Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » २४ पैकी १३ जागांवर भाजपा विजयी

२४ पैकी १३ जागांवर भाजपा विजयी

  • बिहार विधान परिषद निवडणूक
  • नितीश-लालू आघाडीला फक्त १० जागा

BJP-FLAG-RALLY-IN-UP-1पाटणा, [१० जुलै] – याच वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीची ‘सेमी फायनल’ म्हणून महत्त्व लाभलेल्या बिहार विधान परिषदेच्या २४ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील रालोआने जोरदार मुसंडी मारत १३ जागांवर विजय मिळविला आहे. तर, स्वत:ला सत्तेचे दावेदार म्हणविणार्‍या नितीशकुमार-लालूप्रसाद यांच्या आघाडीला केवळ १० जागाच जिंकता आल्या. भाजपाच्या लोकप्रियतेला गळती लागली, असा दावा करणार्‍या विरोधकांना हे निकाल म्हणजे मोठी चपराकच मानली जात आहे.
स्थानिक स्वराज संस्थांमधून विधान परिषदेच्या २४ जागांसाठी गेल्या ७ जुलै रोजी मतदान घेण्यात आले होते. आज शुक्रवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत सर्वच निकाल जाहीर करण्यात आले असून, यात भाजपाने १२ आणि मित्रपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीने एका जागेवर विजय मिळविला. सत्तारूढ जदयुने ५, राजदने ३ आणि कॉंगे्रसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. दोन जागा अपक्षांनी जिंकल्या असून, यातील महत्त्वाची पाटण्याची जागा हत्या आणि अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यात सध्या तुरुंगात असलेल्या रितलाल यादव या कुख्यात गुन्हेगाराने जिंकली आहे.
ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये बिहारात विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपाची विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता रोखण्यासाठी जदयु-राजद आणि कॉंगे्रसने महाआघाडी स्थापन केली आहे. या आघाडीने आगामी सत्ता आपलीच असल्याचा दावाही करून टाकला आहे. त्यातच या विधान परिषद निवडणुकीकडे विधानसभेची ‘सेमी फायनल’ याच अनुषंगाने पाहिले जात होते. पण, यात महाआघाडीची पिछाडी झाल्याने पराभवामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आघाडीतील प्रमुख नेत्यांची सायंकाळी बैठक झाली. बैठकीत स्वत: नितीशकुमार आणि जदयुचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह उपस्थित होते.
भाजपा समाधानी
निवडणुकीच्या निकालांवर आम्ही पूर्णपणे समाधानी आहो. भाजपाला भरघोस मतदान केल्याबद्दल आम्ही मतदारांचे मनापासून आभार मानतो. आता आम्ही ‘सेमी फायनल’ जिंकली आहे. फायनलमध्येही आम्हीच विजयी होऊ, असा विश्‍वास असल्याचे भाजपा नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले.
या निवडणकीत भाजपाने मधुबनी, बेगुसराय, सारण, रोहतास, पूर्व चंपारण, गोपालगंज, सिवान, दरभंगा, समस्तीपूर, औरंगाबाद, पूर्णिया आणि कटिहार या जागांवर विजय मिळविला असून, रामविलास पासवान यांच्या लोजपाने सहरसाची जागा जिंकली आहे. तर जदयुने मुझफ्फरपूर, भागलपूर, नवादा, नालंदा आणि गया तसेच, राजदने सीतामढी, हाजिपूर आणि भोजपूरची जागा जिंकली आहे. पश्‍चिम चंपारणची जागा कॉंगे्रसने जिंकली असून, पाटणा व मुंगेरच्या जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23375

Posted by on Jul 11 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1564 of 2452 articles)


=बिहार विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाने भाजपाचे मनोबल उंचावले= नवी दिल्ली, [१० जुलै] - बिहारमध्ये विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या निर्विवाद ...

×