Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » २ महिन्यांच्या सुट्टीवरून परतले राहुल गांधी

२ महिन्यांच्या सुट्टीवरून परतले राहुल गांधी

  • थाई एअरवेजच्या विमानाने आगमन
  • सोनिया, प्रियंकाने घेतली भेट
  • कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधान
  • आतषबाजीने केले स्वागत =

Rahul-Gandhi3नवी दिल्ली, [१६ एप्रिल] – कुठे गेले, काय करताहेत आणि कधी परतणार यासंबंधीच्या चर्चांना उधाण आले असतानाच आणि पक्षातूनच नेतृत्व क्षमतेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात असताना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ५६ दिवसांच्या अज्ञातवासानंतर आज गुरुवारी सकाळी राजधानी दिल्लीत आगमन झाले.
थाई एअरवेजच्या विमानाने सकाळी ११.१५ च्या सुमारास नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत राहुल गांधी यांचे त्यांच्या तुघलक रोड येथील निवासस्थानी आगमन झाले असता आई सोनिया आणि बहीण प्रियंका गांधी वढेरा त्यांच्या स्वागतासाठी तेथे आधीपासूनच हजर होत्या. आपला नेता परत आल्याचा आनंद म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. निवासस्थानी आगमन झाले तेव्हा गडद रंगाचा टी-शर्ट घातलेले राहुल गांधी गाडीच्या मागच्या सीटवर बसलेले होते आणि बाहेर वाट बघत असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींकडे दुर्लक्ष करत ते आत निघून गेले.
राहुल गांधी बुधवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता येणार असल्याचे वृत्त असल्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींनी विमानतळ आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर एकच गर्दी केली होती. परंतु, राहुल गांधी बँकॉक येथून थाई एअरवेजच्या विमानाने सकाळी ११.१५ वाजता नवी दिल्लीला उतरले. त्यांचे विमान १०.३५ लाच अपेक्षित होते. परंतु, विमानाला सुमारे पाऊण तास उशीर झाला. लोकसभा निवडणूक आणि त्यापूर्वी व नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारच्या कार्यकाळातील पहिल्याच अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात भूसंपादन विधेयकावरून गदारोळ माजला असताना राहुल गांधी आई सोनियाला सुटी मागून आत्मचिंतनासाठी निघून गेले होते. गेल्या १६ फेब्रुवारीला अज्ञातस्थळी रवाना झालेले राहुल गांधी १५ दिवसांसाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, वारंवार त्यांनी आपली रजा वाढविली. आज गुरुवारी ५६ दिवसांच्या सुटीनंतर राहुल गांधी राजधानीत परतले. कॉंग्रेस पक्षात दुसर्‍या क्रमांकाचे नेते असलेले राहुल गांधी यांना आत्मचिंतन करण्यासह पक्षातील त्यांची भूमिका निश्‍चित करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे आणि त्यासाठीच ते गेले आहेत, असे सांगून कॉंग्रेस नेते, प्रवक्त्यांनी त्यांचा जोरदार बचाव केला.
राहुल गांधी परदेशात असताना कॉंग्रेसचे लोकसभेतील उपनेते कॅप्टन अमरिंदरसिंग, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले. आपण राहुलच्या नेतृत्वात काम करणार नाही, असे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आधीच स्पष्ट केले. सोनिया गांधी पक्षाची धुरा राहुलकडे सोपविण्यास उत्सुक असताना पक्षातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधींबाबत सोनिया काय निर्णय घेतात आणि त्या निर्णयानंतर कॉंग्रेस एकसंध राहील का, याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रविवारच्या रॅलीत सहभागी होणार
सुमारे दोन महिने आत्मचिंतन करून राजधानी नवी दिल्लीत परतलेले कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या रविवारी कॉंग्रेस पक्षाने रालोआ सरकारच्या भूसंपादन विधेयकाविरोधात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे त्यावेळी देशवासीयांना त्यांचे दर्शन होईल. त्यानंतर राहुल गांधी दांडी यात्रेसारखी १०० किमी अंतराची यात्राही काढणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22120

Posted by on Apr 16 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1781 of 2453 articles)


=नितीशकुमार यांचा दावा= पाटणा, [१६ एप्रिल] - जनता परिवारातील सहा पक्षांनी एकत्र येण्याचा बुधवारी घेतलेला निर्णय भारतीय जनता पक्षासाठी विनाशकारी ...

×