Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » २६/११ चा कट हाफिझच्या आदेशानुसार

२६/११ चा कट हाफिझच्या आदेशानुसार

  • डेव्हिड हेडलीची खळबळजनक कबुली
  • दोन वर्षे पाकिस्तानात प्रशिक्षण
  • पाक लष्कर, आयएसआय कटाचे भागीदार

David-Headley 26-11मुंबई, [८ फेब्रुवारी] – सुमारे १६८ निष्पाप लोकांचा बळी घेणार्‍या आणि एक हजारावर लोकांना जखमी करून कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची हानी करणार्‍या २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला आणि पाक लष्कर तसेच गुप्तचर संस्था आयएसआयसोबतच लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईददेखील या भीषण कटाचा सूत्रधार आहे, अशी खळबळजनक साक्ष या हल्ल्याचा एक सूत्रधार म्हणून काम करणारा तोयबाचा अतिरेकी डेव्हिड कोलमन हेडली याने आज सोमवारी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयात दिली. त्याच्या या कबुलीमुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात आमचा सहभागच नाही, असा दावा पाक सरकारने वारंवार केला आहे. तसेच, भारताकडून मिळालेले पुरावे तथ्यहिन असल्याचे सांगून पाकने सूत्रधारांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. काही वर्षांपूर्वी मुंबई हल्ल्याप्रकरणी अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अधिकार्‍यांनी डेव्हिड हेडलीला अटक केली होती. न्यायालयाने त्याला ३५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात संपूर्ण सत्य सांगण्याची तयारी असल्याचे सांगून माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा हेडलीने व्यक्त केल्यानंतर विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याला माफीचा साक्षीदार केले. त्यानुसार आज सोमवार हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष घेण्यात आली. त्याची ही साक्ष पाकचा दहशतवादी मुखवटा फाडणारीच ठरली आहे.
आज सकाळी ७ वाजता त्याच्या साक्षीला सुरुवात झाली. ती तब्बल पाच तासपर्यंत सुरू होती. ‘२००२ मध्ये मी लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात आलो. आयएसआयचा अधिकारी साजिद मीर हा माझा बॉस होता. मुंबईवर हल्ला करण्यापूर्वी ७ वेळा आणि हल्ल्यानंतर एकदा असा आठ वेळा मी मुंबईला आलो होतो. २६ नोव्हेंबरपूर्वी आम्ही दोनवेळा मुंबईवर हल्ला करण्याचे प्रयत्न केले. पण, ते अपयशी ठरले. पहिला प्रयत्न सप्टेंबरमध्ये आणि दुसरा ऑक्टोबरमध्ये केला होता. यातील एका प्रयत्नात आमच्या नौकेला समुद्रात अपघात झाला. त्यामुळे दुसर्‍या नौकेने आम्हाला परत फिरावे लागले होते’, असे हेडलीने आपल्या साक्षीत कबूल केले.
तो पुढे सांगतो, ‘लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईदच्या विचारांनी प्रेरित होऊन मी या संघटनेत सहभागी झालो होतो. पाकच्या मुझफ्फराबाद येथे २००२ मध्ये मला तब्बल दोन वर्षे शस्त्र आणि दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. साजिदर मीर मला आवश्यक ते आदेश देत होता. मुंबईवरील हल्ल्याच्या कटातही मला सहभागी करून घेण्यात आले होते. माझा साथीदार तहव्वूर राणा याला मात्र या कटाची विशेष माहिती नव्हती. तोयबाचा खरा अनुयायी म्हणून हाफिझचा प्रत्येक आदेश मानणे हेच माझे कर्तव्य होते.’
डेव्हिड हेडली नव्हे दाऊद गिलानी
विशेष म्हणजे, संपूर्ण जग ज्याला आतापर्यंत डेव्हिड हेडली समजत आले आहे, त्याचे खरे नाव दाऊद गिलानी असून, त्याचा जन्म अमेरिकेत झाला असला, तरी लहानपणीच तो पाकिस्तानला स्थलांतरित झाला. त्यानेच स्वत: याबाबतचा खुलासा केला आहे. भारतात प्रवेश करता यावा आणि मुंबईसह काही महत्त्वाच्या शहरांची व्हिडीओग्राफी करणे शक्य व्हावे, यासाठी मी दाऊद गिलानी हे नाव बदलवून डेव्हिड हेडली नाव धारण केले. नाव बदलण्यासाठी ५ फेबु्रवारी २००६ रोजी मी फिलाडेल्फिया येथे अर्ज केला होता. डेव्हिडच्या नावाने नवा पासपोर्ट मिळविला. त्यात अमेरिकन नागरिक म्हणून माझी ओळख दिली. याच नव्या ओळखीवर मला