Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सोनिया, राहुल गांधी यांची जामिनावर मुक्तता

सोनिया, राहुल गांधी यांची जामिनावर मुक्तता

=शक्तिप्रदर्शन करत अखेर न्यायालयात हजर=
national-herald-case-sonia rahulनवी दिल्ली, [१९ डिसेंबर] – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आज शनिवारी न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पाच जणांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २० फेब्रुवारी २०१६ ला होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा कॉंग्रेसने आपल्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करताना जोरदार शक्तिप्रदर्शनही केले, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने हजर राहण्याचा समन्स बजावल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने कॉंग्रेसची याचिका फेटाळून लावताना सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. या मुद्यावरून कॉंग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहात आपण कोणत्या मुद्यावरून गोंधळ घालत आहोत, हे न सांगता प्रचंड गोंधळ घातला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार राजकीय सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला होता. त्यामुळे कॉंग्रेस नेते कशा पद्धतीने न्यायालयात उपस्थित राहतात, याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले होते.
शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबेही न्यायालयात उपस्थित झाले. विदेशात असलेले सॅम पित्रोदा मात्र न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. या सर्वांचीच न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २० फेब्रुवारी २०१६ ला होणार आहे.
डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांना जामीन देण्यास विरोध केला. जामीन द्यायचाच असेल तर, सशर्त जामीन देण्यात यावा, तसेच या नेत्यांना परदेशात जाण्यावर प्रतिबंध घालावा, कारण हे नेते पळून जाऊ शकतात, अशी भीती डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी युक्तिवाद करताना व्यक्त केली. मात्र, न्यायालयाने त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. स्वामी यांच्या या युक्तिवादाला कॉंग्रेस पक्षातर्फे कपिल सिब्बल यांनी जोरदार विरोध केला. त्यांना अभिषेक मनू सिंघवी यांनी मदत केली.
या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सोनिया आणि राहुल गांधी यांना सवलत देण्यात येऊ नये, अशी मागणीही डॉ. स्वामी यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली. न्यायालयाने सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांची प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या व्यक्तिगत जाचमुचलक्यावर मुक्तता केली. सोनिया गांधी यांचा जामीन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. के. ऍण्टोनी, तर राहुल गांधी यांचा जामीन बहीण प्रियंका गांधी वढेरा यांनी घेतला. मोतीलाल व्होरा यांचा जामीन बी. के. हरिप्रसाद, सुमन दुबे यांचा अजय माकन आणि ऑस्कर फर्नांडिस यांचा जामीन गुलाम नबी आझाद यांनी घेतला. ही न्यायालयीन प्रक्रिया अवघ्या १५ मिनिटांतच पूर्ण झाली.
या पार्श्‍वभूमीवर पतियाळा हाऊस न्यायालय परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मोजक्या लोकांनाच न्यायालय परिसरात प्रवेश देण्यात येत होता.
तत्पूर्वी, शनिवारी सकाळपासूनच २४ अकबर रोड हे कॉंग्रेस मुख्यालय, तसेच १० जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. हातात फलक, तसेच कॉंग्रेस पक्षाचे झेंडे घेऊन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. तुघलक रोडवरील आपल्या निवासस्थानातून राहुल सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सोनिया आणि राहुल गांधी अन्य नेत्यांसोबत पतियाळा हाऊस न्यायालयात पोहोचले.
महानगर न्यायदंडाधिकारी एम. एम. लवलीन यांच्या न्यायालयात सोनिया आणि राहुल गांधी उपस्थित झाले. न्यायालयाच्या प्रवेशद्वाराच्या काही अंतर आधी हे दोघे वाहनातून खाली उतरले आणि नेते, कार्यकर्त्यांच्या गराड्यात पायी चालत न्यायालयात पोहोचले. डॉ. सुब्रमण्यम् स्वामीही आपल्या पत्नीसह न्यायालय परिसरात पोहोचले.
सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासोबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा, लोकसभेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे, माजी केंद्रीय मंत्री ए. के. ऍण्टोनी, राजीव शुक्ला, अंबिका सोनी, शैलजा, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वढेराही यावेळी न्यायालय परिसरात उपस्थित होते.
आम्ही घाबरणार नाही : सोनिया गांधी
न्यायालयाने जामिनावर मुक्तता केल्यानंतर सोनिया आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांना दडपण्यासाठी मोदी सरकार सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. मात्र, आम्हाला आमच्या मार्गापासून कुणीही विचलित करू शकणार नाही, आम्ही मुळीच घाबरणार नाही, असे सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस मुख्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आम्ही स्वच्छ अंत:करणाने न्यायालयात उपस्थित झालो, न्यायपालिकेवर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. न्यायालयाच्या माध्यमातून या प्रकरणातील वस्तुस्थिती जनतेसमोर येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
आमच्यावर अनेक पिढ्यांपासून हल्ले चढवले जात आहेत. मात्र, कॉंग्रेस पक्षाच्या सिद्धांत आणि धोरणानुसार आम्ही गरिबांना न्याय मिळवून देण्याची लढाई यापुढेही चालू ठेवू, असे त्या म्हणाल्या.
राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आम्ही हार मानणार नाही, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. आम्ही कायद्याचा आदर करतो, कायदा सर्वांसाठी समान आहे, असे स्पष्ट करत राहुल म्हणाले की, गरिबांच्या कल्याणाची आमची लढाई यापुढेही सुरूच राहणार आहे. आम्ही मागे हटणार नाही. कॉंग्रेसमुक्त भारताचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कॉंग्रेस पक्ष सोनिया आणि राहुल गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचा निर्वाळा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी यावेळी बोलताना दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26233

Posted by on Dec 20 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (999 of 2453 articles)


=चार दशकांनंतर ऐतिहासिक निर्णय= न्यूयॉर्क, [१८ डिसेंबर] - देशांतर्गत तेल उद्योगाला सुगीचे दिवस आल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने आपल्या भूमिकेत ऐतिहासिक बदल ...

×