Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » ‘स्कॅम इंडिया’वरून राज्यसभेत गदारोळ

‘स्कॅम इंडिया’वरून राज्यसभेत गदारोळ

=कामकाज तीनदा स्थगित=
rajyasabhaनवी दिल्ली, [२८ एप्रिल] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅनडा आणि जर्मनीच्या दौर्‍यात केलेल्या विधानावरून राज्यसभेत आज चांगलाच गदारोळ झाला. विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे तीनदा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. राज्यसभेच्या कामकाजाला आज प्रारंभ होताच कॉंग्रेस पक्षाचे उपनेते आनंद शर्मा यांनी नियम २६९ ची नोटीस देत प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी केली. त्याला सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅनडा आणि जर्मनीच्या दौर्‍यात केलेल्या
विधानांमुळे परदेशात भारताची प्रतिष्ठा धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसच्या नेेत्यांनी ६० वर्षात केलेली घाण आम्ही दूर करीत आहोत, असे विधान मोदी यांनी केले होते. यावर आनंद शर्मा यांनी आक्षेप घेतला. या मुद्यावरून विरोधी सदस्य संतप्त झाले आणि घोषणा देत वेलमध्ये आले.
पंतप्रधानांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, बसपाच्या मायावती आणि नव्या जनता परिवाराचे शरद यादव यांनी पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधानांनी परदेशात असे वादग्रस्त विधान करून देशाची बदनामी केली, असा या सदस्यांचा आरोप होता. त्याला सत्ताधारी बाजूकडूनही तेवढेच जोरदार प्रत्युत्तर दिले जात होते. कॉंग्रेसच्या नेत्यांनी परदेशात केलेल्या विधानांमुळे तेव्हा देशाची अप्रतिष्ठा झाली नव्हती का, अशी विचारणा भाजपाच्या सदस्यांनी केली.
उपसभापती पी. जे. कुरियन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होते. सदस्यांनी आपल्या जागेवर जावे, असे आवाहन ते वारंवार करीत होते. पण त्याला यश येत नव्हते. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा १० मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधी सदस्य पुन्हा घोषणा देत वेलमध्ये आले. त्यामुळे सभागृहात पुन्हा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करून या मुद्यावर चर्चेची विरोधकांची मागणी होती. त्यावर सत्ताधारी पक्षाने चर्चेची तयारी दाखवली. पण कॉंग्रेसने ६० वर्षात केलेल्या भ्रष्टाचारावरही चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली. त्यामुळे कॉंग्रेस सदस्य अधिकच संतप्त झाले आणि जोरदार घोषणा देऊ लागले. त्यामुळे पुन्हा १० मिनिटांसाठी कामकाज स्थगित करावे लागले.
कामकाज तिसर्‍यांदा सुरू झाल्यावर अर्थमंत्री अरुण जेटली उभे झाले, आणि त्यांनी कॉंग्रेस सदस्यांना चांगलेच चिमटे काढले. सध्याचे युग दूरसंचार साधनांचे युग आहे. त्यामुळे कोणी कुठेही काहीही केले तरी ते सर्व ठिकाणी पोहोचते, असे जेटली म्हणाले. कॉंग्रेस सदस्य पुन्हा घोषणा देऊ लागले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळातच सभापती हमीद अन्सारी यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. पण गोंधळात काहीच ऐकू येत नव्हते. त्यामुळे सभापती अन्सारी यांनी कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित केले. दुपारी २ वाजता कामकाज सुरू होताच पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या प्रकरणाची आपण चौकशी करू, असे आश्‍वासन उपसभापती कुरियन यांनी दिले आणि सभागृहातील वातावरण शांत झाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22373

Posted by on Apr 29 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1735 of 2453 articles)


=विधिमंत्र्याची शैक्षणिक पदवीच निघाली बोगस, हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश= नवी दिल्ली, [२८ एप्रिल] - स्वच्छ राजकारण, प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहार ...

×