Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » सलमानला पाच वर्षे सक्तमजुरी

सलमानला पाच वर्षे सक्तमजुरी

  • ‘हिट ऍण्ड रन’प्रकरणी दोषी
  • हायकोर्टाने दिला दोन दिवसांचा जामीन
  • १३ वर्षांनंतर लागला खटल्याचा निकाल

salman-khan-new-1मुंबई, [६ एप्रिल] – १३ वर्षांपूर्वीच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बुधवारी मुंबई नगर दिवाणी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी हा निर्णय दिला. त्यानंतर सलमानच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज सादर केला. उच्च न्यायालयाने तूर्तास दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला असून, शुक्रवारी ८ मे रोजी त्याच्या अर्जावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
२८ सप्टेंबर २००२ रोजी सलमान खानच्या पांढर्‍या रंगाच्या ‘टोयोटा लॅण्ड क्रूझर’ गाडीने बांद्रा हिल रोड भागातील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळ फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. यात एकाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले होते. सदर प्रकरणाचा खटला १३ वर्षांपासून मुंबईच्या दिवाणी न्यायालयात सुरू होता. गेल्या एप्रिलमध्ये या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकालासाठी आज ६ मे रोजीचा दिवस निश्‍चित केला होता. बुधवारी सकाळी न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होताच न्या. देशपांडे सलमानला म्हणाले, ‘सर्व साक्षी आणि पुरावे यांच्या आधारावर तुझ्यावरील सर्व गुन्हे सिद्ध होत आहेत. यावर तुझे काय म्हणणे आहे? त्यावर सलमान म्हणाला ‘आपण जो काही निर्णय द्याल, तो मला मान्य आहे आणि मी त्याचा आदर करतो.’
त्यानंतर सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांना बचावपक्षाची बाजू मांडण्यासाठी न्यायमूर्तींनी परवानगी दिली. तेव्हा ऍड्. शिवदे यांनी ऍलिस्टर परेरा, नंदा, नुरिया हवेलीवाला प्रकरणांचा हवाला देत, कमीत कमी शिक्षा मिळावी अशी विनंती केली. जवळपास दीड तास त्यांनी न्यायालयासमोर जोरसकपणे आपली बाजू मांडली. यादरम्यान, सहाशे मुलांच्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया करणे, विविध प्रकारच्या गरजूंना आर्थिक मदत देणे शिवाय अनेकांना सढळ हाताने मत करण्याचे दाखले देत, त्यांनी सलमानचे सामाजिक कार्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि मानवतेच्या दृष्टीने विचार करण्याची विनंती केली. यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आक्षेप नोंदवत, सलमानने आपल्या बचावासाठी सामाजिक कार्याचा आधार घेण्याची अजीबात गरज नाही, असा जोरदार युक्तिवाद केला. तसेच ‘दिलेल्या दानाबाबत या कानाची त्या कानाला खबर लागू नये’ या म्हणीचा दाखला देत त्यांनी दानाबाबत वाच्यता करणे चुकीचे असल्याचे म्हटले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्या. देशपांडे यांनी दुपारी आपला निर्णय जाहीर केला.
सुनावणीप्रसंगी सलमानचे भाऊ सोहेल व अरबाज खान, अर्पिता व अलवीरा या बहिणी तसेच जावई अतुल अग्निहोत्री, बॉडीगार्ड शेरा व वकिलांची मोठी फौज उपस्थित होती.
न्यायाधीश संतापले
सलमान खानच्या चाहत्यांनी आज सुनावणीदरम्यान प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत न्यायालयाचे कर्मचारी, पोलिस यांचाही समावेश होता. कक्षासमोर चाहत्यांनी केलेल्या गराड्यामुळे कार्यवाही खोळंबली. सुनावणीच्या वेळी दोनवेळा व्यत्यय निर्माण झाला. त्यामुळे न्यायाधीय संतापले आणि दालनासमोरील जागा रिक्त करण्याचे निर्देश दिले.
…आणि सलमानने वकिलाला रोखले
सलमान अत्यंत शांतपणे वकिलाचे आणि न्यायाधीशाचे म्हणणे ऐकत होता. मात्र, ज्यावेळी त्याच्या वकिलाने प्रकृतीविषयी माहिती देण्यास सुरुवात केली तेव्हा सलमानच्या चेहर्‍यावर नाराजी झळकली. जेव्हा शिक्षा कमीत कमी व्हावी यासाठी त्याच्या वकिलाने सलमानच्या प्रकृतीचा दाखला देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खुद्द सलमानने त्याला तसे करण्यापासून रोखले. यामुळे वकिलालाही आश्‍चर्य वाटले.
‘मुझपर एक एहसान करना की, …’
मागीलवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटातील ‘मुझपर एक एहसान करना की, मुझपर कोई एहसान न करना’ हा सलमान खानचा एक संवाद चांगलाच लोकप्रिय झाला होता. मात्र, यावेळी विविध समाजकार्याचा, मदतीचा आणि दानाचा दाखला देत, सलमानचे वकील आज न्यायालयात दयेची याचना करताना दिसले. त्यासाठी सलमानच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या आणि उच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचे दाखले न्यायालयासमोर दिले.
वीज गेल्याने निकाल लांबणीवर
सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी सुरू झालेली सलमानवरील प्रकरणाची सुनावणी साधारणत: १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत चालली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवत तो १ वाजून १० मिनिटांनी जाहीर करण्याचे सांगून, तोपर्यंत न्यायालयाचे कामकाज स्थगित केले. त्यानंतर साधारणत: २० मिनिटे न्यायालयाची वीज गेल्यामुळे निकाल जाहीर करायला विलंब झाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22426

Posted by on May 7 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1722 of 2452 articles)


नवी दिल्ली, [४ मे] - गौतम बुद्धांची जन्मभूमी नेपाळ आज भूकंपासारख्या संकटाशी झूंज देत आहे. भारतवासीयांना तेथील नागरिकांचे अश्रू पुसायचे ...

×