्न’मध्ये स्मिता पाटील होती. हे नाटक प्रचंड गाजले.
हिंदी चित्रपटच जास्त
मराठी आणि हिंदी यांची तुलना करता त्यांचे हिंदी चित्रपट सर्वाधिक आहेत. कारण, त्यांना त्यावेळी आव्हान वाटावे, अशी मराठी चित्रपटाची ऑफर आलीच नाही. मराठी नाटकच अमरापूरकर करीत राहतील, असे वाटत असताना त्यांची हिंदीतील कारकीर्द सुरू झाली. चित्रपटांमध्ये व्यस्त असतानाच त्यांनी ‘किमयागार’ हे नाटक लिहिले. हेलन केलर हिच्या जीवनावरचे हे नाटक होते. एका सहकारी कलावंताशी चर्चा करताना त्यांना हेलन केलरच्या आयुष्यावरील इंग्रजी नाटकाची माहिती मिळाली. मग झपाटल्यासारखे त्यांनी त्यासंदर्भात वाचन केले. हेलन केलरच्या आयुष्यावरील एका चित्रपटाची पटकथा त्यांना मिळाली. सातत्याने या विषयाचा मागोवा घेत त्यांना अखेर पूर्णपणे मराठी मनाला रूचेल, असे नाटक लिहिले. वि. वा. शिरवाडकर यांनी आशीर्वादाचा हात दिला. या दोघांचे नाव लेखक म्हणून या नाटकाला असले, तरी हे नाटक पूर्णपणे अमरापूरकरांनी लिहिले आहे. शिरवाडकरांनी काही सुधारणा व थोडेफार बदल केले. शिरवाडकरांच्या कसोटीत पास झालेल्या अमरापूरकरांनी अभिनय कसा करावा याबाबतीत एक अप्रतिम पुस्तक लिहिले आहे. लेखक दिग्दर्शक, अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची विविध रूपे आहेत. २२ जून १९९७ रोजी लोकमान्य टिळकांची छोटीशी भूमिका करून रूपेरी कारकीर्द सुरू करणार्‍या अमरापूरकर यांनी त्यानंतर ‘राज से स्वराज तक’ मालिकेत टिळकांची मोठी भूमिका केली. मध्यंतरी एका खाजगी वाहिनीवरील मालिकेतही त्यांचे दर्शन झाले. पण, छोट्या पडद्यापासून ते तसे दूरच राहिले.
थोडक्यात परिचय
मूळ नाव : गणेश कुमार नारवडे
बदललेले नाव : सदाशिव दत्तात्रय अमरापूरकर
जन्म : ११ मे १९५०
शिक्षण : अहमदनगर येथे
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण : पुण्यात एम.ए.
काही काळ परभणी आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणूनही काम केले.
महत्त्वाची नाटके : छिन्न, हॅण्ड्‌स अप, काही स्वप्नं विकायचीत, हवा अंधारा कवडसा, ज्याचा त्याचा विठोबा
महत्त्वाचे चित्रपट : अर्ध सत्य, हुकूमत, एलान-ए-जंग, इश्क, नाकाबंदी, सडक, गुप्त, आँखे, आखरी रास्ता
मराठी चित्रपट : झेडपी, वास्तुपुरुष, जन्मठेप
‘‘ या चतुरस्त्र अभिनेत्याच्या आठवणी सदैव आमच्या मनात राहतील. जुन्या आणि नव्या पिढीतील ते लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. अमरापूरकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून निघणार नाही. परमेश्‍वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो, हीच प्रार्थना’’
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
‘‘जेव्हा तुमचा जवळचा सहकारी कायमचा सोडून जातो, तेव्हा आयुष्यात एकप्रकारची पोकळी निर्माण होते. काहीशी अशीच अवस्था अमरापूरकर यांच्या जाण्याने माझी झाली आहे. अमरापूरकर यांच्यासोबत घालविलेले अनेक क्षण आज डोळ्यासमोर तरळत आहेत. उपजत गुणवत्ता असलेला एक गुणी कलावंत आपण गमावला. ईश्‍वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो’’
अमिताभ बच्चन, महानायक
‘‘कधीही न थकणारा आणि सतत काम करीत राहणारा एक महान अभिनेता आणि समाजसेवक आज आम्ही गमावला आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीला नेहमीच काहीतरी नवीन दिले आहे. असे महान व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड केले आहे. एका समाजसेवकाला आपण सारेच मुकलो आहोत.’’
मधूर भंडारकर, चित्रपट निर्माते
‘‘सदाशिव अमरापूर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला मोठा धक्का बसला. अमरापूरकर आपल्यात नाहीत, यावर विश्‍वासच बसत नाही. चांगला अभिनेता आणि उत्तम माणूस आज समाजाने गमावला आहे. ते अतिशय दयाळू होते. नेहमीच काहीतरी शिकण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.’’
अनुपम खेर

Short URL: https://vrittabharati.in/?p=17821

Posted by on Nov 3 2014. Filed under कला भारती, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कला भारती, ठळक बातम्या (2359 of 2457 articles)


सॅनफ्रॅन्सिस्को, [२९ ऑक्टोबर] - कर्करोग आणि हृदयविकार यासारख्या घातक रोगांचा आधीच इशारा देणारी काही यंत्रणा मानवी शरीरात आहे किंवा नाही ...

×