भारतात जायचे होते. डेव्हिडच्या नावावर नवा पासपोर्ट मिळाल्यानंतर याबाबतची माहिती मी साजिद मीर याला दिली. भारतात मला वास्तव्य करता यावे, यासाठी मला मुंबई किंवा अन्य शहरात व्यवसाय स्थापन करायचा होता. भारतातील माझ्या पहिल्या भेटीपूर्वी साजिदने मला मुंबईतील महत्त्वाच्या भागांचा व्हिडीओ तयार करायला सांगितला होता. भारतात व्हिसाकरिता अर्ज करताना, व्हिसा अर्जावर मी संपूर्ण चुकीची माहिती सादर केली होती. स्वत:ची ओळख लपविणे हाच त्यामागील उद्देश होता. मुंबईवर हल्ला होण्यापूर्वी २००६ ते २००८ या काळात सातवेळा भारताला भेट दिली आणि मुंबईतील हॉटेल ताज, ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊससह काही प्रमुख ठिकाणांची व्हिडीओग्राफी केली होती. ही संपूर्ण माहिती मुंबईवर प्रत्यक्षात हल्ल्याची जबाबदारी असलेल्या १० अतिरेक्यांना आणि त्यांच्या म्होरक्यांना दिली, असेही त्याने मान्य केले.
आणखीही काही नावे
साजिद मीरसोबतच हेडलीने पाक लष्करातील वरिष्ठ अधिकारी मेजर इक्बाल आणि मेजर अली यांचीही नावे घेतली. माझे बनावट पासपोर्ट तयार करण्यात साजिद मीरची मोठी मदत मिळाली, असे तो म्हणाला.
हाफिझ सईदच सूत्रधार
हेडली आपल्या साक्षीत पुढे म्हणाला की, भारताने ठोस पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तानात मोकाट फिरत असलेला तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद हाच मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. मुंबईवर अतिरेकी हल्ला सुरू असताना, अतिरेक्यांना सर्व आदेश हाफिझकडूनच प्राप्त होत होते. हाफिजच्याच आदेशावरून मीदेखील भारतविरोधी कारवाया करीत गेलो. विशेष म्हणजे, न्यायालयाने त्याला साजिर मीर याचे छायाचित्र दाखविल्यानंतर हेडलीने त्याला लगेच ओळखले. साजिद मीर आणि मी वेगवेगळ्या इमेल आयडीच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होतो.
अशा फसल्या पहिल्या दोन योजना
सप्टेंबर २००८ मध्ये मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाकच्या कराची बंदरातून निघालेली एक नौका समुद्रात खडकावर आदळून नष्ट झाली. त्या नौकेतील लोक लाईफ जॅकेटच्या मदतीने किनार्‍यावर आले. पण, त्या नोकेवरील सर्व सामान, दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे समुद्रात बुडाली. त्यानंतर पुन्हा ऑक्टोबरमध्ये मुंबईवर हल्ला करण्यासाठी अतिरेकी निघाले होते. पण, तांत्रिक कारणामुळे तो प्रयत्नही अपयशी ठरला होता. मात्र नोव्हेंबरमधील प्रयत्न पूर्णपणे यशस्वी राहिला.
तीन बायका
लहानपणी पाकमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर १८ वर्षे तो पाकमध्येच वास्तव्यास होता. त्यानंतर तो अमेरिकेत परत गेला. त्याला हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषा अवगत आहेत. हेडलीला तीन बायका आहेत. पहिली शाझिया गिलानी, दुसरी पोशी पीटर आणि तिसरी फैजा ऑटुला अशी त्यांची नावे आहेत. हेडली सध्या अमेरिकेतील एका तुरुंगात ३५ वर्षे कारावासाची शिक्षा भोगत आहे. अमेरिकेच्या एफबीआयने हेडलीला ३ ऑक्टोबर २००९ रोजी शिकागो विमानतळावर अटक केली. त्यावेळी त्याच्यावर अनेक आरोप होते, त्यात डेन्मार्कमधील अतिरेकी हल्ल्यातील सहभागाचाही समावेश आहे.
पाकला सोपविणार नवे डोजियर
डेव्हिड हेडलीच्या कबुलीजबाबानंतर भारत सरकारने पाकिस्तानला हाफिज सईद आणि अन्य सूत्रधारांबाबत नवे डोजियर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सूत्राने दिली. याशिवाय, भारत आणि पाकच्या विदेश सचिवांमध्ये लवकरच होणार असलेल्या बैठकीतही हा मुद्दा जोरकसपणे उपस्थित केला जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26809

Posted by on Feb 9 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (836 of 2453 articles)


=अमेरिकेच्या माजी गुप्तचर अधिकार्‍याचा दावा= नवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] - अल् कायदा या जहाल आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन ...

×