Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » १ नोव्हेंबरपासून दाभोळ प्रकल्पात वीज निर्मिती होणार

१ नोव्हेंबरपासून दाभोळ प्रकल्पात वीज निर्मिती होणार

  • प्रकल्प सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
  • पुनरुज्जीवनासाठी राज्य शासन प्रयत्नशील
  • ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Chandrashekhar Bawankuleमुंबई, [६ ऑक्टोबर] – दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (आरजीपीपीएल) वीजनिर्मिती प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांसह केंद्र शासनानेच तयार केलेल्या पॉवर सिस्टीम डेव्हलपमेंट फंड (पीएसडीएफ) अंतर्गत विशिष्ट सवलती देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. या निर्णयामुळे १ नोव्हेंबर २०१५ पासून हा प्रकल्प सुरू करण्याच्या निर्णयास मदत होणार आहे.
दाभोळ येथील हा प्रकल्प नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याअभावी नोव्हेंबर २०१३ पासून बंद आहे. त्यामुळे ७८०० कोटी रुपयांच्या थकित कर्जामुळे हा प्रकल्प अनुत्पादक मालमत्ता म्हणून घोषित होण्याच्या मार्गावर आहे. या कंपनीत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (होल्डिंग कंपनी) च्या १३.५० टक्के भागभांडवलाचा समावेश असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
देशातील सुमारे १४ हजार ३०५ मेगावॅट क्षमतेचे वायूवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प सध्या बंद आहेत. आयात केलेल्या द्रवरूप नैसर्गिक वायूची किंमत अधिक असल्याने कमी खर्चातील वीजनिर्मिती शक्य नाही. त्यामुळे द्रवरूप नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून वापर करून कमी खर्चात वीजनिर्मिती करू शकेल असे प्रकल्प सुरू करण्याची योजना केंद्र शासनाने आखली आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून सवलती देण्याव्यतिरिक्त प्रकल्पातील भागधारकांना सवलती देण्यात येणार आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत केंद्राकडून सीमा शुल्क, सीएसटी यांची माफी, तसेच ७ हजार ५०० कोटींची सवलत तसेच राज्य शासनाकडून व्हॅट, सीएसटी आणि प्रवेश कर, ऑक्ट्रॉयमधून सूट देण्यात येणार आहे. या प्रकल्पाला पुरविल्या जाणार्‍या द्रवरूप नैसर्गिक वायूवरील पाईपलाईन दर आणि वायूवर होणार्‍या प्रक्रियेच्या दरामध्ये गेल कंपनीकडून ५० टक्के माफी देण्यात येणार आहे. केंद्रीय पारेषण उपक्रमांकडून आंतरराज्य वीज वाहिनीवरील ट्रान्समिशन चार्जेस आणि ट्रान्समिशन लॉसेस याला पूर्णपणे माफी देण्यात येणार आहे. याच धर्तीवर राज्य पारेषण उपक्रमांनाही माफी देण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
या प्रकल्पांतील ५०० मेगावॅट विजेपैकी रेल्वेकडून महाराष्ट्रात २५०, गुजरातमध्ये ५०, झारखंडमध्ये १०० आणि पश्‍चिम बंगालमध्ये १०० मेगावॅट वीज वापरली जाणार आहे. पॉवर सिस्टीम डेव्हलपमेंट फंड अंतर्गत मिळणारी सवलत आणि अन्य सवलती विचारात घेऊन रेल्वेस ४.७० रुपये प्रतियुनिट दराने वीजपुरवठा अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ८.६३ पैसे दराने वीज पुरवठा होतो. मात्र, रेल्वे पाच रुपये दराने वीज खरेदी करणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
हा प्रकल्प सुरू होण्यासाठी या प्रकल्पाचे विभाजन करून विद्युत निर्मिती केंद्र आणि टर्मिनल अशा दोन कंपन्या करण्याबाबत ठरविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी देण्यात आली. टर्मिनलच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी २ हजार ४४ कोटी रुपयांची अधिकची गुंतवणूक करण्यात येणार आहे. राज्य शासन या प्रकल्पासाठी पीएसडीएफ योजनेंतर्गत पुढील दोन वर्षांसाठी १५० कोटी कर (प्रतीकात्मक) माफी तसेच पारेषण खर्च माफीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगास निर्देश देणार आहे. प्रकल्पातून निर्माण होणार्‍या विजेच्या पारेषणामुळे दरवर्षी १७६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प सुरू करण्याकरिता सर्व संबंधिताकडून सहाय्य अपेक्षित असून, राज्य शासनानेही याबाबत आपली जबाबदारी पार पाडण्याची भूमिका घेतली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे हा प्रकल्प चालू राहिल्यास सन २०३४ पर्यंत सर्व कर्जाची परतफेड अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.
या प्रकल्पात राज्य वीजमंडळ होल्डिंग कंपनीकडून पुन्हा नव्याने समभागाच्या स्वरूपात आणखी गुंतवणूक करण्यात येऊ नये, परंतु इतर समभागधारक त्यांचे समभाग विक्रीस काढतील, त्यावर होल्डिंग कंपनीचा पहिला हक्क अबाधित राहणार आहे. तसेच महावितरण आणि दाभोळ प्रकल्प यातील दाव्याबाबतही सर्वसामान्य तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येणार आहे. रेल्वेने केंद्रीय वीज नियामक आयोगाकडे मुक्त प्रवेशासाठी केलेल्या निवेदनाचे समर्थन महापारेषण कंपनीने करून प्रचलित नियमनाप्रमाणे रेल्वेस या प्रकल्पातून मिळणारी वीज महापारेषणच्या ग्रीडमधून वाहून नेण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25008

Posted by on Oct 7 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1367 of 2451 articles)


स्टॉकहोम, [६ ऑक्टोबर] - जपानचे तक्काकी कजिता आणि कॅनडाचे ऑर्थर मॅकडोनॉल्ड यांना यावर्षीचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. या ...

×