Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सार्क देशातील संबंध आणखी मजबूत: गडकरी

सार्क देशातील संबंध आणखी मजबूत: गडकरी

=रस्ते वाहतूक विषयक करार=
Nitin-Gadkari1नवी दिल्ली, [१६ जून] – भारताने बांगला देश, भुतान आणि नेपाळसोबत रस्ते वाहतूक विषयक करार केला असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका पत्रपरिषदेत दिली.
भुतान दौर्‍यावरुन परत आल्यानंतर राजधानीतील २, मोतीलाल नेहरू प्लेस या आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत गडकरी म्हणाले की, रस्त्यांच्या जाळ्यांमुळेच सार्क देशातील संबंध आणखी मजबूत होणार आहेत. सार्क देशांशी संबंध वृद्धिंगत करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेनुसारच हा करार करण्यात आला आहे. भारत, बांगला देश, भुतान आणि नेपाळच्या वाहतूक मंत्र्यांच्या भुतानमधील थिंम्पू येथे १५ जूनला झालेल्या परिषदेत रस्ते वाहतूक विषयक करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यामुळे या देशांत आता प्रवासी आणि मालवाहतूक होऊ शकेल. पहिल्या टप्प्यात या तीन देशांशी हा करार झाला आहे. दुसर्‍या टप्प्यात श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांशी करार होणार आहे.
या कराराच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने ६ महिन्यांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. बंगलोर येथे या देशांच्या सहसचिव दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत याबाबतचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. रस्ते वाहतूक विषयक करारामुळे या देशातील व्यापार आणि उद्योगाला चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत, असेही गडकरी म्हणाले. संपुआ सरकारच्या काळापासूनच हा प्रस्ताव प्रलंबित होता. त्याला आम्ही चालना दिली आहे. या करारामुळे आता भारतातून कोणीही आपल्या चारचाकी गाडीने थेट बांगला देश, भुतान आणि नेपाळमध्ये जाऊ शकेल. त्याचप्रमाणे या देशांमध्ये सरकारी पातळीवर बससेवाही सुरू करण्यात आली आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
रस्ते वाहतूक विषयक करारामुळे आता नाशिकचे कांदे थेट बांगला देशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला झाला आहे, याचा फायदा कांदा उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, या करारामुळे सार्क आणि आशियाई राष्ट्रांची अर्थव्यवस्थाही मजबूत होणार आहे. या करारामुळे सार्क देशात रस्त्यांचे आणि पुलांचे जाळे विणले जाणार आहे, यासाठी ८ मिलियन डॉलरचा खर्च अपेक्षित असून एशियन विकास बँकेने यासाठी आर्थिक सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, असे गडकरी यांनी सांगितले. भारत-श्रीलंका यांना रस्ते मार्गाने जोडण्यासाठी समुद्रात २३ किमी लांबीचा बोगदा बांधण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी २३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, असेही गडकरी म्हणाले.
सुषमा स्वराज यांनी काहीही चूक केली नाही
सुषमा स्वराज यांच्याबाबत उपस्थित झालेला वाद हा पूर्णपणे चुकीचा आहे. मानवीय भूमिकेतून त्यांनी ललित मोदी यांना मदत केली, त्यामुळेच सरकार आणि संघटना पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे नितीन गडकरी यांनी एका प्रश्‍नावर स्पष्ट केले. राजकीय नेते म्हणून आमच्या दारात अनेकजण मदत मागायला येत असतात आणि आम्ही सगळ्यांना मदत करत असतो, त्याच भूमिकेतून सुषमा स्वराज यांनी मदत केली असावी. त्यांचा हेतू प्रामाणिक होता. पण, त्याचा विपर्यास करण्यात आला, असे गडकरी म्हणाले. मोदींना मदत करून सुषमा स्वराज यांनी कोणतीही चूक केली नाही, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, त्यामुळे कॉंग्रेसने याचे राजकारण करण्याचे कारण नाही. चांगले काम करणार्‍यांना आपल्याकडे नेहमीच बदनाम केले जाते. सुषमा स्वराज या पूर्णपणे निर्दोष आहेत. कॉंग्रेस नेते पराभवाच्या धक्क्यातून अद्यापही सावरलेले नाहीत. त्यामुळे ‘नॉन इश्यू’ला इश्यू बनवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. निराशेतून ते हा सारा प्रकार करत आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23000

Posted by on Jun 17 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1611 of 2453 articles)


=अनंत कुमार यांची माहिती= पाटणा, [१६ जून] - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जदयु-राजद आघाडीने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर, भाजपानेही ...

×