Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » १४,७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर

१४,७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर

  • कृषिपंपांच्या वीजबिलांमध्ये ३३.५ टक्के सवलत
  • विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
  • कापूस, सोयाबीन, मका, धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याचे निर्देश

EKNATH KHADSE7मुंबई, [१६ ऑक्टोबर] – राज्यातील १४,७०८ गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असून, या गावांमध्ये दुष्काळ सदृश उपाययोजना करताना कृषिपंपांच्या चालू वीजबिलामध्ये ३३.५ टक्के सवलत, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, जमीन महसुलात सूट, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स आणि टंचाई जाहीर झालेल्या गावातील शेतकर्‍यांच्या कृषिपंपांची वीज खंडित न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
या उपाययोजना लागू करताना गाव हा घटक मानण्यात येईल. राज्यातील शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेता कापूस, तसेच सोयाबीन, मका, धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करावेत, असे निर्देश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज शुक्रवारी येथे दिले.
पीक पैसेवारी, दुष्काळ सदृश तालुके जाहीर करणे आणि प्रादेशिक नळपुरवठा योजना याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात घेण्यात झाली. त्यावेळी महसूलमंत्री बोलत होते. स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे मंत्री बबन लोणीकर, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव यावेळी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना खडसे म्हणाले की, राज्यात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी पावसाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. १८९ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. राज्यात १४,७०८ गावांची नजर पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असून, २५,३४५ गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या गावांमध्ये खरिपाच्या बाबतीत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करतानाच त्यासंबंधीच्या उपाययोजनांसाठी शासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्राकडे मदतीची मागणी करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या सुधारित पैसेवारीची वाट न पाहता तातडीने प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य सचिवांसह संबंधित विभागांचे सचिव केंद्रीय कृषिसचिवांची भेट घेऊन त्यांच्याशी मदतीबाबत चर्चा करतील.
दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून त्याबाबतची मदत देताना तालुका हा घटक न मानता, गाव हा घटक ठेवून उपाययोजना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, असे सांगून खडसे पुढे म्हणाले की, प्रत्येक गावाची परिस्थिती वेगळी असल्याने ज्या गावांची पैसेवारी कमी आहे, त्यांना मदत केली पाहिजे. अशा गावांमध्ये कृषिपंपांच्या चालू वीजबिलांमध्ये ३३.५ टक्के सवलत देण्यात येईल, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येईल, जमीन महसुलात सूट देण्यात येईल, तसेच आवश्यकता भासल्यास पिण्याच्या पाण्याचे टँकर्स सुरू करण्यात येतील. या गावांतील कृषिपंपांच्या वीजजोडण्या खंडित केल्या जाणार नाहीत. या उपाययोजना दुष्काळ सदृश गावांमध्ये तातडीने हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी करण्याची मागणी वाढत आहे. त्यानुसार तातडीने कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात यावीत. सोबतच सोयाबीन, मका, धान खरेदी सुरू करण्यात यावी, ज्या भागात गोदामांची संख्या कमी आहे तेथे गोदामे भाडेतत्त्वावर घेण्यात यावीत, असे निर्देशही खडसे यांनी यावेळी दिले.
आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) असलेल्या शेतकर्‍यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देणे सुलभ व्हावे, यासाठी ईबीसी उत्पन्नाची मर्यादा एक लाख रुपयांवरून अडीच लाख रुपये करण्यात यावी. त्याचा फायदा राज्यातील गरीब शेतकर्‍यांच्या हजारो मुलांना होईल, असे सांगून खडसे पुढे म्हणाले की, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना फक्त वीज बील न भरल्यामुळे बंद आहेत, अशा योजनांचे देयक अदा करून त्या योजना मार्गी लावाव्यात. वीज बिलांअभावी बंद असलेल्या योजनांबाबतचा अहवाल देखील संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडून मागविण्यात यावा, बंद पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठीचा निधी देण्याबाबत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना अधिकार आहेत. त्यांनी या अधिकाराचा वापर करून बंद पाणीपुरवठा योजना मार्गी लावाव्यात, असे निर्देशही खडसे यांनी यावेळी दिले.
बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, सहकार विभागाचे प्रधान सचिव एस. एस. शर्मा, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव गोविंदराज, पाणी पुरवठा विभागाचे सचिव राजेश कुमार मीना, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, पदुमचे सचिव महेश पाठक, कृषी आयुक्त विकास देशमुख, नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले, औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट आदी उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25176

Posted by on Oct 17 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1320 of 2451 articles)


=बिहार विधानसभा निवडणूक= पाटणा, [१६ ऑक्टोबर] - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारी घेण्यात आलेल्या दुसर्‍या टप्प्यात प्राथमिक आकडेवारीनुसार सरासरी ५५ ...

×