Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » २०२० पर्यंत मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वमार्ग : प्रभू

२०२० पर्यंत मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वमार्ग : प्रभू

suresh-prabhuनवी दिल्ली, [२० मे] – २०२० पर्यंत मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्याची रेल्वेची योजना आहे. असे रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर प्रवासी गाड्यांची गती वाढेल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे सांगितले.
मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल महाराष्ट्रातील पत्रकारांशी रेल्वे मंत्राालयात संवाद साधताना प्रभू म्हणाले की, आज प्रवासी आणि मालवाहतूक एकाच रेल्वेमार्गावरून केली जाते. त्यामुळे रेल्वेमार्गावर ताण तर वाढतोच पण प्रवासी गाड्यांच्या गतीतही अडथळा येतो. त्यामुळे मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गाड्यांची गती वाढवण्यासाठी रेल्वेमार्ग, सिग्नल, रोलिंग स्टॉक आणि मानवरहित रेल्वे क्रॉसिंग असे चार प्रमुख घटक आहेत. या सर्वात सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रेल्वे अर्थसंकल्पावरील भाषणात मी चार नव्या गाड्यांची घोषणा केली होती. तेजस, उदय, हमसफर आणि अंत्योदय नावाच्या या त्या चार गाड्या येत्या सहा महिन्यात धावतील. या गाड्यांचा मार्गही लवकरच जाहीर केला जाईल, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. तेजस गाडी प्रीमियम प्रकारची असून उदय गाडी डबलडेकर आणि रात्रभरात प्रवास करणारी राहणार आहे. हमसफर गाडी मध्यमवर्गीयांच्या गरजा लक्षात घेऊत तयार करण्यात आली आहे, तर अंत्योदय गाडी ही अनारक्षित प्रकारची राहील, असे प्रभू यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने एक कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या जॉईंट व्हेन्चर कंपनीत रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार यांचा वाटा सारखा म्हणजे ५०-५० टक्के राहणार आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या व्यवस्थापनातही महाराष्ट्र सरकारचा सहभाग राहणार आहे, याकडे लक्ष वेधत प्रभू म्हणाले की, या कंपनीच्या माध्यमातून मुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प जलदगतीने पूर्ण केले जातील. महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी २९ हजार कोटी रुपयांची गरज आहे. महाराष्ट्रातील प्रकल्पांच्या कामाचा समन्वय साधण्यासाठी रेल्वे मंत्रालयात एका विशेष अधिकार्‍याची नियुक्तीही करण्यात आली आहे.
रेल्वेने देशातील ४०० स्थानके विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील महाराष्ट्रातील ४० स्थानके या कंपनीच्या माध्यमातून विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, याकडे लक्ष वेधत प्रभू म्हणाले की, चर्चगेट ते सीएसटी रेल्वेस्थानक रस्ता आणि रेल्वेमार्गाने जोडण्याचीही आमची योजना आहे. यामुळे पश्‍चिम आणि मध्य रेल्वे जोडली जाणार आहे.
रेल्वेने आपल्या कामात बर्‍याच सुधारणा केल्या असल्या तरी मला पूर्ण समाधान नाही. मला अपेक्षित असलेली परिपूर्ण स्थिती २०२० पर्यंत रेल्वेत येईल, असा विश्‍वास प्रभू यांनी व्यक्त केला.
सीएसटी स्थानकाच्या परिसरात महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे दर्शन घडवणारे स्मारक उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही याठिकाणी उभारला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचे तसेच विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. चिपळूण-कराड रेल्वेमार्गाच्या कामाचे टेंडर काढण्यात आले असून शापूरजी पालनजी कंपनीकडे ते सोपवण्यात आल्याचे प्रभू यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28364

Posted by on May 21 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (308 of 2453 articles)


=व्हाईट हाऊसचे शिक्कामोर्तब= वॉशिंग्टन, [२० मे] - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची ७ जून रोजी ...

×