Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » स्वत:शीच स्पर्धा करा!

स्वत:शीच स्पर्धा करा!

=पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना सल्ला, सचिन, विश्‍वनाथन आनंदच्या शुभेच्छा=
modi-sachin-tenduakar-vishwanathanनवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] – लवकरच सुरू होत असलेल्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि अपेक्षांच्या कोणत्याही दडपणाखाली येऊ नये, असा मोलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी दिला.
आकाशवाणीवरून देशवासीयांशी संवाद साधण्याच्या अभिनव उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ मधून प्रामुख्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र त्यांना दिला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी विश्‍वविजेता भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंदही या कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायक संदेश दिला. परीक्षा देताना शांतचित्त आणि सकारात्मक राहा, असा सल्ला या दोन्ही महान खेळाडूंनी दिला.
पालक किंवा इतरांना तुमच्याकडून बर्‍याच अपेक्षा असतात. परंतु, या अपेक्षांच्या दडपणात येऊ नका आणि स्वत:च स्वत:साठी लक्ष्य निर्धारित करा. इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी स्वत:शीच स्पर्धा करा आणि आपलाच विक्रम मोडून नव्या विक्रमासाठी प्रयत्न करा, असा मोलाचा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला.
पालक, शिक्षक आणि ज्येष्ठ यांचा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात खूप मोठा आधार असतो. कोणत्याही वेळी कोणीही यश संपादन करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे जे. के. रोलिंग आहे. त्यांना अनेक अडचणी आणि अपयशाचा सामना करावा लागला. आजकालच्या परीक्षा केवळ विद्यार्थ्यांच्या नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या असतात, असेही मोदी पुढे म्हणाले. दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या तणावाचा सामना करणे शक्य होईल. परीक्षेच्या काळात योग आणि ध्यान करण्याबद्दल मला असंख्य लोकांनी कळविले आहे. मात्र, तुम्ही कुटुंबीय आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवा आणि तणावमुक्त राहा, असाही सल्ला पंतप्रधानांनी दिला.
परीक्षा झाल्यानंतर त्यामध्ये गुंतून न राहता पुढचा विचार करा. जो काळ गेला तो इतिहास झाला. त्यामुळे परीक्षा संपताच किती गुण मिळतील याचा विचार करत बसू नका. जर तुम्ही शांतचित्त असाल, तर ज्ञानाचे भांडार गवसेल आणि परीक्षा खूपच सोपी जाईल, असेही पंतप्रधान विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले.
रविवारी पार पडलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी याही विषयाला हात घातला आणि विज्ञान-तंत्रज्ञानाशिवाय नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात येणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. ‘मेक इन इंडिया, सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इनोव्हेशन्स’, यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कुतूहल ही विज्ञानाची जननी आहे. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञानाशिवाय नाविन्यपूर्ण गोष्टी शक्य नाहीत, असेही मोदी पुढे म्हणाले.
गुरुत्वाकर्षण लाटांचा अभ्यास करण्यासाठी भारताने लेझर इंटरफेरोमिटर ग्रॅव्हीटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (लिगो) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. गुरुत्वाकर्षण लाटांचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांच्या पथकात भारतीयांचा समावेश आहे. मर्यादित स्रोत असले तरी भारत लिगोमध्ये सहभागी होईल आणि आपल्या परीने योगदान देईल, असेही पंतप्रधान म्हणाले.
आज माझी परीक्षा : मोदी
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उद्या सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर माझीही परीक्षा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सोमवारी देशातील १२५ कोटी लोक माझी परीक्षा घेणार आहेत. लीप वर्ष असल्यामुळे २९ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशीपासून तुमची परीक्षा सुरू होणार आहे. आपण सर्वच जण परीक्षेत यशस्वी होऊ, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26933

Posted by on Feb 29 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (800 of 2453 articles)


=विराट कोहली सामनावीर= मीरपूर, [२७ फेब्रुवारी] - जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या आशिया चषक स्पर्धेतील अत्यंत उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानचा ...

×